श्रीवर्धन शहरातील दरड प्रवण क्षेत्राची प्रशासकीय यंत्रणेकडून पहाणी नागरिकांना सावधानतेचा इशारा



 धोंडगल्ली, विठ्ठल आळी, गणेश आळी व परीट आळी सर्व क्षेत्राची पाहणी

 श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते

 सद्यस्थितीत गुरुवार शुक्रवार शनिवार तीन दिवस संबंध रायगडामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे त्या अनुषंगाने श्रीवर्धन तालुका प्रशासनाने श्रीवर्धन  शहरातील दरड प्रवण क्षेत्राची पाहणी करून सदरच्या क्षेत्रामध्ये वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. प्रांताधिकारी अमित शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीवर्धन चे तहसीलदार सचिन गोसावी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किरणकुमार मोरे , नायब तहसीलदार विपुल ढुमे व तलाठी अर्जुन भगत यांच्या पथकाने  बुधवारी श्रीवर्धन शहरातील विविध दरड प्रवण  क्षेत्रातील नागरिकांशी संवाद साधला. धोंड  गल्ली, परीट आळी, विठ्ठल आळी,   गणेश आळी  व मेटकर्णी या भागात पावसाळ्यामध्ये दरड कोसळण्याचा धोका निर्माण झालेला असतो.एस टी स्थानकाच्या लगत मेटकर्णी परिसरात मोठ्या स्वरूपात मानवी वस्ती आहे. मानवी वस्ती डोंगराच्या पायथ्याला व मध्यवर्ती आहे. धोंडगल्ली  परिसरात डोंगराच्या माथ्यावर लोकवस्ती करण्यात आली आहे. जोरदार पाऊस आणि वारा आल्यास सदरच्या ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या नागरिकांच्या जीवास धोका निर्माण होऊ शकतो. गणेश आळीच्या ढोरखाण परिसरात डोंगराच्या लगतच मानवी वस्ती आहे. तसेच जीवना बंदराच्या येथे वसलेल्या कोळीवाडयाला दरडीचा धोका आहे. श्रीवर्धन   तालुका प्रशासनाने दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांशी संवाद साधून अतिवृष्टीच्या धोक्याची कल्पना नागरिकांना दिली आहे. नगरपरिषदेने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नगरपरिषदेच्या चार शाळा  व रोहिदास सभागृह नागरिकांना आश्रयासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.

 
प्रत्येक नागरिकांनी सुरक्षितस्थळी थांबावे. अतिवृष्टीची शक्यता वर्तवली गेली आहे. प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेत नागरिकांशी प्रत्यक्षपणे संवाद साधला आहे. व त्यांना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिले आहे. नागरिकांनी सहकार्य करावे व योग्य स्थळी थांबावे.... सचिन गोसावी तहसीलदार श्रीवर्धन

 श्रीवर्धन शहरातील दरड प्रवण क्षेत्राची पाहणी केली आहे. आपत्तीच्या दृष्टिकोनातून नगरपरिषदेने योग्य ती सर्व तयारी केली आहे. नागरिकांच्या निवाऱ्यासाठी नगरपरिषदेच्या  शाळा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.... किरण कुमार मोरे मुख्याधिकारी श्रीवर्धन नगरपरिषद.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा