"माझा गाव माझा अभिमान" कोकणातील शिमगोत्सव : विशेष - गोंडघर


आपली जन्मभूमी म्हणजेच आपलं "गावं"आणि ह्या गावापासून आपल्या अनेक आठवणी जोडलेल्या असतात त्यातील एक सुखद आठवण आपल्या लेखणीतून आपल्या समोर मांडत आहेत गोंडघर गावचे उभरते लेखक श्री. सुहास पाटील.

शब्दांकन - सुहास पाटील,

रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुका हा येथील विविध प्रकारच्या परंपरेमुळे, निसर्गामुळे प्रसिद्ध आहे. त्याच म्हसळा तालुक्यापासून किमान १५-१७ किलोमीटर अंतरावर म्हसळा आणि श्रीवर्धन तालुक्याच्या सीमेवर वसलेलं एक निसरगरम्य गावं " गोंडघर "
चहुबाजूंनी लाभलेले हिरवेगार डोंगर, गावच्या सुरवातीला असलेल्या तळ्याभोवती संपूर्ण देविदैवतांचं दर्शन लाभल्यावर मन कसे प्रफुल्लित झाल्यासारखं वाटतं. साधारणपणे ६००-७०० घरं असलेले हे हसते खेळते गोंडघर गावं... गावाची विशिष्ट आणि अभिमानास्पद गोष्ट म्हणजे सर्व जाती धर्माची लोक जातीभेद किंवा कोणतेही मतभेद न राखता एकत्र राहतात...


कुणबी, आगरी, कुंभार, सुतार, मुस्लिम, बौध्द अश्या विवीध जाती धर्माची मुख्य वस्ती असलेल्या ह्या गावात कबड्डी, क्रिकेट खेळांची रंगत असते...
तालुक्यात आपल्या गावाचं नावलौकिक करून येथील तरुणाई ते कायम व स्थिर राहावं ह्या साठी धडपड करीत असतात... अशा या गावात तसे अनेक मंदिरं.. परंतु गावच मुख्य मंदिर व ग्रामदैवत म्हणजेच "बाबदेवाचे मंदिर" गावच्या सुरवातीस तळ्या पलीकडे हे मंदिर साऱ्यांचेच लक्ष वेधून घेते.


होळी म्हणजे कोकणातील शिमगा हा साधारणपणे मुख्य होळीच्या अगोदर १०-१२ आगोदर चालु होतो. शिमगा म्हटल की कोकणी माणसाच्या अंगात संचारतं, शिमग्याची पालखी त्याच्या डोक्यात नाचायला लागते, बोंबा कानात घूमू लागतात...
पहीली होळी लागल्यापासून ते पुढील १० ते १२ दिवस गोंडघर गावात शिमगोत्सव चालु असतो...
होळी सुरू होताच कामधंद्यासाठी मुंबई-पुणे शहरात असलेले गावकऱ्यांची गावाकडे परतण्याची लगबग सुरू होते... गोंडघर गावात मुख्य म्हणजे कोकणातील मोठी होळीआगोदर परंपरा असलेले पण सध्या लुप्त होत चाललेली "खेळी" ही परंपरा सगळीकडे पहायला मिळते.... हे खेळी पुढील २-३ दिवस इतर गावात जाऊन आपली परंपरा जोपासतात...

गावच्या मध्यभागी म्हणजेच होळीच्या मैदानावर आयोजित करण्यात येणारी होळी ही नेत्रदीपक असते.. मुख्य होळीच्या दिवशी प्रत्येकी घराकडून कोणतेतरी एक लाकूड म्हणुन जंगलातून तुटकी झाडे गावात आणली जातात व  मध्यभागी एक आंब्याच्या झाडाचं लाकुड जमिनीत रोऊन त्याच्याभोवती होळीची मांडणी केली जाते त्यास "होळी शिवणं" अस गावकऱ्यांच्या भाषेत म्हटल जात.
ग्रामदैवतेच्या मुख्य मंदिरासमोर पहिला होम लावायचा मान असतो हा होम झाल्यावर त्यातील निखारा किंवा राख घेऊन ती या ठिकाणी होळीमधे टाकली जाते...
पुढे पूर्ण दिवस उपवास पकडलेल्या बायका ह्या, होळी लागण्या अगोदर होळीची पुजा करतात.
त्यानंतर होळीभोवती संपूर्ण गाव तांदूळ टाकत  होळी ये होळी बारा महिन्याची होळी ये हे होळीचे कोकणातील फाक गात चक्कर मारतो...मूठ आवळून तोंडावर नेत बो-बो-बो करत सारा आसमंत गाजवून टाकतात ही मंडळी...त्यानंतर यथोचित पुजा करून होळी प्रज्वलित केली जाते.


