प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथील समुद्र किनारे ओस पडल्याचे चित्र ऐन दिवाळीत पहायला मिळत आहे . पावसाचे अवकाळी थैमान आणि त्यामध्ये भर म्हणून ' क्यार ' वादळ या दोघांनी ऐन दिवाळीत तोंड काढल्यामुळे शेतकरी तर चितेत सापडलेतच पण पर्यटकांना आकर्षित करणारे समुद्र किनारे ही ओस पडल्याने मंदीचे सावट संपुर्ण श्रीवर्धन तालुक्यात दिसत आहे . निसर्गाचा वरदान लाभलेल्या दिवेआगर गावाला अनेक पर्यटक भेट देत असतात , परंतु यंदा शाळेची सुट्टी संपायला आली तरी पर्यटन स्थळे ओस पडलेली दिसतात . दरवर्षी ह्या मोसमात लाखोंची उलाढाल होत असते . पण ह्यावर्षी मात्र पाऊस आणि क्यार वादळाचा तडाखा व्यावसायिकांना बसल्याने दिवेआगर येथील सर्वच धंद्याची काशी झाली आहे , असे बोलुन दाखवतात . लॉजिंगची ऑनलाईन बुकींग केली जाते . परंतु , कित्येक रुम अशाच पडुन आहेत .
दरवर्षी दिवाळीच्या मोसमात अनेक पर्यटक श्रीवर्धन तालुक्यातील निसर्गरम्य समुद्र किनारे पहायला येत असतात . त्यामुळे समुद्र किनारे गजबजलेले दिसुन येतात . समुद्र किनाऱ्यावर विक्री करत असलेले विविध खाद्य पदार्थ विक्रेतेही पर्यटकांच्या अजुनही प्रतिक्षेत आहेत . एकदा सुट्टी संपली की फक्त शनिवार रविवार अशा सुट्यांमध्येच परीसर फुलुन गेलेला असतो . अशीच स्थिती राहिली तर लॉजिंग , खानावळ व समुद्र किनारी आनंद लुटायला उपलब्ध करुन देणारे बोटींग वाले ह्या सर्वांनाच मंदीचा सामना करावा लागेल . कारण मजुरी करणाऱ्या लोकांना संध्याकाळी मजुरी तर द्यावी लागते . पण पर्यटक नसल्यामुळे उत्पन्नावर परिणाम झाल्याने अडचणीत सापडले आहेत . आनंद लुटायला आल्यावर जेवणाची पहिली पसंदी असते ती अर्थातच मासळीला . पण पर्टकच नाहीत तर मासळीला भाव मिळणार कुठुन हा ही प्रश्न उपस्थित झाला आहे . कोकणात येऊन मासे खाण्याचा आनंद काही वेगळाच अनुभव देऊन जातो . पण पर्यटकच नाहीत तर मच्छी खरेदी करणार कोण ? कारण बरेच खानावळवाले मासे खरेदी करुन ठेवतात , सिझनमध्ये मासे महाग होतात . म्हणुन भरडखोल , आदगांव , दिघी , जीवना या ठिकाणी जाऊन मासे खरेदी करुन आणुन ठेवली जाते . मात्र या वेळी मासेमार कोळी बांधवांना ही पर्यटक मंदीचा फटका बसला आहे .
दिवेआगरच्या व्यावसायिकांची परिस्थिती यंदा अतिशय वाईट असुन गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ६० टक्केही पर्यटक दिवेआगारमध्ये आले नाहीत . दिवाळीच्या आधीच काही पर्यटकांनी बुकींग केली होती . पण प्रचंड पाऊस आणि क्यार वादळामुळे पर्यटकांनी बुकींग रद्द केल्याने व्यवसायावर परिणाम झाला आहे . आणखी कारण म्हणजेच जागतिक मंदीमुळे लोकं बाहेर पडायला मागत नाहीत , त्यामध्ये कोकणाकडे येणारे रस्ते भयंकर खराब असल्यामुळे काळजी म्हणुन बरेचसे लोक आपल्या परिवाराचा जीव धोक्यात टाकत नाहीत . शक्यतो यायचे टाळतात .
-उदय बापट , दिवेआगर , सरपंच
Post a Comment