श्रीवर्धन तालुक्यातील वेळास ,कुडगाव व दिघी रस्त्याची दुर्दशा


श्रीवर्धन तालुक्यातील वेळास ,कुडगाव व  दिघी रस्त्याची दुर्दशा : पर्यटन व्यवसायावर विपरीत परिणाम ; पावसाळा समाप्ती नंतर अदयाप डागडुजी नाही 

श्रीवर्धन प्रतिनिधी : संतोष सापते 

  रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुका पर्यटनाचा केंद्र बिंदू बनला आहे.पर्यटन स्थळाच्या  विकासासाठी  रस्ते हा महत्वाचा घटक मानला जातो .मात्र दिघी ते श्रीवर्धन रस्त्यावर अनेक ठिकाणी रस्त्याची अक्षरशः चाळण झाल्याची निदर्शनांस येत आहे .
दिघी गावाच्या जवळच जंजिरा किल्ला आहे .जंजिरा किल्ला हा समुद्रात बांधलेला आहे . जंजिरा स्थापत्य कलेचा  उत्कृष्ट नमुना आहे .छत्रपती शिवाजी महाराजांनी 16 व्या शतकात स्वराज्य निर्मिती केली तेव्हा पासून महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील प्रत्येक सत्तेच्या आकर्षणाचा जंजिरा केंद्र बिंदू मानला जातो .आजमितीस देशातील विविध राज्यांतून पर्यटक जंजिरा बघण्यासाठी येतात .श्रीवर्धन दिघी 30 किमी चे अंतर आहे . जे पर्यटक श्रीवर्धन मधील हरिहरेश्वर , दिवेआगार स्थित  मंदिराला भेटी साठी येतात ते आवर्जून जंजिरा किल्ल्याला भेट देतात .दिघी पासून जलवाहतुकीची सोय उपलब्ध असल्याने अवघ्या 20 मिनिटात किल्ल्या पर्यंत पोहचता येते .त्यामुळे पर्यटक श्रीवर्धन , बोर्लीपंचतन ,गोनघरफाटा मार्गे  कुडगाव ते दिघी प्रवास करणे पसंत करतात .परंतु आजमितीस सदरच्या रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली आहे . त्याचा परिणाम पर्यटनावर होत आहे .पुणे , मुबंई मधील पर्यटक रविवार सुट्टीसाठी श्रीवर्धन ची निवड करतात .पुणे ते ताम्हणी , माणगाव , साई मार्गे   श्रीवर्धन 168 किमी चे अंतर आहे .मुंबई,पनवेल , पेण , माणगाव , साई मार्गे श्रीवर्धन 198 किमी चे अंतर आहे .साधारणतः 5 तासात पर्यटक श्रीवर्धन मध्ये पोहचतात .श्रीवर्धन तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांची दुर्दशा झाली आहे.मुरुड , अलिबाग , पेण , रेवदंडा स्थित श्रीवर्धन मधील रहिवाश्यांना समुद्र मार्गे  दिघी आल्या नंतर दिघी ते श्रीवर्धन रस्त्याच्या दुरावस्थेचा प्रचंड त्रास होत आहे .सदरचे 30 किमी चे अंतर पार करण्यासाठी जवळपास दीड तास लागत असल्याने श्रीवर्धन मधील जनता संताप व्यक्त करत आहे .वेळास , कुडगाव , व दिघी गावाच्या हद्दीत रस्त्यावर खड्डे पडले आहेत .त्यामुळे दुचाकी स्वाराला गाडी चालवताना असंख्य अडचणी येत आहेत .सदरचा रस्ता राष्ट्रीय महामार्गात समाविष्ट करण्यात आला .माणगाव ते वडवली गावाच्या हद्दी पर्यंत महामार्गाचे काम आले आहे .त्या कारणे सदरचे काम पूर्णत्वास कधी जाणार हा प्रश्न निर्माण झाला आहे .जो पर्यंत काम पूर्णत्वास जात नाही तो पर्यंत कमीत कमी  आहे त्या रस्ताची तात्पुरती डागडुजी करण्यात यावी जेणे करून प्रवाशी वाहतुक सुरळीत पार पडेल अशी मागणी स्थानिक जनता करत आहे .

मी प्रत्येक आठवडा सुट्टीला माझी दुचाकी घेऊन  मुरुडला गावी  जातो . वेळास  ते दिघी रस्ता  अतिशय खराब झाला आहे .रस्त्यावर अनेक  खड्डे पडले आहेत वेळीच रस्त्याचे काम केले नाही तर प्राणांतिक अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाहीत.
संदिप गुरव ( रहिवाशी मुरुड )


दिघी हा राष्ट्रीय महामार्ग झाला आहे त्या कारणे तो आमच्या अखत्यारीत येत नाही.
श्रीकांत गणगणे (अभियंता -   सार्वजनिक बांधकाम खाते श्रीवर्धन  )

वेळास ते दिघी रस्त्याच्या दुरावस्थेचा  सर्व स्थानिकांना त्रास होत आहे .आम्ही माणगाव , श्रीवर्धन मधील बांधकाम खात्याला त्या विषयी कळवले आहे मात्र त्यांच्या कडून अद्याप काहीच उत्तर आले नाही तसेच दिघी पोर्ट ला   खड्डे बुजविण्यासाठी कळवले आहे .स्थानिक जनता आंदोलनाच्या पावित्र्यात आहे.
मधुकर भालदार (ग्रामसेवक दिघी ग्रामपंचायत )

दिघी रस्त्याचे काम लवकरात लवकर करण्यात यावे .कारण सदर मार्गावरून प्रवाशी वाहतुक नियमित चालते .रस्ता खराब असल्याने त्याचा परिणाम बस च्या क्षमतेवर होत आहे.
राजेंद्र बडे ( एस टी चालक श्रीवर्धन आगार )

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा