साहेब.., विकासकामे भरपूर झाली तरुणांच्या रोजगाराचे काय..?



● युती आघाडीच्या उमेदवारांना तरुणाईचा सवाल...

● 30 वर्ष शिवसेनेचे खासदार आणि 15 वर्ष राष्ट्रवादी सत्तेत..!

● आरोप प्रत्यारोप बसं झाले रोजगाराचे बोला...

म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर

    श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील दुर्गम व डोंगराळ भाग म्हणून ओळखला जाणाऱ्या म्हसळा तालुक्यात तरुणांच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. शहरापेक्षा ग्रामीण भागात लोकवस्ती जास्त प्रमाणात आहे. तालुक्यातील आंबेत गावचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅ.ए.आर.अंतुले यांनी त्यांच्या कालखंडात विकासाच्या पाऊलखुणा तालुक्यातील गावागावात नेल्या आणि तेव्हापासूनच विकास कामांची चव जनतेला चाखायला मिळू लागली. अंतुले साहेबांनी तालुक्याच्या ठिकाणापासून गावोगावी रस्ते जोडले त्याचबरोबर काही गावागावांना जोडणारे रस्ते पूर्ण केले, पिण्याच्या पाण्याच्या योजना आणल्या, शासकीय कार्यालये तयार केली अशी अनेक लोकोपयोगी कामे केली परंतु नंतर च्या काही काळात या विकास रथात सातत्य न राहिल्याने अनेक गावे विकासापासून वंचित राहिली. 
  नंतरच्या काळात रायगड जिल्ह्यातील राजकारणात अमुलाग्र बदल होत गेले 2009 च्या लोकसभा निवडणुकीत बॅ.अंतुले यांचा शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांनी पराभव केला आणि अंतुले पर्वाचा भाग संपुष्टात येऊ लागला. तर दुसरीकडे 2009 मधे श्रीवर्धन विधानसभा मतदार संघाची विभागणी झाल्यावर रायगडच्या राजकारणात सक्रिय असलेले एक वजनदार नेतृत्व सुनिल तटकरे यांना आघाडीच्या माध्यमातून श्रीवर्धन विधानसभा मतदार संघाचे तिकीट मिळाले आणि त्यांनी प्रथमच या मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार तुकाराम सुर्वे यांचा पराभव केला. या मतदारसंघात आमदार म्हणून निवडून आल्यावर सुनिल तटकरे यांना आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात विविध खात्यांचे मंत्रिपद मिळाले या मंत्रिपदाचा बुद्धी चातुर्याने पुरेपुर फायदा घेऊन तटकरे यांनी करोडो रुपये मंजूर करून आणून विकासकामे केली. 
विकासाच्या गंगेत म्हसळा तालुक्याने सुद्धा हात धुवून घेतले आणि गावागावात विकास कामांची सुनिल तटकरे यांच्या नावाची पाटी लागली. राष्ट्रवादीच्या माध्यमातून रस्ते, नळपाणी योजना, सामाजिक सभागृह, अशी पायाभूत सोयी सुविधा असणारी विकासकामे केली आहेत. दुसरीकडे शिवसेनेचे खासदार अनंत गीते यांना युतीच्या माध्यमातून केंद्रात मंत्री पद मिळाले परंतु खासदार गीते यांना म्हसळा तालुक्यातील काही मोजकीच गावे सोडली तर इतर गावातून केंद्रीय मंत्री पदाच्या दर्जाची विकास कामे करता आली नाहीत त्यामुळे 30 वर्ष खासदार व 2 वेळा केंद्रात मंत्री पदावर राहिलेल्या गीतेंना विशेष प्रभाव पाडता आला नाही याकारणामुळे म्हसळा तालुक्यात शिवसेना बॅकफूटवर गेलेली पहायला मिळत आहे. 
     सध्या रायगड लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात युतीचे उमेदवार अनंत गीते व आघाडीचे उमेदवार सुनिल तटकरे हे दोघेही दिगग्ज राष्ट्रीय नेते उभे आहेत. प्रचार सभांमधून दोघेही एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. कोणी किती विकास कामे केली हे ओरडून ओरडून जनतेला सांगत आहेत. परंतु 30 वर्ष शिवसेनेचे खासदार राहिलेले अनंत गीते व 15 वर्ष स्थानिक पंचायत समिती, जिल्हा परिषद, 10 वर्ष आमदार अशी सत्तेची पायघडी असताना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनही तालुक्यातील किती तरुणांना रोजगार, व्यवसाय उपलब्ध करून दिला असा सवाल तरुण वर्गातून उपस्थित होत आहे. तालुक्यातील एकूण मतदारांपैकी 60 टक्के युवा वर्ग आहे. आजमितीला खेडेगावात अनेक घरांना कुलूप लागलेले आहेत याचे मुख्य कारण म्हणजे स्थानिक ठिकाणी रोजगार, व्यवसाय साधने उपलब्ध नाहीत. मतदारसंघात उद्योग, प्रकल्प नाहीत. त्यामुळे तरुण वर्ग मुंबई, पुणे या शहरात स्थलांतरित होत आहेत. निवडणुकीला मुंबईवरून गाड्या भरून मतदारांना गावी आणावे लागते ही तालुक्याची शोकांतिका आहे. अनेक वर्षे स्थानिक दिग्गज मंडळी राजकारणात सक्रिय आहेत परंतु तरुण वर्गाच्या समस्या दूर करण्यात कोणालाही यश मिळालेले नाही. राजकीय पक्षांकडून निवडणुका आल्या की युवकांचा वापर करून घेतला जातो नंतर दुर्लक्ष केले जाते. 
    23 एप्रिल रोजी संपन्न होणाऱ्या 32 रायगड लोकसभा निवडणुकीत युवा मतदारांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. मागील काही दिवसांपासून सुनिल तटकरे यांची युवकांमध्ये क्रेझ निर्माण झाली आहे. जिल्ह्यात आणि स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थिती मजबूत असताना सुद्धा मागील 15 वर्षात म्हसळा तालुक्यात एकदाही रोजगार मेळावा घेण्यात आला नाही किंवा तरुणांईच्या रोजगार संदर्भात चर्चा केली जात नाही. त्याचबरोबर 30 वर्ष खासदार असलेल्या गीतेंनी सुद्धा रोजगार बाबत कधीही एक अक्षर काढले नाही किंवा शिवसेनेचे वतीने रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला नाही. त्यामुळे रोजगाराचा भीषण प्रश्न येथील तरुणांसमोर पडला आहे म्हणून आता आरोप प्रत्यारोप बस झाले साहेब आमच्या रोजगाराचे बोला अशी चर्चा तालुक्यात सुरु आहे. पायाभूत विकास करीत असताना रोजगार सुद्धा उपलब्ध होईल असे प्रकल्प आणले गेले पाहिजेत विद्यमान खासदार केंद्रात अवजड उद्योग खात्याचे मंत्री आहेत मनात आणले असते तर कितीतरी उद्योग व्यवसाय सुरू करता आले असते आणि येथील तरुणाईला रोजगार उपलब्ध करून देता आले असते पण तसे झालेले नाही. त्यामुळे 32 रायगड लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे भवितव्य तरुणाईच्या मतांवर अवलंबून आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अनेक सुशिक्षित तरुण बेरोजगार आहेत त्यांचे प्रश्न कोण सोडविणार किंवा त्यांना वाली कोण आहे हा सुद्धा प्रश्न निर्माण झाला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा