म्हसळा तालुक्यात आरोग्याची सेवा सलाईनवर ग्रामीण भागातील रूग्णांचे हाल , हक्काची सेवा मिळेना , आरोग्यासाठी मोजावे लागताहेत पैसे
म्हसळा : महेश पवार
म्हसळा तालुक्यातील आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला असून तालुक्यामध्ये एकूण नऊ उपकेंद्र असूनही ग्रामीण भागात आरोग्याला उतरती कळा लागली आहे . म्हसळा ग्रामीण रूग्णालय सुरू झाल्यापासून म्हसळा आरोग्य केंद्र व ग्रामीण रूग्णालय हे दोघेही एकत्रच आहेत . मात्र आरोग्य केंद्र असताना तालुकाच्या उपकेंद्रामधील आरोग्य सेविका शहरातच काम करायच्या परंतू आता ग्रामीण रूग्णालय कार्यरत असताना , त्यांचा कर्मचारी पुरेपुर असताना या आरोग्य सेविका मात्र आपल्या नेमून दिलेल्या उपकेंद्रात न जाता त्या ग्रामीण रूग्णालयात दिसतात . त्यांनी त्यांच्या दिलेल्या उपकेंद्रात राहून २४ तास सेवा देणे बंधनकारक असताना येथील तालुका आरोग्य अधिकारी यांचा अंकुश नसल्याचे बोलले जात आहे . आबेत उपकेंद्रात काम करणा-या आरोग्य सेविका ३० ते ४० किलोमिटर खरसई ठिकाणी रहातात . लिपणी वावे व मेंदडी मधील श्रीवर्धन तालुक्यात मध्ये राहतात . खामगाव , जांभूळ , वारळ येथे काम करणाच्या बोर्ली शिस्ते ठिकाणी राहतात . खामगाव मध्ये वैदयकीय अधिकारी वगळता बाकी कर्मचारी येऊन जाऊन सेवा देतात रात्री दवाखाना बंद असल्याने गोरेगाव , म्हसळा शहरात धाव घ्यावी लागते . तळवडे येथे काम करणा-या दिवेआगार मध्ये राहतात . नेवरूळ व खरसई येथे काम करणा-या म्हसळा येथे राहतात . तर पाभरे येथे काम करणा-या माणगाव मध्ये राहतात . जनतेची सेवा करायची कुणी , शासनाच्या आदेशानुसार त्या ज्या गावी उपकेंद्र आहे , त्या गावी राहणे सक्तीचे असताना त्या आपल्या गावी अन्य ठिकाणी रहातात . अशी अवस्था असल्याने आज शासनाने बांधलेले उपकेंद्र मोडकळीस आले . पर्यायाने त्या परिसरातील नागरिकांना शुल्लक कारणासाठी देखील तालुक्याची वाट धरावी लागते . यापैकी म्हसळा शहरापासून काही अंतरावर असणारे नेवरूळ उपकेंद्र गेली ३ वर्षापक्षा बंद अवस्थेमध्ये पडले आहे . त्या उपकेंद्राचे उद्घाटन ६ जून २००५ रोजी झाले असून आता पहाता ती इमारत जणू जंगलात झाडाझुडपाने आच्छादली आहे . या भागातील नेवरूळ या उपकेंद्रामध्ये नेवरूळ घूम , रुद्रवट , कोकबळ , ठाकरोली , सांगवड , सावर अशी गावे प्रविष्ट असून त्या गावांतील एकूण लोकसंख्या २ , ६४५ एवढ्या नागरिकांसाठी उपकेंद्राची निर्मिती केली . सद्यस्थितीत तेथील अवस्था अतिशय बिकट आहे . इमारतीचे उद्घाटन प्रसंगी जिल्हापरिषद उपाध्यक्ष , माजी गृहराज्य मंत्री , आरोग्य सभापती , जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या साक्षीने इमारतीचे उद्घाटन करून जनतेच्या सेवेसाठी खुली करून देण्यात आली . ग्रामीण भागातील नागरिकांना सोईचे असणारे आरोग्य उपकेंद्र आता पहाता बंद अवस्थेमध्ये असल्याने तेथील नागरिकांना म्हसळा आरोग्य केंद्रात धाव घ्यावी लागते . सांगवड सारख्या गावातून एखादा नागरिक उपकेंद्रात आणायचा म्हटल्यावर सोईचे होते . परंतु आता तेच आजारी रुग्ण म्हसळा सारख्या ठिकाणी पायपीट करून आणावे लागते . सामान्य माणसाच्या या परवडीला वाली कोण हा प्रश्न आहे . त्याचप्रमाणे जांभूळ उपकेंद्रामध्ये गेले काही महिने आरोग्य सेविका नसल्याने त्याही उपकेंद्रामध्ये शुकशुकाट आहे . जांभूळ हा डोंगराळ भागात वसला आहे . त्याठिकाणी उपकेंद्रामध्ये खारगाव बुद्रुक , सकलप , सालविंडे , सुरई , पाभरे , चिचोंडे , दगम , निगडी , कांदळवाडा , अशी गावाच्या लोकसंख्या ८ , ७५४ इतकी येते . या उपकेंद्रातून सबंधीत गावातील गरोदर माता त्यांचे लसीकरण , तसेच प्रसुती , रक्तशय व अन्य ३४ प्रकारचे कामे आरोग्य सेविकाला कराव्या लागतात . परंतु जांभूळ उपकेंद्रामध्ये ज्या गावांचा समावेश केला आहे , ती गावे जांभूळ गावाच्या अनेक मैल अंतरावर वसली आहेत . त्याठिकाणी असणा - या आरोग्यसेविका यांना एवढ्या गावातील नागरिकांना विविध प्रकारचे लसीकरण व अन्य प्रकारचे कामे करावी लागतात . मग जर त्या उपकेंद्रात एक आरोग्य सेविका असेल तर एवढ्या सुविधा जनतेला देणे आणि त्या ठिकाणी येणारे रुग्ण पाहणे म्हणजे फक्त उंटावरून शेळ्या हाकणे असा प्रकार होईल , या भागात उपकेंद्र बंद असल्याबाबत त्या गावचे सरपंच तुकाराम महाडिक यांनी वेळोवेळी तालुका आरोग्य अधिकारी यांची भेट घेऊन व लेखी पत्र दिले . तरी देखील कोणतेही काम तालुका आरोग्य अधिका - याने केली नसल्याने त्या भागातील नागरिकांच्या होणा-या गैरसोइला आरोग्य विभागच जबाबदार असल्याचे महाडिक यांनी सांगितले . त्याचप्रमाणे मेंदडी गावातील उपकेंद्र जणू सलाईनवर असल्याप्रमाणे आहे . त्या ठिकाणी लाखो रुपये खर्च करून डॉक्टर , अन्य कर्मचारी यांना निवासस्थान असताना त्या निवासस्थानात राहण्यायोगे नसल्याने ती इमारत निकामी होत चालली आहे . इमारतीला तडे गेल्याने नादुरूस्त झाली आहे . निवासस्थान आजपर्यत आरोग्य विभागाच्या ताब्यात दिले नाही . तेथील राजकीय कार्यकर्ते हव्यासापोटी इमारत वर्ग करत नसल्याचे संकेत नाकारता येत नाही . त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही . त्याठिकाणी रूग्णांना औषधे बाहेरून खरेदी करावी लागतात . या विषयी रुग्ण कल्याण समिती सदस्य महेंद्र पारिख यांनी शासनाला वेळोवेळी पत्र देऊन देखील आजही अवस्था बिकट आहे . तसेच म्हसळा शहरापासून काही अंतरावर असणारे पाभरे उपकेंद्रात देखील रुग्णांकडून सेवेचे पैसे घेतले जातात . काही महिन्या पूर्वी ठिकाणी आरोग्य विभागाचा खाजगी औषधांवर छापा पडला होता . डॉक्टर वेळेत उपलब्ध होत नाहीत , पर्यायाने त्या रूग्णांना खाजगी दवाखान्यात धाव घ्यावी लागते असे असताना आजही तशाच प्रकारची अवस्था पाभरे ठिकाणी असल्याने नागरिकांना हक्काची विना शुल्क सेवा मिळत नसल्याची खंत आहे . तालुक्यात तळवडे , जांभूळ , नेवरूळ , वारळ , आंबेत , लिपणी वावे , खामगाव , मैदड़ी , खरसई परंतु म्हसळा तालुक्याच्या आरोग्याची अवस्था पहाता म्हसळ्यात नऊ उपकेंद्र असूनही अशा साच्या अवस्थेमुळे तालुक्यातील आरोग्य सेवा कोलमडली आहे . स्थानिक आमदार , खासदार फक्त सभेमध्ये भाषणे करतात , परंतु आरोग्य सेवेचा भोंगळ कारभार त्यांना पाहण्यास वेळ मिळत नाही . त्यामुळे सामान्य जनतेची आरोग्य व्यवस्था धोक्यात आली आहे .

Post a Comment