कोकणाचा सविस्तर परिचय...कोकण पर्यटन


 

कोकणाचा सविस्तर परिचय !!
कोकणातील पायवाटा धुंडाळून सागरकिनाऱ्यावरील, माड-पोफळीच्या सावलीत लपलेल्या ठिकाणांचा घेतलेला शोध म्हणजेच पराग पिंपळे यांची "साद सागराची' ही पुस्तक मालिका. एका हातात हे पुस्तक आणि दुसऱ्या हातात संपर्कासाठी मोबाईल असेल, तर पर्यटक कुठेही असू दे.. त्याला कोकणात खेचून आणण्याची ताकद या पुस्तकात नक्कीच आहे.
कोकणचा निसर्ग भुरळ पाडणारा. प्रत्येक ऋतूमध्ये वेगळा दिसणारा. दिवसा-रात्रीही या निसर्गाचे रूप बदलणारे. समुद्राच्या अंगावर येणाऱ्या मोठमोठ्या लाटा, समुद्रकिनाऱ्यावरून दिसणारा सूर्यास्त, या सगळ्या गोष्टीसुद्धा तितक्‍याच वेगळ्या. अर्थात, जो या निसर्गाकडे एकाच नजरेने पाहतो; त्याला हे वेगळेपण जाणवणार नाही. याच ठिकाणांकडे जो विविधांगी नजरेतून पाहतो त्याच्यासाठी कोकण म्हणजे सौंदर्याची खाण आहे. कोकणातील undiscovered ठिकाणांची सफर घडविण्याचे काम पुण्यातील पराग पिंपळे यांनी "साद सागराची' या पुस्तकांतून केले आहे. कोकणात कामानिमित्त गेले असता, या निसर्गाच्या ते प्रेमात पडले. तेव्हाच त्यांच्या मनात आले, की "खऱ्या' कोकणची पर्यटकांना ओळख करून दिली पाहिजे. कोकण तसे त्यांनाही अनोळखीच. कोकणाची ओळख करून घेण्यासाठी त्यांनी मोटरसायकलला किक मारली आणि भटकंती सुरू केली. सोयीसाठी त्यांनी कोकणचे अलिबाग-मुरूड-जंजिरा, श्रीवर्धन-हरिहरेश्‍वर-दिवेआगर, दापोली-मुरूड-कर्दे, गुहागर-वेळणेश्‍वर-हेदवी, रत्नागिरी-गणपतीपुळे असे सहा भाग केले. गळ्यात कॅमेरा. पाठीवर सॅक अडकवून रेवस ते रेड्डी असा 700 किलोमीटरचा पट्टा मोटारसायकलने त्यांनी अक्षरश: पिंजून काढला आहे. प्रत्येक भागात 3-4 दिवस मुक्काम ठोकून नव्या ठिकाणांचा घेतलेला हा शोध आहे. यासाठी कोकणच्या कित्येक वाऱ्या त्यांनी केल्या. अंतरे पार करताना कोणते ठिकाण किती किलोमीटरवर आहे, यात अचूकता येण्यासाठी स्पीडोमीटरवरील रिडिंग्ज वेळोवेळी डायरीत नोंदवली. ज्ञात-अज्ञात ठिकाणांना वारंवार भेटी देऊन त्या ठिकाणाचे महत्त्व जाणून घेतले. कोणता भाग कोणत्या सीझनमध्ये पाहावा, याची तपशीलवार व अचूक निरीक्षणे नोंदवली. त्यासाठी एकच ठिकाण प्रत्येक ऋतूत; दिवसा-रात्री अशा वेगवेगळ्या वेळेत जाऊन कसे दिसते, हे पाहिले. त्यातील जी "बेस्ट' वेळ आहे. तीच त्यांनी पुस्तकांतून पर्यटकांना सुचवलेली आहे. अशा कित्येक नोंदी "साद सागराची' या पुस्तकात आहेत. या नोंदी करताना प्रत्येक "स्पॉट' कोणत्यावेळी कसा दिसेल, हे कॅमेऱ्यात "क्‍लिक' करायलाही ते विसरलेले नाहीत. सगळे व्याप सांभाळून एकेक विभाग फिरण्यासाठी जवळपास एकेक वर्षाचा कालावधी त्यांना लागला. कधी पत्नी वर्षा हिला सोबत घेऊन, कधी ज्याची साथ मिळेल त्याला सोबत घेऊन; तर कधी एकट्याने केलेली ही भटकंती आहे. यात एकदा कोकणच्या जंगलातून फिरताना लांडग्यांनी पाठलाग केला... कधी अजगरच वाटेवर भेटला. बिबट्याची थेट नजरानजर झाली... अशा कितीतरी गोष्टी घडल्या. हे सगळे कशासाठी? तर एकाच गोष्टीसाठी ते म्हणजे पर्यटकांना सजग करण्यासाठी. कोकणचा निसर्ग आवर्जून "बघायला या' हे सांगण्यासाठी. अलिबाग, मुरूड जंजिरा, किल्ले सिंधुदुर्ग, श्रीवर्धन, गुहागर, गणपती-पुळे अशी बोटावर मोजण्याइतकी चार-दोन ठिकाणे म्हणजे कोकण-दर्शन नाही. पर्यटन म्हणून एखादे ठिकाण विकसित होण्यासाठी निसर्ग, ऐतिहासिक वारसा, ग्रामसंस्कृती या तीन गोष्टी आवश्‍यक असतात. या सर्व गोष्टींचा मिलाफ कोकणामध्ये आहे. हे असूनही कोकणचा पर्यटनस्थळ म्हणून म्हणावा तसा विकास झाला नाही आणि जो झाला तो फक्त ठराविक ठिकाणांपुरताच मर्यादित राहिला. पिंपळे यांनी हीच गोष्ट हेरली. गोपाळगड, धोपावे, पालशेत, बुधलसडा, नवलाई धबधबा, काताळे जेट्टी, पाजपांढरी, केळशी, वेळास, आवास अशी अनेक ठिकाणे पर्यटकांपासून अजूनही दूर आहेत. या ठिकाणांची माहिती पर्यटकांना होण्यासाठी आणि "न पोचलेले' कोकण जगासमोर येण्यासाठी या पुस्तकाची निश्‍चितच मदत होईल. 
पर्यटक मार्गदर्शनाची अनेक पुस्तके बाजारात असूनही "साद सागराची' पुस्तक सरस ठरते; ते या पुस्तकात असलेले बारकावे आणि लेखनशैली यामुळेच. पर्यटकाला आवश्‍यक असणाऱ्या गोष्टी ः जायचे कसे, राहण्या-खाण्याच्या सोयी, काय पाहाल याची तर माहिती पिंपळे यांनी दिली आहेच; पण एवढ्यावरच न थांबता त्यांनी हॉटेल, लॉज, पोलिस स्थानके, रुग्णालये, पेट्रोल पंप यांचे पत्ते-फोन नंबर याची भली मोठी यादीच पुस्तकात दिली आहे. पर्यटकांना त्रास होऊ नये यासाठी जेवणाची, राहण्याची व्यवस्था चांगली असलेल्यांचीच नावे पुस्तकांत समाविष्ट करण्यात आलेली आहेत. या यादीतील प्रत्येक ठिकाणी पिंपळे स्वतः जाऊन आले, जेवणाची-राहण्याची व्यवस्था चांगली असल्याची खात्री केल्यानंतरच त्यांनी त्याचा समावेश पुस्तकात केला. "टूर प्लॅनिंग' हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणता येईल. हाताशी वेळ असूनही नियोजनाअभावी अनेक ठिकाणे पाहता येत नाहीत. हे लक्षात घेऊन दोन-तीन दिवसांची टूर "प्लॅन' करून दिली आहे. ठिकाणे कोणत्या क्रमाने पाहावीत, दिवसाच्या कोणत्या वेळेत पाहावीत, कुठे मुक्काम करायचा, असे नियोजन यात करून दिले आहे. एका सामान्य पर्यटकाला काय हवे या जिज्ञासेतून हे लिखाण केल्याने त्यात पर्यटकांना "जे जे हवे ते ते' आले आहे. 
स्थळ-ठिकाणांची माहिती देताना, कोणत्याही नवख्या ठिकाणी गेल्यावर ज्या क्रमाने व जे पहिल्यांदा सहज नजरेसमोर येते त्या क्रमानेच या नोंदी केलेल्या आहेत. या नोंदींचा उल्लेख करताना त्या ठिकाणासंबंधी एखादी ऐकीव कथा, मंदिर-गड असल्यास त्याची बांधणी-रचना यांचे उल्लेख मधे मधे पेरले आहेत. या वर्णनाने ते ठिकाण पाहण्याची वाचकांची उत्सुकता अधिकच वाढते.

