शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे मागे घेण्यासाठी माणगांवमध्ये काँग्रेस तर्फे धरणे आंदोलन



किरण शिंदे/लोणेरे

माणगांव शहारामध्ये माणगांव तालुका काँग्रेसकडून शेतकरी व कामगार बचाव दिवसानिमित्त शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे मागे घेण्याचा मागणीसाठी दि. २ ऑक्टोबर रोजी धरणे आंदोलन करण्यात आले. 
भाजप सरकार शेतकरी व कामगार विरोधात तीन काळे कायदे करून देशातील हरित क्रांती नष्ट करीत आहेत. जगाचा पोशिंदा, अन्नदाता शेतकरी व शेतमजूर यांना भाजप सरकार उद्योगपतींचे गुलाम बनवीत आहेत. शेतकऱ्यांचा आवाज ऐकणे तर दूरच उलट आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार केला जात आहे. कोणतीही चर्चा सवांद न घेता मोदी सरकारने बहुमताच्या जोरावर तीन काळे कायदे मंजूर केले आहेत. नव्या कायद्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती पूर्ण पणे नष्ट होणार आहे. त्याचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसणार आहे. लाखो लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होणार आहे. आतापर्यत असलेल्या बाजार व्यवस्थेमुळे राज्यसरकारला कर स्वरूपाने मिळणारा महसूल ही केंद्र सरकारने एकतर्फी निर्णय घेऊन संपुष्टात आणला आहे. कोरोना महामारीच्या आडून शेतकऱ्यांवरचे संकट मूठभर उद्योपतीच्या संधीमध्ये बदलून देण्याचा मोदी सरकारचा डाव आहे. त्यामुळे हे काळे कायदे विनाविलंब रद्द करण्यात यावेत. अशा आशयाचे निवेदनही माणगांव तालुका काँग्रेस पक्षा तर्फे तहसीलदार प्रियांका आयरे यांना देण्यात आले. 
यावेळी काँग्रेस रायगड जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेव पवार, माणगांव तालुका अध्यक्ष विलास सुर्वे, जनार्दन मानकर आदी काँग्रेस कार्यकर्त्यांसह शेतकरी उपस्थित होते. यावेळी उत्तरप्रदेश येथे झालेल्या हत्याकांडाचा निषेध करण्यात आला. तसेच काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना युपी पोलिसांनी दिलेल्या वागणुकीबद्दल ही संताप व्यक्त करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा