रोहा (निखिल दाते)
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या मुल्यांचा संदेश समाजात पोचवण्यासाठी बुधवार दि. १४ रोजी साहित्यानंद प्रतिष्ठान रायगड तर्फे ऑनलाईन कवी संमेलन उत्साहात संपन्न झाल्याची माहिती साहित्यानंद प्रतिष्ठान रायगडच्या जिल्हाध्यक्षा सौ. संध्या विजय दिवकर यांनी दिली.
कोरोना काळात एकत्र येणे अवघड आहे, परंतु ऑनलाइन कविसंमेलन ही सुंदर कल्पना आहे. साहित्यानंद प्रतिष्ठान रायगडने दर्जेदार कवितांचा आनंद देण्याचा सुंदर प्रयत्न केला आहे अशा शब्दात कौतुक करत
साहित्यानंद प्रतिष्ठान रायगड या संस्थेने आयोजित केलेल्या या संमेलनाचे प्रमुख पाहुणे रायगड भूषण एल .बी.पाटील यांनी संस्थेच्या पुढील वाटचालीस
शुभेच्छा दिल्या.
गडकिल्ले अभ्यासक सुखद राणे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात संस्थेच्या कार्याला शुभेच्छा देताना साहित्यानंद प्रतिष्ठान ही संस्था उपेक्षित नवकविंना व्यासपीठ देण्याचे अतिशय मोलाचे काम करत आहे असे सांगितले.
फक्त स्वतः साठीच टाहो न फोडता इतरांच्या डोळ्यातील अश्रू पुसणे म्हणजे कविता. साहित्याचा आनंद म्हणजे जीवनाचा आनंद, साहित्य विश्वातील नवोदितांना प्रेरणा व प्रोत्साहन देवून हक्काचे विचारपीठ देण्याचे काम साहित्यानंद प्रतिष्ठान ही संस्था करते असा विश्वास
साहित्यानंद प्रतिष्ठान रायगडच्या जिल्हाध्यक्षा सौ. संध्या दिवकर यांनी आपल्या प्रास्ताविकात दिला.
वाघाचं काळीज लागतं राव वैराग्य अंगात शिरायला
आणि तुम्हीच सांगा जमेल का नाद भीमाचा करायला
साहित्यानंद प्रतिष्ठान रायगड
संस्थेचे कार्याध्यक्ष व
या संमेलनात सहभागी असलेले कवी मंगेश कंक (महाड)यांनी आपल्या कवितेतून आजच्या पिढीचे आचरण व बाबासाहेबांचे विचार यावर भाष्य करणार्या आपल्या कवितेतून सद्य स्थितीचे वास्तव अधोरेखित केले.
जोपर्यंत इथली जातीयता धर्मवाद मिटत नाही
तो पर्यंत माझी तिरडी काही उठत नाही
कवी उमेश जाधव (पाली) यांनी लोकशाहीचे आशयघन शब्द आपल्या कवितेतून उमटवले.
अंधार दूर करण्यासाठी हाती मशाल आहे
इतका विचार माझा पुरता विशाल आहे
कवी सिद्धेश लखमदे(मुरुड) यांच्या गजलचा हा शेर भरभरून कौतुकास पात्र ठरला.
स्त्री जन्मा तुझी बिकट कहाणी
आपल्या कुटुंबाकरता फिरे अनवाणी
कवी गणेश भगत (रोहा) यांच्या ओळी अंतर्मुख करून गेल्या.
बाबासाहेब तुम्ही असे का आमच्या वर रुसलात
सार्या सोशिक समाजाला पोरके करून गेलात
सुभाष कटक दौंड(खोपोली) यांनी आपल्या काव्यातून बाबासाहेबांना आर्त साद घातली.
रस्त्यात पडलेल्या दगडाला याच हाताने उचलला
लाल शेंदूर फासून देव म्हणून बसवला
कवी मच्छिंद्र म्हात्रे (उरण)यांनी "दगडांच्या देशा" या आपल्या कवितेतून
आपल्या आंतरीची वेदना व्यक्त केली.
रंगरूप सांगता येणार नाही पण प्रेमळ होती नक्की
श्रीमंत होती पण प्रसंगात धाऊन येणार नक्की
कवी हिरामण पाटील (पेण) यांनी आपल्या कवितेतून माणुसकी शोधण्याचा प्रयत्न केला.
जगमान्य लोकशाही शासन स्थापून घटनेचे शिल्पकार झालात तुम्ही
कवयित्री सायराबानू चौगुले(माणगाव) यांनी
अशा ओळींतून गुलामगिरीतून मुक्त करणार्या विचारांची "घटनेचे शिल्पकार" ही कविता सादर करून रसिकांची दाद मिळवली.
पहा काय होते बादशहा संपल्यावर
ताजमहाल बांधू कसा हात कापल्यावर
या ओळी
कवी हनुमंत शिंदें (रोहा)यांच्या .
आपल्या खुमासदार शैलीने त्यांनी सर्व रसिकांना मंत्रमुग्ध केले.
सुत्रसंचालक म्हणजे कवी व रसिक यांच्यातील दुवा
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले कवी ,लेखक अजित शेडगे यांनी.
कवयित्री उल्का माडेकर यांनी आपल्या मधुर वाणीने सर्वांचे आभार मानले.
कार्यक्रमास संपूर्ण रायगड जिल्ह्यातून कवी व कवयित्री यांनी उपस्थिती लावून आपली कला सादर केली. त्यांच्या कवितांना उदंड प्रतिसाद व प्रेम मिळाले.
साहित्यानंद प्रतिष्ठानचे संस्थापक, गजलकार, संगीतकार, गायक विजय वडवेराव यांनी १३ जिल्हे व बेळगाव येथे धम्म चक्र प्रवर्तन दिनानिमित्त आज एकाच दिवशी अशा कविसंमेलनांचे आयोजन केले होते.
साहित्यानंद प्रतिष्ठान महाराष्ट्र ही संस्था साहित्य व संगीत या विषयांवर रचनात्मक कार्य करते असे संस्थेचे अध्यक्ष विजय वडवेराव यांनी सांगितले.
Post a Comment