"साद सागराची' या मालिकेतील सहा पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. या पुस्तकांमध्ये ओघाने आलेले काही उल्लेख आपली "नजर' बदलायला भाग पाडतात आणि परिणामाच्या कारणापर्यंत घेऊन जातात. यातील एक उल्लेख असा ः अनेक सागरकिनाऱ्यांचा उल्लेख "धोकादायक समुद्र' अशा पद्धतीने केला जातो. "धोकादायक' असा शिक्का मारून सागरराजाचा अपमान करू नका. त्याऐवजी भरती-ओहोटीचे गणित समजावून घ्या. स्थानिकांच्या मदतीने या स्थानाची माहिती करून घ्या. साधारणपणे तिथीच्या पाऊणपट अधिक एक ही भरती किंवा ओहोटीची वेळ असते. ओहोटी पूर्ण झाली, की भरतीला सुरवात होऊन ती सहा तासांनी पूर्ण होते. नंतरची अकरा मिनिटे पाणी स्थिर असते. त्याला "सवार' म्हणतात. भरती पूर्ण झाल्यावर ओहोटी सुरू होते. भरती-ओहोटी चंद्राच्या उदयावर अवलंबून असते. 
कोकणाची वाट न्‌ वाट पालथी घातल्यानंतर पर्यटन कसे असावे, याचे नेमके भान पिंपळे यांना आहे. "समुद्र-दारू-मासे' या गोष्टीभोवतीच कोकणचे पर्यटन फिरते आहे, असे त्यांचे निरीक्षण आहे. त्यासाठी ठिकाणे पाहताना पर्यटकांची मानसिकता काय असावी, याचे मार्गदर्शनही पुस्तकांतून ते करतात. कोकणात जायचे आणि कोकणमेवा न खाताच परत यायचे; हे जरा चुकीचेच नाही का? कोकणमेव्याची भूक भागविणाऱ्या दुकानांची नावेही पुस्तकात आहेत. कोकणातील पर्यटन विकास करायचा असेल, तर स्थानिकांना प्राधान्य दिले पाहिजे. विकास करताना इथल्या संस्कृतीला धक्का लागणार नाही याची काळजीही घेतली पाहिजे, असे ते सांगतात. 
पर्यटकांना केवळ ठिकाणांची माहिती देणे, हा या पुस्तकाचा उद्देश नाहीच; तर कोकणातील निसर्गसौंदर्य अनुभवावे, येथील गड, किल्ले, गुहा, प्राचीन मंदिरे, बंदरे अशी ऐतिहासिक ठिकाणे पाहण्यापेक्षा अनुभवावी. कोकणी माणसाशी, संस्कृतीशी या निमित्ताने जवळीक करावी. पर्यटनाच्या निमित्ताने का होईना कोकणाशी नाते जोडावे या भावनेने पिंपळे यांनी लिखाण केले आहे. "साद सागराची' मालिकेतील कोकणाविषयीची ही सहा पुस्तके पर्यटकांच्या हातात असतील तर कोकणाशी नाते जोडायला वेळ लागणार नाही.

