अण्णा : मातीशी नाळ जोडलेला नेता...!


म्हसळा लाईव्ह व्यक्तिविशेष - अण्णा : मातीशी नाळ जोडलेला नेता...! (जन्म- १५ जुन १९४३; मृत्यु- ०८मे १९८८)
✍ शब्दांकन : राम वाजे

स्वातंत्र्यपूर्व काळ कुलाबा जिल्ह्यातील डोंगराच्या कुशीत लपलेले मालाठे गाव. गावची उपजिविका मुख्यतः शेतीवरच. नाही म्हणायला गावातील पंधरा-वीस बाप्ये मुंबईत मामुली नोकरी करून रोजीरोटी कमवत होते. बापजाद्यांपासून शिक्षणाशी सबंध असा नव्हताच? आता कुठे प्राथमिक शाळा उघडून शिक्षणगंगेचे एक-एक थेंब पदरात पडत होते. ठराविक दहा-बाराच मुलं यायची. श्री.धोंडो वि. लोखंडे व सौ. रायजीबाई या दापंत्याच्या पोटी जन्मलेला यशवंत सहा-सात वर्षाचा चुणचुणीत मुलगा, त्यातलाच एक! घरची परिस्थिती बेतातीच, पण लहानपणापासून अभ्यासात इतरांपेक्षा चार काकणं सरच! आईवडील कसं तरी पोटाला चिमटा काढून लहानग्या यशवंतला शिकवत होते.

चौथी पर्यंत शिक्षण गावच्या प्राथमिक शाळेत पूर्ण करुन पुढील शिक्षणासाठी दुरवरच्या तळे या गावी जाण्याशिवाय पर्यायच नव्हता. मालाठे गावापासून तळे हे पाच-साडेपाच कि.मी. अंतरावर. दहा-अकरा वर्षाच्या अशोकच्या मानाने ते एक दिव्यच. कारण, सकाळ- संध्याकाळी मिळून दोन-अडीच तासाचा  दमछाक होणारा, रोजचा प्रवास. त्यात रस्त्याची अवस्था अवघड नी वळचणीची. फकस्त पायवाट आणि तीही खाचखळग्यातुन व डोंगरदऱ्यातुन. या मार्गावर बिचार्या यशवंत अनवाणी पायाने चालून तळे गाठी. काट्या- कुट्यातुन पाय पुरते रक्तबंबाल होत. एवढं त्रास सहन करुनही लहानग्या यशवंतला शिक्षणाची ओढ काही केल्या गप्प बसू देत नव्हती. अपार कष्ट सहन करून आपल्या मनातील शिक्षणाची उर्मी तशीच प्रज्वलित ठेवलेली. संध्याकाळी घरी परतल्यावर यशवंतचा जीव मेटाकुटीला येई, पायाला अगदी ठणका लागुन जाई. तसाच थकला भागलेला जीव काहीच न खाता-पीता अंथरुणाच्या हवाली होई. पण, बिचार्या मायमाऊलीच्या मनात पोटच्या गोळ्याला उपाशी पोटी झोपलेले पाहवून कसं तरी होई! मग बळेबळेच दोन-चार घास भरवी, कधीमधी तसाच उपाशीपोटी झोपून जाई. आईने त्याच्या कोवळ्या पायांना तेल लावून मालिश केलं की दमलेला जीव निवांत झोपी जाई. सकाळ झाली की पुन्यांदा नेहमीच तेच रहाटगाडं. न्याहारीला चटणी भाकर खावून झाली म्हणजे दुपारंसाठी एक बरोबर बांधून नेणं, हा रोजचा शिरस्ता. शाळेच्या मधल्या सुट्टीत संवगडयासंगे भाकरी खाताना काही औरच मजा! कधीमधी खूपच कंटाळा आला म्हणजे नारायण गोळे या जीवलग मित्राच्या तळे येथील घरी राहणं होत असे. इथेच जीवाला जीव देणारे मित्र भेटले आणि जन्मभरासाठी ऋणानुबंधानाच्या धाग्यात जोडले गेले.

