प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
म्हसळा शहरवासीयांची पाण्यासाठी वणवण ही याही वर्षी चालूच राहणार असे दिसत आहे . म्हसळा शहरात यावर्षीही मार्च ते जून या महिन्या दरम्यान पाणीटंचाईची शक्यता आहे . याला म्हसळा नगरपंचायतचे मुख्याधिकारी मनोज उकिरडे यांनीही दुजोरा दिला आहे . म्हसळा नगराध्यक्ष निवडीनंतर पत्रकार परिषदेत शहरातील पाण्याचा प्रश्न उपस्थित केला होता . यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्षा जयश्री कापरे यांच्यासह बाबू शिर्के , उदय कळस , सुशील यादव आदी उपस्थित होते . दरम्यान , मागील वर्षी टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी म्हसळा नगरपंचायतीने १६ लाख रुपये खर्च केले आहेत . यावर्षी शहरातील नागरिक ऐन हिवाळ्यातच पाणीटंचाईच्या भीतीने धास्तावले आहेत . मागील वर्षी म्हसळा शहरातील भीषण पाणीटंचाईमुळे त्रस्त झालेल्या शहरातील नागरिकांनी म्हसळा पाणी संघर्ष समिती स्थापन करून १० मे रोजी पाणीटंचाई बाबत महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे टंचाईबाबत ठोस उपाययोजना करण्याबाबत निवेदन दिले होते . तसेच जर दोन दिवसात या विषयावर ठोस कार्यवाही न केल्यास तहसील कार्यालय म्हसळा तसेच नगरपंचायत कार्यालयावर शहरातील हजारो नागरिकांचा मोर्चा धडकणार असल्याचे प्रशासनाला ठणकावून सांगितले होते . यंदाही हीच परिस्थिती उद्भवणार असे नागरिकांचे म्हणणे आहे . म्हसळा नगरपंचायत हद्दीत मागील चार - पाच वर्षाच्या कालावधीत माहे मार्च ते जून या कालावधीत भीषण पाणीटंचाई निर्माण होऊ लागली आहे . परंतु , या पाणीटंचाईवर उपाययोजना म्हणून तीन वेळा भूमिपूजन झालेली मंजूर नळपाणी पुरवठा योजना व तिच्या पाठपराव्याकडे दुर्लक्ष करण्यात आला . विंधणविहिरी खणून त्यातील दूषित पाण्याचा पुरवठा शहरातील बहुतांशी भागात केला गेला . त्यामुळे शहरात व तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे आरोग्य बिघडले . याचीही सखोल चौकशीची मागणी केली गेली . तसेच नगरपंचायत हद्दीतील सर्व नागरिकांना समप्रमाणात , दाबात , वेळेत व शुद्ध पिण्यायोग्य पाणी पुरवठा करणे शासनाचे निर्देशित असल्याप्रमाणेच सर्व शहरवासियांना तत्काळ पाणी पुरवठा व्हावा अशी मागणी करण्यात आली होती . सदर मागण्या पूर्ण न झाल्याने पाणी संघर्ष समिती अध्यक्ष सुशील यादव यांच्या नेतृत्वाखाली म्हसळा शहरातील नागरिकांनी १४ मे २०१९ रोजी भव्य मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात आला होता मोऱ्यातील आंदोलकांना शांत करण्यासाठी नायब तहसीलदार के . टी . भिंगारे यांनी पुढील वर्षी पाणीटंचाई न होण्यासाठी म्हसळा नगरपंचायत सर्वतोपरी प्रयत्न करेल , या साठी नगरपंचायत प्रशासनाला सूचना करण्यात आल्या आहेत , असे सांगितले . परंतु , यावर्षीही पाणी टंचाईची शक्यता आहे .
पाणीटंचाईला दरवर्षी सामोरे जावे लागत असल्याने नागरिकांची गैरसोय होते . शहरात यंदाही पाणीटंचाई निर्माण झाल्यास पाणी संघर्ष समिती सदस्यांसमवेत चर्चा करून पुढील आंदोलनाचा निर्णय घेण्यात येईल .
-सुशील यादव , अध्यक्ष , पाणी संघर्ष समिती , म्हसळा
Post a Comment