मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून "साहित्यसंपदा" तर्फे विविध उपक्रम दिनांक २७ फेब्रुवारी २१ रोजी आयोजित करण्यात आले होते. मराठी भाषा विषयक प्रश्नमंजूषा, अनुवाद स्पर्धा, कुसुमाग्रजांच्या निवडक काव्यसंग्रहाचे परीक्षण, त्यांच्या निवडक कवितांचे रसग्रहण तसेच काव्यपुष्प उपक्रमांतर्गत काव्यवाचन असे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम पार पडले. मराठी भाषेची सखोल माहिती लोकांपर्यंत पोहचावी ह्या उद्देशाने ऑनलाईन प्रश्नमंजूषा आयोजित करण्यात आली होती. मराठी भाषा उगम आणि विस्तार विषयावर आधारित प्रश्नांचा समावेश प्रश्नावलीत होता. उपक्रमाची तांत्रिक बाजू मनोमय मीडिया ह्यांनी सांभाळली. प्रश्नावलीसाठी शारदा खेडकर, रवींद्र सोनावणे ह्यांनी विशेष मेहनत घेतली. सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सदर प्रश्नावलीच्या माध्यमातून मराठी भाषा ज्ञानात भर पडेल असे मत सर्वत्र व्यक्त झाले.
नावाजलेले बहुभाषिक साहित्य मराठीत उपलब्ध होऊन वाचन संस्कृतीस चालना मिळावी ह्या उद्देशाने अनुवाद स्पर्धा आयोजित केली गेली. आगरी, मालवणी, लेवा, गण बोली, वऱ्हाडी, खांदेशी, पोवारी अशा विविध बोली भाषांतील प्रसिद्ध कविता स्पर्धकांना उपलब्ध करून देण्यात आल्या. मराठीत अनुवाद करताना मराठीची विविधता, शब्द संपत्ती ह्या निमित्ताने अभ्यासली गेली, असे मत कवयित्री सलोनी बोरकर ह्यांनी व्यक्त केले. सदर स्पर्धेसाठी रायगड भूषण जेष्ठ साहित्यिक एल. बी. पाटील ह्यांचे विशेष सहकार्य लाभले.
कुसुमाग्रजांच्या साहित्याची ओळख नवोदित कवी कवयित्रींना व्हावी म्हणून कुसुमाग्रजांच्या करार एक ताऱ्याशी, विशाखा, समिधा आदींपैकी कोणत्याही एका काव्यसंग्रहांचे परीक्षण आणि कुसुमाग्रजांच्या कोणत्याही एका कवितेचे रसग्रहण लिहून पाठवावे असे आवाहन करण्यात आले होते. त्याला उत्तम प्रतिसाद लाभला. सदर लिखाणास ई-पुस्तकाच्या माध्यमातून साहित्यसंपदा प्रकाशनतर्फे प्रकाशित केले जाईल.
कुसुमाग्रजांच्या काही निवडक कवितांचे सादरीकरण मराठी भाषा दिनानिमित्त पार पडले असून कोविडचे सावट लक्षात घेऊन सदर कार्यक्रम ऑनलाईन पार पडला. महाराष्ट्रातूनच नव्हे तर सिंगापूर आणि अमेरिकेतील सदस्यांनी सहभाग नोंदवून सातासमुद्रापार मराठी संवर्धनाची धुरा सांभाळली. काव्यवाचन सोहळ्याचे प्रास्ताविक अपेक्षा बिडकर ह्यांनी करून सादरीकरणासाठी नवी मुंबई प्रतिनिधी सीमा पाटील सदर उपक्रमास समन्वयकाची भूमिका बजावली. कार्यक्रमाच्या दृकश्राव्य फितींची सजावट विशाखा बेके ह्यांनी केली.
शालेय विद्यार्थांना मार्गदर्शन म्हणून विशेष उपक्रम मराठी भाषा दिनानिमित्त पार पाडला. त्या अंतर्गत साहित्यसंपदा निर्मित "संस्कार संपदा" ऑनलाईन उपक्रम यशस्वी पद्धतीने पार पडला. उपक्रम प्रमुख चित्रलेखा जाधव ह्यांच्या नियोजनाच्या माध्यमातून मुंबई नगर, उपनगर आणि रायगड येथील जिल्हा परिषद शाळांनी सहभाग घेतला. सदर उपक्रमात मराठी भाषेच्या माहिती सोबत थोर मराठी विचारवंत, साहित्यिक, मराठी भाषेचा सार्थ बहुमान वाहणारी प्रसिद्ध व्यक्तिमत्वे ह्यांची ओळख लहान मुलांना करून दिली गेली. मराठी माध्यमातून शिकून सुद्धा जगाच्या नकाशावर आपले नाव कोरणाऱ्या व्यक्तींची ओळख करून दिली गेली. मराठी साहित्याच्या विविध अंगांचा परिचय सदर उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना करून दिला गेला. विविध भागांतील आणि स्तरांतील विद्यार्थी आणि पालकांनी कविता कथा सादर केल्या. आगामी उपक्रमांची घोषणा करताना कविता आणि कथा कार्यशाळेतून विद्यार्थ्यांच्या लिहित्या हातांस बळ दिले जाईल, असे घोषित करण्यात आले. लेखिका वंदना मत्रे, मराठी भाषा अभ्यासक रेश्मा पवार, लेखिका ऋचा नीलिमा ह्यांनी मुलांना मार्गदर्शन केले. मराठी भाषा संवर्धनाचा ध्यास असणाऱ्या आणि मराठी अस्मिता जपणाऱ्या सर्वांनी सदर उपक्रमांत सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.
إرسال تعليق