त्यावेळी होणारी खालुबाजांची जुगलबंदी पाहण्यासारखी असते. होळीने पेट घेतल्यानंतर एक झाडाची वेल घेवुन मधला लाकुड पाडण्यासाठी तरूण मुलांची लगबग चालू होते. आपल्या अंगात असलेली रग तरुणाई याठिकाणी दाखविते. आपल्या जवळील माणसांचे हात पकडुन होळीभोवती धावताना येथील गावकरी आपल्याला दिसून येतात. जेष्ठ असो वा तरूण मंडळी संपूर्ण होम जळेपर्यंत कोणीही आपल्या घरी जात नाही.

दुसऱ्या दिवशी गावात कमालीची उत्सुकता असते कारण गावात देव देऊळ सोडून पालखीच्या रूपाने लोकांच्या दारी येतो. देव दारी येणार म्हटल्यावर घरोघरी उत्साहाने कळस गाठलेला. या दिवशी गोंडघर गावाचा थाट पाहण्यासारखा असतो. अंगण शेणाने सारवुन त्यावर चुन्याने नक्षी काढली जाते. प्रत्येक घरासमोर पताखा मिरवताना दिसून येतात. त्या अगोदर राधा येते घरोघरी औक्षण करण्यासाठी..
गावातील वेसिच्या आतमध्ये येणाऱ्या प्रत्येक घरात पालखी भेट देते...
माझ्या मुलाबाळांना सुखरूप ठेव, दूर मुंबईत त्यांची किरी वारी दूर कर, वंशाला दिवा दे, पुढच्या येळसं दाराशी येशील तेव्हा एक शाल, एक किलो पेढे, डजणभर केळी तुझ्या चरणी अर्पण करेन असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे नवस श्रद्धेपोटी केले जातात...

त्या दिवशी संपूर्ण गाव खालुबाजा, बेंजो च्या तालावर नाचत असतो.चहूबाजूने उधळत असलेला वेगवेगळ्या गुलालाचा रंग, फाटलेले शर्ट, लालेलाल होऊन बेधुंद नाचणारी तरुणाई, आपल्या जुण्या आठवणीत रमून जाणारी जेष्ठ मंडळी हा अनुभव प्रत्यक्ष घेतलेला उत्तम..

त्यानंतर पालखी आपल्या जागी म्हणजेच गावच्या मध्यभागी विराजमान होते पुढे पालखी आणि  देवाच्या मूर्त्यांना दागिन्यांनी कपडे, नक्षीकामाने सजवल जातं.. मुंबईत पोटाची खळगी भरण्यासाठी कष्ट करणाऱ्या या गावातील युवक लग्न झाल्यानंतर एक वेळ हनिमूनला जाणार नाहीत पण, होळीला आपल्या गावी बायकोसकट हजर. हीच आहे कोकणातल्या शिमग्याची खासीयत.
पालखी विराजमान असते त्या सहाणेवर डोक ठेवल म्हणजे लग्नानंतर आपलं आयुष्य सुखी राहणार यावर ग्रामस्थांची दृढ श्रध्दा. या ठिकाणी बाबदेव महाराज पुढील ४ दिवसांकरता मुकाम्मी असतात..
पुढील चार दिवस वेगवेगळे समाजाचे कार्यक्रम व नाटके होळीच्या मैदानावर पहायला मिळतात...
स्थानिक कलाकारांना मिळणारा हा उत्तम रंगमंच.


प्रत्येक कलाकार प्रेक्षकांचे मन जिंकण्यासाठी धडपड करताना दिसतो. रात्री १०-११ वाजता चालु होणारा कार्यक्रम सकाळी १-२ वाजता संपतो.
साधारण रात्री ८-९ वाजता झोपणारं गाव ह्या ३-४ दिवसात जागच असतं. शेवटी पाचवा दिवस हा निरोप देण्याचा, मिवरणुकीचा. या  दिवशी आपल्या देवाला निरोप देतांना गावकरी भावुक होऊन जातात. असे हे पाच दिवस कसे भुरकण निघून जातात हे कळत नाही. आणि शेवटी सुरू होते ती परतीची लगबग...

असा हा आमच्या गोंडघर गावाचा शिमगा खरच एकदा स्वतः अनुभव घ्यावा असाच आहे. आपल्या परंपरा संस्कृतीचा हा वारसा आपल्या पुढील पिढी पर्यंत नक्की पोहोचवा हिच सदिच्छा.

शब्दांकन - सुहास पाटील, गोंडघर, +91 86899 63708

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा