एस.टी.वाहक मिठ्ठू त्रिंबक आंधळे यांनी पाच दिवसांपासून हरवलेल्या आजारी बाप-लेकाची भेट घडवली

प्रतिनिधी : म्हसळा लाईव्ह
 सदैव वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक, शैक्षणिक कार्यात अग्रेसर असणारे श्रीवर्धन आगाराचे एस.टी.वाहक श्री.मिठ्ठू त्रिंबक आंधळे यांनी पाच दिवसांपासून आपल्या वानवाडा ता.औसा जि. लातूर येथून घरातून आपल्या मुलाला व भावाला मुंबईला भेटायला आलेल्या जेष्ठ नागरिक श्री.शिवाजी दौला कसबे (वय 85 वर्षे) यांची भेट घडवून आणली आहे. कसबे हे पाच दिवसांपूर्वी घरातून बाहेर पडले होते, पण ते स्वतः आजारी असल्यामुळे त्यांना कुठे जावे काहीच समजले नाही. आज ते सकाळी मुंबई येथील एस.टी.बसस्थानकात उतरले तेंव्हा तिथे वाहक श्री मिठ्ठू त्रिंबक आंधळे यांनी त्यांची सविस्तर काळजीपूर्वक विचारणा केली असता, तेंव्हा त्यांना समजले कि, हे चुकलेले आहेत तसेच प्रचंड आजारी आहेत. त्यावेळी आंधळे यांनी त्यांना चहापाणी तसेच जेवण देऊन धिर  दिला. तात्काळ फोटो, नाव व गांवाची माहिती घेऊन व्हाट्सएप व फेसबुकवर टाकले. हि माहिती वाचून लातूर जिल्ह्यातील मुरूडचे श्री.मेघराज किशोर अंधारे (लातुर तालुका उपाध्यक्ष प्रहार अपंग क्रांती आंदोलन ) व पाली जि.रायगड येथील रा.जि.प शाळेचे शिक्षक समाधान सुगावे हे मुळचे बोरफळ, वाणवडा ता. औसा जि.लातूर व एस.टी.चे. प्रसिद्ध कवि गणेश गोरे, पानगांकर ता.रेणापूर यांनी कसबे यांच्या नातेवाईकांना यासंबंधी सर्व माहिती दिली. त्या सर्वांनी मिठ्ठू आंधळे यांना संपर्क करून सविस्तर माहिती घेतली. तेंव्हा श्री.शिवाजी कसबे यांचा दहिसर, मुंबई येथील मुलगा व्यंकट कसबे संध्याकाळी मुंबई सेंट्रल बसस्थानकात घेण्यासाठी आला होता. पाच दिवसांपासून हरवलेल्या बाप-लेकांची भेट पाहून दोघांच्याही डोळ्यातून नकळतपणे आनंदाश्रू तरळत होते. या सत्कार्यासाठी सुरक्षारक्षक एस.जी.गिजम, ए.डी.भांबळे,बि.जे.व्हगाडे यांचे सहकार्य लाभले. या चांगल्या कामासाठी सर्वांनी वाहक श्री.मिठ्ठू त्रिंबक आंधळे यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा