( म्हसळा प्रतिनिधी)- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती निमित्ताने ‘स्वच्छता हिच सेवा’ हा उपक्रम जिल्ह्यात राबविला जात आहे. 2 ऑक्टोंबर 2019 हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी स्वच्छतेची प्रतिज्ञा घेऊन जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात प्लास्टिक कचरा संकलन मोहिम राबविण्यात येणार असून जिल्ह्यातील सर्व नागरीकांनी प्लास्टिकमुक्त मोहिमेत सहभागी होऊन जिल्हा प्लास्टिकमुक्त करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी केले.
डॉ.सूर्यवंशी म्हणाले, 2 ऑक्टोंबर पासून जिल्ह्यात सर्व शासकीय कार्यालय, सार्वजनिक ठिकाणे तसेच प्रत्येक घरा-घरात श्रमदान करुन प्लास्टिक कचरा संकलन मोहिम राबविण्यात येणार आहे. प्लास्टिक कचरा संकलन मोहिमेतून गोळा केलेला प्लास्टिक कचरा संकलन केंद्रामध्ये नेला जाईल. 2 ऑक्टोंबर ते 27 ऑक्टोंबर या कालावधीत वेचण्यात आलेल्या प्लास्टिक कचऱ्याचे परिणामकारकरित्या पुनर्चक्रण व विल्हेवाट करण्यात येईल. या अनुषंगाने 2 ऑक्टोंबर या दिवशी सामुहिक श्रम दान करावे व श्रमदानातून प्लास्टिक गोळा करुन शासकीय कार्यालय/ निमशासकीय कार्यालय प्लास्टिक मुक्त करण्यात यावे.

Post a Comment