प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
माणगांव पोलीस स्टेशन चे हद्दीत दिनांक १८ जानेवारी रोजी रात्री १२.३० वाजता आश्विनी मंगेश घाडगे वय ११ वर्षे ही अल्पवयीन मुलगी चुकुन कळवा येथून माणगांव येथे रेल्वेने आली होती. रेल्वे पोलीसांनी माणगांव पोलीस स्टेशनला संपर्क केला व तिला माणगांव रेल्वे स्टेशन येथून बीट मार्शल पोलीस काॅन्स्टेबल नाथा दहिफळे हे माणगांव पोलीस स्टेशनला घेऊन आले. आश्विनीही अल्पवयीन असल्याने तिला बडीकाॅप मधील महिला पोलीस हवालदार दया पाटील यांनी स्वतःच्या घरी आणले रात्रभर आपुलकीने सांभाळली. तिला स्वतःच्या मुलीचे कपडे देऊन खाऊपिऊ घातले त्या मुलीची राहण्याची व्यवस्था केली त्यावेळी तिची मायेने विचारपूस करुन माहिती घेतली. तिने दिलेल्या माहीतीवरुन तिच्या शाळेची माहीती मिळाली. मिळालेल्या माहिती आधारे कळवा पोलीस ठाण्यास संपर्क करुन मुलीचे आईवडीलांना कळविण्यास सांगितले. आपली मुलगी हरवली आहे हे देखील तिच्या आईस माहीत नव्हते. फोनवरुन आपली मुलगी तिच्या आत्याकडे गेली असल्याचे तिच्या आईने सांगितले होते. माणगांव पोलीसांनी अतिशय चौकसपणे तपासाची सुत्र हलवुन मिळविलेल्या योग्य माहीतीनुसार कळवा पोलीसठाणे येथे संपर्क केला तेथील बीट मार्शल यांनी हरवलेल्या मुलीचे आईवडीलांना मुलगी आश्विनी ही माणगांव पोलीस स्टेशनला असल्याची माहिती दिली. त्यावरून तिचे आईवडीलांना माणगांव पोलीस ठाण्यात बोलाऊन त्या चिमुकल्या मुलीला तिचे वडील मंगेश रामा घाडगे रा. कळवा जि. ठाणे यांचे ताब्यात देण्यात आली आहे. मुलीच्या पालकांनी माणगाव पोलीसांचे मनापासुन आभार व्यक्त केले असून त्यांच्या चेहऱ्यावर आनंदभाव सहजी दिसुन आले त्यांनी आपली मुलगी सहीसलामत मिळाल्याने समाधान व्यक्त केले आहे.
Post a Comment