● जिल्हा परिषद सदस्या ते महाराष्ट्राच्या राज्यमंत्री एक यशस्वी राजकीय वाटचाल
शब्दांकन : श्रीकांत बिरवाडकर
राजकारणात मोठं मोठी पदे मिळायला भाग्य लागते ते भाग्य काहींच्या नशीबात असते तर काहींना संघर्ष करून मिळवून घ्यावे लागते. महाराष्ट्राच्या राजकारणात काही कुटुंब असे आहेत की त्यातील तिसरी किंवा चौथी पिडी घरातूनच राजकीय बाळकडू प्यायल्याने त्यांना संघर्ष करावा लागला नाही. राज्याच्या राजकारणात पवार, ठाकरे, मुंडे, पाटील ही घराणे राजकिय दृष्टीने सदन व मातब्बर मानली जातात या कुटुंबांपैकीच एक कुटुंब सध्या राजकीय पटलावर चर्चेत आहे ते म्हणजे तटकरे कुटुंब....
अलीकडच्या काळात देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एका दमदार लोकप्रिय नेत्याचे नाव घेतले जाते ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस, माजी मंत्री तथा 32 रायगड लोकसभा मतदार संघाचे खासदार मा.श्री.सुनिल तटकरे आहेत. खासदार सुनिल तटकरे यांनी आपल्या कार्य कर्तृत्वाने आणि बुद्धी चातुर्याने मतदारसंघात मोठ्या प्रमाणात लोकोपयोगी कामे करून जनतेच्या मनावर राज्य केले आहे. सुनिल तटकरे यांच्या आधी त्यांचे वडील दत्ताजीराव तटकरे यांनी देखील रायगड च्या राजकारणात एक वेगळीच ओळख निर्माण केली होती आणि वेगवेगळ्या पदांवर काम करून नावलौकिक मिळविले होते.
आताच्या राजकारणात आणि सामाजिक क्षेत्रात तटकरे कुटुंबातील अनिकेत व आदिती तटकरे ही तिसरी तरुण पिढी सक्रिय झाली आहे. आजोबा दत्ताजीराव तटकरे यांच्या काळापासून राजकारणातील बाळकडू ची चव माहीत असलेल्या राज्याच्या राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री मा.कु.आदितीताई तटकरे यांचा राजकीय प्रवास देखील सुखकर मार्गाने सुरू आहे.
रोहा तालुक्यातील सुतारवाडीमधील गवळवाडी गावात गवळी कुटुंबात जन्मलेल्या सुसंस्कारीत व उच्चशिक्षित असलेल्या आदितीताई तटकरे यांनी खूप कमी वयात राजकारणात एन्ट्री करून अनेक मोठं मोठ्या पदांना गवसणी घातली आहे. वडिलांप्रमाणे सर्वधर्म समभाव जपत तरुण वयात राजकारणाच्या सारीपाटावर उतरून त्यांनी पहिल्यांदाच जिल्हा परिषद सदस्या पदी निवडून येऊन पुढे वडिलांच्या राजकिय डावपेचांनी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पदावर विराजमान होऊन एक ऐतिहासिक कामगिरी केली. अध्यक्ष पदावरील काळात त्यांनी सर्व सदस्यांना सोबत घेत अनेक लोकोपयोगी कामे करून आपल्यातील राजकिय नेतृत्व व निर्णय क्षमतेची चुणूक दाखवून दिली आणि अल्पावधीतच त्यांच्या नावाची चर्चा "श्रीवर्धन मतदारसंघाच्या भावी आमदार" म्हणून व्हायला लागली. जनतेची ही भविष्य वाणी लवकरच खरी ठरणार होती की काय आणि लोकप्रियतेचे शिखर गाठलेल्या आदितीताईंना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या कृपाशीर्वादाने श्रीवर्धन मतदारसंघाच्या विधानसभेची उमेदवारी मिळाली. प्रत्यक्षात पार पडलेल्या 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार विनोद घोसाळकर यांचा 37 हजार पेक्षा जास्त मताधिक्याने पराभव करीत श्रीवर्धन मतदारसंघाच्या पहिल्या महिला आमदार होण्याचा बहुमान आदीतीताईंना मिळाला. दरम्यान नंतरच्या काळात सत्तेसाठी महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक राजकीय नाट्यमय घडामोडी घडल्याने शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आय या तीन पक्षांचे सरकार स्थापन झाले आणि या सत्तेच्या खेळात सुद्धा आदितीताईंना नियतीने भरभरून आशीर्वाद दिल्याने त्यांना राज्यमंत्री आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर विराजमान केले. सरकार मध्ये त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या प्रमुख खात्यांची जबाबदारी देऊन राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री.उद्धव ठाकरे यांनी ताईंवर खूप मोठी जबाबदारी दिली आहे आणि ही जबाबदारी त्या नक्कीच सहजतेने पार पाडतील हा विश्वास आहे.
जिल्हा परिषद सदस्य ते महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री हा राजकीय प्रवास सहजपणे पार करणाऱ्या आदितीताई या रायगडच्या राजकारणातील "एक राजकन्या"च आहेत असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही.
आज दि.16 मार्च रोजी आदितीताईंचा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने त्यांना शुभेच्छा देताना ताईंना राजकारणात आणि सामाजिक क्षेत्रात काम करण्यासाठी उत्तम व निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो..
- शब्दांकन श्रीकांत बिरवाडकर
Post a Comment