तळे येथे शिक्षणासाठी रोज करावी लागणारी तारेवरची कसरत काका श्री. लक्ष्मणराव लोखंडे यांना बघविली नाही आणि यशवंतास मुंबईत आपल्यापाशी बोलावून घेतले. लहानपणापासून अभ्यासात हुषार असलेल्या यशवंताने अल्पावधीतच तिथेही चुणूक दाखवून आपले नाणं खणखणीत आहे, हे पटवून दिले. मँट्रिकची परिक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होवून रुपारेल कॉलेजमधून बी.ए.एल्.एल्.बी. पर्यंत शिक्षण पूर्ण केले. याच दरम्यान काका श्री. लक्ष्मण लोखंडे यांनी रीतसर कागदोपत्री नोंद करून यशवंत यांस दत्तक घेऊन "अशोक" असे नामकरण केले.

अशोकरावांचे वडील लक्ष्मणपंत खमके गृहस्थ. त्यांना नोकरी करण्यात फारसं स्वायस नव्हतं. नळबाजार येथे नारळाच्या व्यवसाय सुरु केलेला. आपल्या मुलांनाही व्यवसायाचे संस्कार दिलेले. अशोकराव पेशाने वकील, परंतु वडिलांना नारळाच्या उद्योगधंद्यात मदत करत. उच्च शिक्षीत असेल तरी मनात कमीपणा न ठेवता, पडेल ते काम करण्यास सदा तत्पर. त्यांचा मुळचा पिंड समाजसेवेचा! आपल्या आजूबाजूला अशिक्षित, गरीब आणि गरजु लोकांसाठी त्यांचा जीव तीळ-तीळ तुटे. समाजातील अनेक समस्यांमुळे त्यांच्या मनास असंख्य वेदना होत. वंचित लोकांसाठी काही तरी केलं पाहिजे, अशी त्यांनी मनाशी पक्की खुणगाठ बांधली. त्या वेळेच्या माणगाव तालुक्यातील सामाजिक कार्याशी संलग्न असलेल्या कार्यकत्यांशी भेटीगाठी होऊ लागल्या. सर्वसामान्य लोकांबद्दल असलेली तळमळ आणि निष्ठेने केलेली धडपड यांमुळे अल्पावधीतच तालुक्यातील जनतेच्या मुखी  अशोकशेठ हे नाव लोकाभिमुख झाले.

कुणबी समाजाचे नेते श्री.अनंतराव पाष्टे आणि अशोकशेठ यांची अशीच एका सामाजिक कार्यक्रमात भेट घडली. पहिल्या भेटीतच श्री. पाष्टे यांवर साहेबांची चांगलीच छाप पडली. एक- दोन वर्षानंतर श्री.पाष्टे यांच्या कन्या कुसुमताई समवेत सातजन्माच्या बंधनात साहेब जोडले गेले. दांपत्य जीवनाची सुरुवात झाल्यावर साहेबांच अर्ध्याहून जास्त वेळ समाज सेवेत जाऊ लागला. सौ.अलकाताई (लग्नानंतर बदलेले नाव) कुटुंबाची जबाबदारी नोकरी सांभाळून नेटाने करत होत्या. त्यामुळे साहेब समाजसेवा व राजकारण करण्यास मोकळे होते. सोमवार ते शुक्रवार कामानिमित्त मुंबईत आणि शनिवार व रविवार गोरगरीब, गरजू व वंचित लोकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी पायास भिंगरी लावल्याप्रमाणे तालुक्यात भटकत. पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य व दळणवळण अशा अनेक सोयीपासून वंचित असलेल्या तालुक्यातील जनतेसाठी साहेबांनी सरकार दरबारी नित्य हजेरी लावली. त्यांच्या अशा पाठपुराव्याने एक-एक अडचणीचे निकारण होऊ लागलेले. आपले चुलत बंधू श्री.भाई लोखंडे यांना जिल्हा परिषदेवर निवडून आणून राजकीय आखाड्यात शंखनाद केला. रायगडचे त्यावेळचे भाग्यविधाते बँ.ए.आर्.अंतुले साहेबांच्या कानापर्यंत ही बातमी गेली आणि साहेबांचे राजकीय वर्चस्व वाढले.

तळा विभागातील लोकांना सरकारी कामानिमित्त माणगावला जावे लागायचे, हि बाब खर्चिक व अडचणीची साहेबांना हे ज्ञात होते म्हणून त्यांनी स्वतंत्र तळा तालुक्याची निर्मिती अशी जोरकस मागणी केली आणि नित्यनेमाने सरकार दरबारी जावून पाठपुरावा केला. ही मागणी पुढे वीस वर्षानंतर सत्यात अवतरली.

