आदिवासी बांधवाला त्याच्या हक्काची जमीन मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर सर्वोतोपरी मदत करणार

आदिवासी बांधवाला त्याच्या हक्काची जमीन मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर सर्वोतोपरी मदत करणार, म्हसळा येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त कार्यक्रमात तहसीलदार रामदास झळके यांचे प्रतिपादन
म्हसळा : सुशील यादव
आदिवासी बांधवाला त्याच्या हक्काची जमीन मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर सर्वोतोपरी मदत करणार असे प्रतिपादन तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी रामदास झळके यांनी ९ ऑगस्ट रोजी म्हसळा आदिवासीवाडी येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन ‘ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रीबल’ शाखा, रायगड या संस्थेने केले होते. या कार्यक्रम प्रसंगी तहसील कार्यालय म्हसळा तर्फे म्हसळा तालुक्यातील आदिवासी बांधवांना त्यांच्या हक्काच्या जमिनीच्या नव्याने तयार केलेल्या सात बाराचे वाटप करण्यात आले. आपल्या नावाचा सात बारा पाहून आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून येत होता. सदर कार्यक्रम प्रसंगी माजी नगराध्यक्ष दिलीप कांबळे यांनी या संघटनेचे तोंड भरून कौतुक केले. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणाऱ्या पंचायत समितीच्या सभापती उज्वला सावंत यांनी ‘शिकाल तर टिकाल’ हा मोलाचा सल्ला आदिवासी बांधवाना दिला. प्रत्येक आदिवासी बांधवाने आपापल्या मुला मुलीला शिक्षण दिलेच पाहिजे तरच आदिवासी बांधवाना आपल्या हक्काची माहिती होईल. जर शिक्षण नसेल तर शासकीय योजनांची माहिती आत्मसात करण्यास फार कठीण जाते अशा त्या म्हणाल्या. तर उप सभापती मधुकर गायकर म्हणाले की ‘३० वर्षापुर्विचा आदिवासी समाज आणि आत्ताचा आदिवासी समाज यात बराच फरक आहे. आत्ताच्या आदिवासी समाजाच्या राहणीमानात फारच सुधारणा दिसून येत आहे हे पाहून खूप बरे वाटत आहे. आपल्या काही अडचणी असतील तर दूर करण्यासाठी मी नेहमी आपल्या सेवेसी तत्पर असेन. असेही ते आवर्जून म्हणाले. नगराध्यक्षा कविता बोरकर यांनीही आयोजकांचे तोंड भरून कौतुक केले.म्हसळा मंडळाधिकारी कल्याण देऊळगावकर यांनी विविध शासकीय योजनांची माहिती दिली व सातबारा वाचन केले व त्यानंतर उपस्थित  मान्यवरांच्या हस्ते सातबाराचे वाटप करण्यात आले. तसेच म्हसळा तालुक्याचे माजी तहसीलदार वीरसिंग वसावे यांचा संस्थेचे सल्लागार म्हणून विशेष सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रम प्रसंगी तहसीलदार रामदास झळके, सभापती उज्वला सावंत, नगराध्यक्षा कविता बोरकर, माजी नगराध्यक्ष दिलीप कांबळे, नायब तहसीलदार टी.एन. भिंगारे, मंडळ अधिकारी कल्याण देऊळगावकर, तलाठी शहा, स्वी. नगरसेवक संजय दिवेकर, आरोग्य विभागाचे म्हात्रे, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ‘ऑर्गनायझेशन फॉर राईटस ऑफ ट्रीबल’ शाखा, रायगड या संस्थेनचे अध्यक्ष जगदीश नाईक, उपाध्यक्ष यशवंत पवार, कार्याध्यक्ष विष्णू साबळे, मणिलाल वसावे, गाव अध्यक्ष प्रकाश पवार, लक्ष्मण जाधव, मालुसरे सर संस्थेचे सर्व सदस्य व म्हसळा आदिवासी वाडीवरील ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले.    
 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा