अपक्ष अनंत गीते यांच्यावर शिवसेनेचा सर्जिकल स्ट्राइक


म्हसळा : प्रतिनिधी
शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांच्या विरोधात , त्याच नावाचा अपक्ष उमेदवार उभा करून मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा डाव , शिवसेनेचे म्हसळा तालुका प्रमुख नंदू शिर्के यांनी मोठ्या खुबीने हाणून पाडला आहे. अनंत पद्मा गीते या म्हसळा तालुक्यातील तुरंबाडी येथील व्यक्तीने अपक्ष उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. उमेदवारी अर्ज दाखल करताना , दहा सूचकांच्या स्वाक्ष-या देखील या अनंत गीतेंनी घेतल्या होत्या . जर ते निवडणुकीच्या रिंगणात राहिले . असते , तर त्याचा फटका शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांना बसण्याची शक्यता होती . हा धोका टाळण्यासाठी शिवसेनेचे म्हसळा तालुका प्रमुख नंदू शिर्के यांनी अपक्ष अनंत गीते यांच्या उमेदवारी अर्जावर स्वाक्षरी करणा-या एका सूचकाला आपल्या ताब्यात घेऊन, आपली स्वाक्षरी जबरदस्तीने घेण्यात आल्याची साक्ष द्यायला लावली. आणि या साक्षीमुळे अपक्ष अनंत गीते यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिका-यांनी बाद ठरविला . त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार असलेल्या अनंत गीते यांची काही मते वाचली आहेत. शिवसेनेचे तालुका प्रमख नंद शिर्के आणि त्यांच्या सहका-यांनी अत्यंत कौशल्याने केलेला हा सर्जिकल स्ट्राईक यशस्वी झाल्यामुळे त्यांचे शिवसेनेत कौतुक होत आहे . दुसरीकडे सुनील तटकरे या नावाच्या दोन अपक्ष उमेदवारांनी दाखल केलेले उमेदवारी अर्ज वैध ठरल्यामुळे सुनील तटकरे यांची डोकेदुखी मात्र वाढली आहे . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा