प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
यंदाच्या वर्षात झालेल्या विक्रमी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सुरुवातीला मान्सूनच्या आगमनात भातशेतीला फटका बसला होता. आता परतीच्या पावसातही भातशेतीचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. राज्य सरकारच्या कृषी विभागाने परतीच्या पावसात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत, मात्र वर्षभरात दुसऱ्यांदा झालेल्या नुकसानीचा परतावा मिळेल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यंदाचे वर्ष मान्सूनसाठी विक्रमी ठरले. जुलैच्या अखेरीस सुरू झालेला पाऊस ऑक्टोबर शेवटपर्यंत संपलेला दिसत नाही. त्यामुळे कोकणात भातशेतीचे मोठे नुकसान झाले.
भातपिकासह जनावरांचा चाराही झाला खराब असल्याने संपूर्ण कोकणातील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.कापून ठेवलेले भातपीक पावसामुळे शेतातच असल्याने भाताला कोंब आले आहेत तर पेंढाही काळाभोर पडला असून तो जनावरांना खाण्यास योग्य राहिला नाही.
यावर्षी पाऊस समाधानकारक पडला असल्याने उत्पन्न चांगले होते. भातपीक सर्वत्र पिवळ्या सोन्यासारखे चमकत होते. मात्र परतीच्या पावसाने या सोन्यासारख्या भातपिकाचे होत्याचे नव्हते करून ठेवले. दहा दिवसांपूर्वी कडक ऊन पडल्याने शेतकऱ्यांनी भाताची कापणी सुरू केली होती. कापणी केलेल्या भाताची कडपे दोन दिवस उन्हात सुकण्यासाठी ठेवली असता परतीच्या पावसाने सुरुवात केली. लोंब्यामधील भाताचे दाणे परिपक्व असल्याने या दाण्यांना शेतातच कोंब फुटू लागले आहेत. भात तर खराब झालेच, पण जनावरांचा पेंढाही काळाभोर पडला आहे.
तालुक्यातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले असून जनावरांचा पेंढा ही पावसाने खराब केला आहे त्यामुळे आज च्या परिस्थितीत शासनाने पंचनामे करून शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी.
भालचंद्र गणेकर, सामाजिक कार्यकर्ते, म्हसळा
Post a Comment