नकाशे आणि छायाचित्रे 
प्रत्येक पुस्तकात दोन पानांचा मोठा नकाशा आहे. पुस्तकातील नकाशे काढताना पिंपळे यांनी कोणत्याही छापील नकाशाचा आधार घेतलेला नाही हे विशेष! स्वतः फिरून, वाटेतील ठिकाणांचा अंदाज घेऊन त्यांनी प्रत्येक नकाशा तयार केला आहे. त्यातील किलोमीटरच्या नोंदीही त्यांनी स्वतः घेतलेल्या आहेत. पुस्तकात जवळपास प्रत्येक ठिकाणाची छायाचित्रे दिलेली आहेत. ती सुद्धा त्यांनी स्वतःच "क्‍लिक' केली आहेत. कुलाबा किल्ला, खांदेरी किल्ला, उंदेरी किल्ला, सामराजगड, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग अशा किल्ल्यांचे अंतर्गत रचना दर्शविणारे "टॉप व्ह्यू'चे नकाशे पुस्तकांत आहेत. यामुळे गडाचा पूर्ण "मॅप' स्पष्ट होतो. तसेच श्रीवर्धन-हरिहरेश्‍वर-दिवेआगर, दापोली, गुहागर, मालवण, अलिबाग या परिसरातील मुख्य रस्ते, कच्चे रस्ते, या रस्त्यांवरील ठिकाणे अशी माहिती असलेले नकाशे पुस्तकांत आहेत. यामुळे परिसरातील पर्यटनाच्या नेमक्‍या जागा एका नजरेत पाहता येतात.

पक्षीजीवन 
समुद्रकिनारा, किनारपट्टीवर असलेली दाट झाडी, खडकाळ किनारे असे निसर्गवैभव असल्यामुळे वर्षभरात अनेक पक्ष्यांची कोकणात ये-जा सुरू असते. शंख-शिंपल्यांच्या, खेकड्यांच्या व सागरी जलचरांच्या अनेक जातीही येथे पाहायला मिळतात. तळहाताएवढे स्विफ्टलेट, पिवळ्या चोचींचे क्रेस्टेड टर्न, गोड गाणारा थ्रश, ऐटबाज सर्पगरुड, तांबूस पंखाच्या ब्राह्मणी घारी, व्ही आकाराची शेपटी असणारे सुरय, पक्षांची शिकार करणारे पाईड हॅरियर(शिकारपक्षी) असे असंख्य पक्षी अशा अनेक स्थलांतरित आणि स्थानिक पक्षी कुठे-केव्हा पाहायला मिळतील, याची माहिती पुस्तकात आहे. पक्षी ओळखण्यास सोयीचे जावे, यासाठी त्याचे थोडक्‍यात वर्णन दिले आहे.

कोकण पर्यटन 
मालवण-तारकर्ली - 47 ठिकाणे 
अलिबाग-मुरूड-जंजिरा - 62 ठिकाणे 
श्रीवर्धन-हरिहरेश्‍वर-दिवेआगर - 35 ठिकाणे 
गुहागर-वेळणेश्‍वर-हेदवी - 39 ठिकाणे 
दापोली-मुरूड-कर्दे-हर्णे-दाभोळ - 62 ठिकाणे 
रत्नागिरी-गणपतीपुळे - 59 ठिकाणे

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा