कोणताही खंड न पडता स्तनदा माता, गरोदर महिला आणि बालकांना घरपोच दिला जात आहे डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत पोषण आहार
प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
देशात व महाराष्ट्रात सध्या करोना विषाणूचा (कोविड-19) प्रादूर्भाव झाल्यामुळे शासनाने करोना विषाणूचा राज्यामधील प्रादूर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्यामध्ये दि.31 मे 2020 पर्यंत लॉकडाऊन लागू केला आहे.
या दरम्यान नागरिकांच्या आरोग्य विषयक सुरक्षिततेसाठी, सोयी-सुविधांसाठी विविध नियम व उपाययोजना रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी या राबवित आहेत,त्यास पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांची खंबीर साथ मिळत आहे. संपूर्ण प्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य यंत्रणा,प्रसारमाध्यम प्रतिनिधी रायगडवासियांना करोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत.
अशा परिस्थितीत समाजातील विविध घटकांना अन्नधान्य मिळण्याची जबाबदारी शासनाने स्वीकारली आहे. तशी स्तनदा माता आणि गरोदर महिला यांच्या अतिरिक्त पोषण आहाराची जबाबदारीही शासनाने आपल्या खांद्यावर घेतली आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील 135 अंगणवाड्यांमधील स्तनदा माता, गरोदर महिला आणि बालके यांना घरपोच पोषण आहार मिळत आहे. डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहार योजनेंतर्गत हे काम अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या माध्यमातून होत असून त्या अन्न बनवून घरपोच पोहोचवत आहेत. या योजनेंतर्गत सात महिने ते सात वर्षे मधील बालकांना अंडी किंवा केळी आठवड्यातून चार दिवस तर गरोदर/स्तनदा मातांना सोमवार ते शनिवार एका वेळचा चौरस आहार देण्यात येतो. मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचनांप्रमाणे एकमेकांचा संपर्क टाळण्यासाठी कोरड्या स्वरुपातील घरपोच आहार वाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
लॉकडाऊनमुळे सर्वत्र शाळा, कॉलेज जसे बंद त्याप्रमाणे कर्जत तालुक्यातील या 330 अंगणवाड्यांमध्ये त्या बंद असल्याने बालके येत नाही. मात्र यात कर्जत तालुक्यातील आदिवासी भाग अपवाद असून तालुक्यातील 135 अंगणवाड्यांमध्ये संभाव्य कुपोषण रोखण्यासाठी शासनाने खास बाब म्हणून सुरु केलेली डॉ.अब्दुल कलाम अमृत आहार योजना मदतीला आली आहे.
कर्जत तालुक्यातील आदिवासी बहुल भागात आणि डोंगरपट्टयात असलेल्या भागात कुपोषणाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे या भागाचा समावेश अमृत आहार योजनेमध्ये आदिवासी विकास विभागाच्या उपविभागात येत असलेल्या 130 अंगणवाड्यांमधील बालकांना तसेच स्तनदा माता आणि गरोदर महिला यांना अमृत आहार योजनेमधून अतिरिक्त आहार दिला जातो.
या भागातील कुपोषणाचे प्रमाण आणि पार्श्वभूमी लक्षात घेऊन शासनाने या विभागाला अमृत आहार योजनेमधून अतिरिक्त आहार देण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याच माध्यमातून अतिरिक्त आहार देण्यात येतो. अतिरिक्त आहारात स्तनदा माता आणि गरोदर महिला यांना सकस आहार म्हणून जेवण तर अंगणवाडीमधील बालकांना त्यांच्या दररोजच्या पोषण आहारासह अंडी आणि केळी यांचा अतिरिक्त आहार दिला जातो.
मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण श्री.नितीन मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प अधिकारी निशिगंधा भवाळ यांनी तालुक्यातील ज्या अंगणवाडीमध्ये अमृत पोषण आहार योजना सुरु ठेवली आहे, त्यांनी तेथील 135 अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना एकत्र करुन लॉकडाऊन असला तरी अतिरिक्त पोषण आहार गरजूंना पोहोचविला पाहिजे, या कर्तव्य भावनेची त्यांना जाणीव करुन दिली. तालुक्यातील विभाग एकमधील 47 आणि विभाग दोनमधील 88 अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी कार्यकर्तींनी पोषण आहार बनवून देण्याची जबाबदारी पार पाडण्याची तयारी स्वीकारली. त्यानंतर कोणताही खंड न पडता कर्जत तालुक्यात अमृत आहार योजनेचा पोषण आहार गरजू स्तनदा माता आणि गरोदर महिला,बालके यांना घरपोच पोहोचविला जात आहे.
पोषण आहार हा स्तनदा माता आणि गरोदर महिला यांना सुक्या धान्याच्या स्वरुपात (गहू, तांदूळ, खाद्य तेल, मीठ, मसाला इत्यादी) तर त्या 135 अंगणवाड्यांमधील बालकांना शिजविलेला पोषण आहार घरोघरी जाऊन पोहोच केला जात आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी करोनामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळातदेखील सेवा देण्याचा हा प्रयत्न खरोखर कौतुकास्पद आहे.
करोनाबाबत जनजागृतीसाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या घरोघरी जाताना करोनाचा संसर्ग स्वत:लाही होऊ नये, यासाठी स्वत:ची काळजी घेत आहेत. त्याचवेळी या कार्यकर्त्या अंगणवाडी हद्दीत गेल्यानंतर तेथे स्वच्छता कशी राखावी, करोनाच्या विषाणूपासून स्वत:चा बचाव कसा करायचा, याची माहितीही देत आहेत. वैयक्तिक स्वच्छतेबाबत जनजागृती करणारी प्रात्यक्षिके दाखवित आहेत. त्यांचे हे कार्य करोनावर मात करण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.
सर्वत्र लॉकडाऊन असताना अंगणवाडीमध्ये पोषण आहार तयार करुन तो घेऊन घरोघरी नेऊन देण्याची त्यांची ही जिद्दीने व धैर्याने अंमलात आणलेली कार्यपध्दती करोना संकटावर मात करण्यासाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.
Post a Comment