नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन
टीम म्हसळा लाईव्ह
अरबी समुद्रात तयार झालेले "ताऊक्ते" चक्रीवादळ व त्या संदर्भातील सुरक्षेसंबंधी जिल्हा प्रशासन करीत असलेली कार्यवाही तसेच नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी याबाबत जिल्हाधिकारी निधी चौधरी व पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून आज सायंकाळी जनतेशी थेट संवाद साधला.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सदस्य सचिव डॉ.पद्मश्री बैनाडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक, राज्य माहिती व तंत्रज्ञान विभागाचे श्री.शार्दुल भोईर, कौस्तुभ पाटील हे उपस्थित होते.
या संवादादरम्यान जिल्हाधिकारी निधी चौधरी म्हणाल्या की "ताऊक्ते" चक्रीवादळ 60 किलोमीटर प्रति तास वेगाने वाहणार आहेत. यावेळी जोरदार वारा वाहण्याची व मुसळधार पावसाची शक्यता आहे. विद्युत विभागाला आवश्यक त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. मागच्या वर्षीच्या निसर्ग चक्रीवादळादरम्यान आलेल्या अनुभवावरुन आरोग्य यंत्रणेने, महावितरणने रुग्णालयांमध्ये आवश्यक त्या सुविधा अखंडित सुरू ठेवण्यासाठी सतर्क राहावे. निसर्ग चक्रीवादळाच्या वेळी शासनाने दिलेल्या सूचना पाळून जनतेने दिलेल्या सकारात्मक प्रतिसादासारखाच यावेळीही प्रतिसाद द्यावा, यामुळे मनुष्यहानीसारखी दुर्घटना होणार नाही. नागरिकांनी अनावश्यक कारणासाठी घराबाहेर पडू नये. सुरक्षित ठिकाणी राहावे. कौलारू घरे, आरसीसी स्लॅबची घरे निश्चितच सुरक्षित आहेत. त्याचा आसरा घ्यावा. समुद्रकिनाऱ्यावरील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे. कच्ची घरे दरडग्रस्त भागातील घरे, आदिवासी भागातील कच्ची घरे येथील लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. गृह विलगीकरण असलेले रुग्ण जर कच्च्या घरात राहत असतील तर त्यांना स्थानिक प्रशासनाच्या मदतीने नजिकच्या रुग्णालयात हलविण्यात येईल. जनतेने पाऊस, वारा सुरू असताना मोबाईलवरून फोटो, व्हिडिओ काढू नयेत.
त्या पुढे म्हणाल्या, जिल्ह्यातील 62 गावे सागरी किनारी व 128 गावे खाडी किनारी आहेत. तेथील नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, प्रशासनाने सूचना दिल्यानंतरच घराबाहेर पडावे. विनाकारण घराबाहेर पडू नये. सर्वांनी काळजी घ्यावी. समुद्रकिनारी पाणी, लाटा पाहण्यास बाहेर जाऊ नये. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. विविध प्रशासकीय विभाग, खाजगी संस्था, स्वयंसेवी संस्थाना,नागरिकांना प्रशासनास मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या चक्रीवादळाचा परिणाम रत्नागिरी-सिंधुदुर्ग गोवा येथे जास्त जाणविण्याची शक्यता असून व या चक्रीवादळाचा गुजरात येथे लँड फॉल होणार आहे. आपल्या जिल्ह्यात मुसळधार पावसाची व वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याची शक्यता आहे. दिनांक 16 व 17 मे 2021 या दोन दिवशी सर्वांनी काळजी घ्यावी. मोबाईल, पॉवर बँक चार्ज करून ठेवावेत. शासनाने आपत्ती काळात कोणतेही नेटवर्क नसल्यास मोबाईल नेटवर्ककरिता बीएसएनएल नेटवर्क उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली आहे.
याशिवाय नागरिकांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने 02141-222118 ,222097, तसेच टोल फ्री नंबर -1077, व्हाट्सअप मोबाईल नंबर- 8275152363, पोलीस नियंत्रण कक्ष -02141-228473 अशी संपर्क सुविधा 24x7 कार्यान्वित ठेवली आहे, असे सांगून जिल्हाधिकारी निधी चौधरी म्हणाल्या की, या संपर्क क्रमांकावर नागरिकांनी सूचना द्याव्यात किंवा मदतीसाठी संपर्क साधावा. नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयात व्हाट्सअप नंबर किंवा मेल द्वारे सूचनाही पाठवू शकतात.
जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस विभाग तसेच जिल्हा माहिती कार्यालयाच्या सोशल मीडिया, ट्विटर हँडल यावर चक्रीवादळ किंवा जिल्ह्यातील एकूण परिस्थितीबाबतची अद्यायावत माहिती उपलब्ध करून दिली जाईल.
या आपत्कालीन परिस्थितीमध्येही पर्यावरण रक्षण करण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे. दुर्दैवाने चक्रीवादळामुळे जिल्ह्यात नुकसान झालेच तर शासकीय निकषानुसार नुकसान भरपाई देण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. महावितरण विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. आरोग्य विभाग सक्षम करण्यात आलेला असून आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी पूर्ण तयारीनिशी सज्ज आहेत.
यावेळी पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनीही नागरिकांशी संवाद साधताना सांगितले की, पोलीस विभागाची संपूर्ण तयारी झाली आहे.दळणवळण व्यवस्था व्यवस्थित सुरू राहण्यासाठी तसेच नागरिकांच्या इतर आपत्कालीन मदतीसाठी पोलीस विभागाचा टोल फ्री क्रमांक 100 कार्यान्वित राहील. पोलीस वायरलेस यंत्रणेच्या माध्यमातून जिल्ह्यात सर्वांशी संपर्कात राहणार असून अफवांवर विश्वास ठेवू नये. प्रत्येक विभागाची क्षेत्राची इत्यंभूत वस्तुनिष्ठ माहिती तयार केली जाऊन तयार करून आवश्यक त्या ठिकाणी तत्परतेने मदत पोहोचविली जाईल. नागरिकांनी परिस्थितीला घाबरून न जाता तात्काळ स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा, गरजूंना तात्काळ मदत देण्यात येईल.
शेवटी जिल्हाधिकारी निधी चौधरी व पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी जिल्ह्यातील नागरिकांना आश्वस्त केले की, जिल्हा प्रशासन त्यांच्या सुरक्षेसाठी सदैव सतर्क, सज्ज आणि तत्पर आहे. नागरिकांनी घाबरू नये, त्यांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे.
إرسال تعليق