लसीकरण करून घेण्यासाठी म्हसळा शहरात अल्प प्रतिसाद मिळत असल्याने व्यक्त केली नाराजी.
म्हसळा -प्रतिनिधी
देशात आणि राज्यात कोरोना प्रादुर्भाव पहाता त्याला आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येकाने कोरोना प्रतिबंधक लस टोचुन घेणे आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढवणे हाच एकमेव उपाय आहे.प्रत्येक नागरिकांनी शासनाने घालुन दिलेल्या नियमानुसार आणि लस उपलब्धते प्रमाणे जवळच्या लसीकरण केंद्रात जाऊन लसीकरण करून घेणे गरजेचे आहे.म्हसळा तालुक्यातील शहरात लसीकरणाचा आढावा घेतला असता स्थानिक नागरिकांचा लस टोचुन घेण्यास पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही.कोरोनावर मात करण्यासाठी आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घेत प्रत्येकाने लसीकरण करून घ्यावे असे आवाहन रायगडचे लोकप्रिय खासदार सुनिल तटकरे यांनी वार्तालाप करताना सांगितले.कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्याबाबत जनतेला शासन आणि आम्ही लोकप्रतिनिधी सातत्याने आवाहन करीत आहोत त्याच बरोबर वृत्तपत्र,वृत्त वाहिन्या आणि सोशल मीडियाचे माध्यमातून मोठया प्रमाणात प्रचार व प्रसार होत आहे.म्हसळा शहरात पालकमंत्री आदिती तटकरे यांनी शासनाकडुन लसीची उपलब्धता केली आहे तरीही नागरिकांकडून शहरात लसीकरणाला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याने खासदार सुनिल तटकरे यांनी चिंता आणि नाराजी व्यक्त केली आहे.आपण एक वेळ शहरातील सर्वच प्रमुख नागरिकांजवळ संवाद साधुन लसीकरण करून घेण्यासाठी सांगणार असल्याचे खासदार सुनिल तटकरे यांनी सांगितले.पालकमंत्री आदिती तटकरे यांनी म्हसळा तालुक्यातील लसीकरणा बाबत ग्रामीण भागातील खामगाव आणि मेंदडी उपकेंद्रात ज्या पद्धतीने लसीकरण करून घेण्यासाठी नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे तो पहाता म्हसळा शहरात दिसत नाही.म्हसळा शहरात सुमारे 11 हजार लोकवस्ती आहे शहरासाठी नव्याने 1700 डोसची उपलब्धता केलेली आहे मात्र लस घेण्यासाठी प्रतिसाद खुपच अल्प असल्याने नागरिक आजुन कोरोना बाबतीत दक्ष नाहीत याचे आश्चर्य व्यक्त केले.म्हसळा ग्रामीण रुग्णालयासाठी शासनाच्या वतीने ऑक्सिजन बेडची मंजुरी मिळाली आहे.ही सेवा कार्यान्वित करण्यासाठी योग्य ती काळजी घेऊन लवकरच रुग्णालयात ऑक्सिजनबेड सेवा देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी माहिती देताना सांगितले.अलीकडे रुग्णालयात ऑक्सिजन बेड सेवा देताना अनेक ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत त्या मुळे जरी थोडा वेळ लागत असला तरी सर्व ती खबरदारी घेऊन म्हसळा ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.
إرسال تعليق