प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
मुंबई : १४ मार्च २०२० रोजी अनुयोग विद्यालय आणि चैत्रशोभा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "मराठी वाचा! मराठी बोला! मराठी शिकवा!" हे कविसंमेलन पार पडले. प्रस्तुत कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान 'कोमसाप'चे संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी भूषविले. तसेच अनुयोग शिक्षण संस्थेचे संस्थापक श्री. सतीशचंद्र चिंदरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कवयित्री नमिता कीर आणि चैत्रशोभा या वार्षिक अंकाचे संपादक कवी संतोष खाड्ये व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी सरस्वती पूजन व दीपप्रज्ज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. अनुयोग विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. तसेच मराठी साहित्याची महती सांगणारी एक नाटिकाही सादर केली.
सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना अमूल्य मार्गदर्शन केले. मराठी भाषेचे महत्त्व आणि अनिवार्यता असा आशय त्यातून व्यक्त झाला. मधु मंगेश कर्णिक यांनी मराठी माध्यमाच्या शाळांचे व शिक्षकांचे कौतुक केले. तसेच कवयित्री नमिता कीर यांनी कथेच्या माध्यमातून मुलांना मार्गदर्शन केले.
त्यांनंतर वैभवी गावडे, पंकज दळवी, रविकिरण पराडकर, लिना माने, जयश्री चौधरी, सुलभा कुलकर्णी, ज्योती कपिले, पंकज दळवी, जे डी भुसारे, सुनिता अनभुले, मनोज पेडणेकर, बी. सोनावणे, अरविंद भोसले, हरिश्चंद्र धिवार, संतोष खाड्ये, गुरुदत्त वाकदेकर आदी मान्यवर कवींनी काव्य सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुयोग विद्यालयाच्या शिक्षिका मनीषा घेवडे आणि आभार प्रदर्शन चैत्रशोभाच्या संपादिका सौभाग्यश्री खाड्ये यांनी केले.
Post a Comment