म्हसळा : प्रतिनिधी
मागील काही महिन्यांपासून म्हसळा तालुक्यातील शहर आणि ग्रामीण भागात वेगवेगळ्या प्रकारचे अनेक गुन्हे घडले आहेत. छोटे मोठे वादविवाद, स्त्रिया तरुण मुलींची छेडछाड करणे, धार्मिक तेढ निर्माण करणे असे प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले होते. त्याचबरोबर शहरात अवैध रित्या गुटखा, चरस, गांजा अशा अंमली पदार्थांची विक्री करणे तसेच वाहतूक व्यवस्था सुरळीत होत नव्हती, शहराच्या वस्तीतून तसेच मुख्य रस्त्यावरून भरधाव वेगाने गाडी चालविणे, गाडी चालवीत असताना लायसन्स नसणे, अनधिकृत पार्किंग अशा एक ना अनेक समस्यांचे निराकरण करणे गरजेचे असताना देखील पोलीस प्रशासनाकडून कोणतीही ठोस पावले उचलली जात नव्हती त्यामुळे सर्वच प्रकारे तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्यात पोलीस अपयशी ठरत असल्याचे दिसून येत होते.
नुकत्याच आठ दहा दिवसांत तालुक्यात वेगवेगळे प्रकार घडले. हे प्रकार सहन न झाल्याने काही सामाजिक संघटना आणि जागरूक नागरिकांनी एकत्र येऊन पोलीस प्रशासनाच्या हलगर्जीपणा पणा व दुर्लक्षित धोरणाबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रारी करून पाठपुरावा केल्याने याची गंभीरपणे तात्काळ दखल घेऊन जिल्हा पोलीस प्रशासनाने तत्कालीन पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांची बदली करून त्यांच्या जागी नव्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे यांची नियुक्ती केली आहे.
धनंजय पोरे यांनी वार्तालाप करताना तालुक्यात कायदा व सुव्यवस्था राखली जाईल असे सांगतांना नागरिकांनी देखील पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले. त्याचबरोबर अवैध धंदे, महिलांवरील अत्याचार आणि वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर कोणाचीही हयगय केली जाणार नाही असा इशाराही दिला.
नवनिर्वाचित सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे यांची म्हसळा प्रेस क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन अभिनंदन करून स्वागत केले आणि तालुक्यात कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्याचे चांगले काम करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी म्हसळा तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष शशिकांत (बाबू) शिर्के, जेष्ठ पत्रकार संजय खांबेटे, जेष्ठ पत्रकार उदय कळस, माजी अध्यक्ष अशोक काते, उपाध्यक्ष अंकुश गाणेकर, पत्रकार सुशील यादव, पत्रकार श्रीकांत बिरवाडकर, पत्रकार अरुण जंगम उपस्थित होते.
Post a Comment