माणगाव तालुक्याच्या कॉंग्रेस कार्यकारिणीवर सहचिटणीस पदी निवड झाली. तसेच, कुणबी समाजाच्या कार्यकारिणीवर सुद्धा खजिनदार पदी निवड झाली. अल्पावधीतच साहेबांच्या प्रयत्नांना यश आले. माणगाव तालुक्यातील पहिला डांबरी रस्ता साहेबांच्या पाठपुराव्याने निर्माण झाला. त्यावेळी माणगाव तालुक्यात "अशोक" नावाच्या तीन व्यक्ती राजकीय क्षेत्रात नावारुपात आलेल्या. साहेबांनी जनतेच्या समस्येसाठी आखरशः तालुका पिंजून काढला. राजकारण करत असताना समाजकारण करण्याचे साहेब विसरले नाहीत. कुणा गरजूस दाखला मिळवून दे, बेरोजगार तरुणांना नोकरी लाव, गरीब लोकांना धनाची मदत व आजारी रुग्णास आरोग्यसेवा साहेब आपल्या स्वतःच्या खिशातून खर्च करून करत.

विधानसभा निवडणुकीत साहेबांना कॉंग्रेस पक्षातर्फे रोहा-माणगाव मतदारसंघात उमेदवारी मिळाली. साहेबांनी तन, मन,धन लावून रात्रीचा दिवस करून अपार कष्ट घेऊन प्रचाराचा धुरळा उडविला. कार्यकत्यांनी खुप मेहनत घेतली. परंतु थोड्याशा फरकाने विजय हुकला. साहेबांनी अपयशाची पर्वा न करता पुन्हा नव्याने मतदारसंघात विकास कामांना पहिल्यापेक्षा अधिक जोमाने सुरुवात केली. आपल्या सहकाऱ्यांसमवेत "तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ" या संस्थेची मूर्हूतमेढ रोवली. तळागाळातील शेवटच्या माणसांपर्यंत शिक्षण पोहचावे हाच उद्देश. मांदाड हायस्कूलला सरकारी मान्यता नव्हती, साहेबांनी स्थानिकांच्या मदतीने सरकार दरबारी चपला झिजवून अनुदान व मान्यता मिळवून दिली. आपले राजकीय मित्र श्री.महीपत गोळे यांच्या साथीने पिटसई येथे नवीन हायस्कूल स्थापन करण्याची धडपड चालू होती. 

आणीबाणीच्या काळात बँ.अंतुले साहेब दिल्लीत असत, तेव्हा मा.श्री. रवींद्र राऊत साहेबांसोबत अशोकशेठनी तळागाळात पक्षीय संघटना बांधून रायगड जिल्ह्यात कॉंग्रेस पक्षाला मजबूत करण्याचे काम लिलया पेलले. मा.अंतुले साहेबांचे अशोकशेठ खास मर्जीतले. कोकण मतदार संघातुन साहेब निवडून आले, त्यावेळेस साहेबांनी विकास कामांचा धडाका लावून आजपावेतो सुविधेपासून वंचित जनतेस सोयी मिळवून दिल्या. तालुक्यातील जनतेचे कैवारी व भाग्यविधाते बनून गेले. साहेब सामान्य कार्यकत्यांशी सलगीपूर्ण व आपलेपणाने वागत, मनात आपपरस्पर भाव नसे. त्यामुळे लहानतला लहान कार्यकर्ता साहेबांना जीवाभावाचा मित्र समजे. 

साहेबांचा राजकारणातला आलेख चढता होता. पण, काळाच्या मनात काही वेगळेच दडलं होतं.  दिनांक ८ मे १९८८ रोजी रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात आले असताना अचानक छातीत कळा येऊन हदयविकाराच्या तीव्र झटक्याने प्राणज्योत मावळली. वयाच्या अवघ्या ४५ व्या साहेबांनी संपूर्ण तालुक्याला दुःखाच्या खाईत लोटलं. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व धाकटा चिरंजीव निखिल पोरके झाले.
पिटसई हायस्कूल उभारुन साहेबांचे स्वप्न त्यांच्या मृत्युपश्चात सहकाऱ्यांनी पूर्ण केले. तसेच, हायस्कूलला कै. अशोक ल. लोखंडे विद्यामंदिर हे नाव देववून साहेबांच्या कार्याचे यथोचित गौरव केला. इतकी वर्षे उलटूनही मातीशी नाळ जोडलेल्या लाडक्या नेत्यास तालुक्यातील जनता अजूनही विसरली नाहीत. साहेब सदैव स्मृतीरुपात जनमाणसांच्या स्मरणात राहतील.

आणीक काय लिहणे...?



Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा