महाराष्ट्राची लाडकी शर्विका म्हात्रे कळसूबाई शिखरावरून देणार मराठी भाषा संवर्धन संदेश



अलिबाग (गुरुदत्त वाकदेकर) : जागतिक विक्रमवीर कु. शर्विका जितेन म्हात्रे वयाच्या साडे तीन व्या वर्षी पुन्हा एकदा नवा विश्वविक्रम प्रस्थापित करण्याच्या तयारीत आहे. ह्यापूर्वी शर्विकाने अनेक विक्रम आपल्या नावावर नोंद केले आहेत. तिची नोंद इंडिया बुक, आशिया बुक आणि वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये या आधी झालेली आहे. तिच्या नावावर सध्या पाच विक्रमांची नोंद झाली आहे.
मराठी भाषा पंधरवडा सर्वत्र उत्साहाने पार पडत असताना येत्या २५ जानेवारी २०२१ रोजी भारताच्या ७२ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ती महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणजेच कळसूबाई शिखर सर करणार आहे. महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ह्या शिखराची समुद्रसपाटीपासून उंची ५४०० फूट म्हणजे सुमारे १६४६ मीटर एवढी आहे.
विशेष बाब म्हणजे शर्विका सदर मोहीम मराठी भाषेला समर्पित करणार आहे. मराठी भाषा पंधरवड्याचे औचित्य साधून मराठी भाषा प्रचार आणि प्रसार करण्याचे आवाहन कळसूबाईच्या शिखरावरून केले जाणार आहे, अशी माहिती तिचे पालक जितेन म्हात्रे आणि अमृता हात्रे ह्यांनी साहित्यसंपदाच्या माध्यमातून दिली.
शार्विकाची मराठी भाषेप्रती असलेली तळमळ लक्षात घेऊन साहित्यसंपदा समूहातर्फे तिची पुस्तक तुला केली जाणार आहे. सदर पुस्तके आदिवासी पाड्यावर वाचनालय स्थापन करण्यासाठी वापरली जाणार आहेत, अशी माहिती साहित्यसंपदाचे संस्थापक वैभव धनावडे ह्यांनी देताना सांगितले की, ७२ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्यसाधून मराठी साहित्य विश्वात अमृततुल्य विचारांची, लिखाणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या साहित्यिकांचा परिचय आणि त्यांच्या लिखाणाच्या वैशिष्ट्यांची ओळख कळसूबाई शिखरावर करून देण्यात येईल. मराठी साहित्याच्या संस्कारांची पाळंमुळं भक्कम करणाऱ्या संत ज्ञानेश्वरांपासून ते अनिल अवचट, कुसुमाग्रज, प्र. के. अत्रे, मधु मंगेश कर्णिक, जेष्ठ गझलकार अे. के. शेख, अशोक नायगांवकर, अरुण म्हात्रे, अरुणा ढेरे, अशोक बागवे, विजया वाड अशा प्रतिभावंत लेखकांनी आपले मोलाचे आणि भरीव योगदान साहित्याक्षेत्राला दिले आहे. त्यांच्या लेखणीला आणि शब्दांना कळसूबाई शिखर २५ जानेवारीला साक्षीदार ठरेल. 
"कळसूबाई चढण्याचा शर्विकाचा ध्यास, साहित्यसंपदासंगे मराठी भाषा संवर्धनाची आस" अशी पताका हाती घेत साहित्यसंपदा समुह शर्विकासोबत ही मोहीम फत्ते करणार. इतिहासात पहिल्यांदाच कळसूबाईच्या शिखरावर काव्यवाचन सोहळा पार पडणार असून त्यास सलोनी बोरकर, वंदना मत्रे, श्रीकांत पेटकर, मंजुळ चौधरी आदी कवी कवयित्रींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. मराठी भाषेसाठी आग्रही असणाऱ्या जितेन म्हात्रे आणि अमृता म्हात्रे ह्यांची लाईव्ह मुलाखत नुकतीच प्रसारित झाली त्यावेळी शर्विकाच्या जडघडणीत साहित्याचा मोलाचा वाटा असल्याचे स्पष्ट करताना मोबाइलमुळे वाया जाणाऱ्या मुलांमध्ये अश्या उपक्रमांतून मराठी साहित्याची गोडी निर्माण होईल अशी भूमिका तिच्या पालकांनी मांडली. सलोनी बोरकर ह्यांनी मुलाखतकार म्हणून काम बघताना सर्वांगीण चर्चा केली.
अल्पावधीतच लहान वयात महाराष्ट्राची लाडकी कन्या म्हणून प्रसिद्ध झालेल्या शर्विकाचा सत्कार अक्षरमंच सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान  कल्याण व सम्यक संकल्प सामाजिक संस्थेतर्फे कळसूबाई शिखरावर करण्यात येणार आहे. तेजस्विनी सामाजिक सांस्कृतिक फौंडेशनच्या संस्थापिका जीविता पाटील ह्यांनी सुद्धा शर्विकाच्या मोहिमेचे कौतुक करताना विश्वविक्रमी मोहिमेसाठी एका प्रमाणपत्राचा खर्च उचललेला आहे .
महाराष्ट्रातील गड किल्ले संवर्धन करणाऱ्या समस्त दुर्ग सेवकांना आणि सीमेवर लढणाऱ्या जवानांना सदर प्रसंगी मानवंदना देण्यात येणार असून ७२ झेंडे सदर प्रसंगी फडकविले जाणार आहेत .
लहान वयात सामाजिक भान जपणाऱ्या शर्विकाच्या मोहिमेचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, शासनाने तिचा यथोचित सन्मान करून तिचा आदर्श भावी पिढीसमोर ठेवावा, असे मत सर्वत्र व्यक्त होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा