टीम म्हसळा लाईव्ह
निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन छत्रछायेखाली महाराष्ट्राचा 54 वा वार्षिक निरंकारी संत समागम दिनांक 26 , 27 व 28 फेब्रुवारी , 2021 रोजी व्हर्चुअल रूपात आयोजित करण्यात येत आहे . कोरोना व्हायरसचे संक्रमण अजूनही पूर्णपणे थांबलेले नाही ही बाब लक्षात घेऊन भारत सरकारने कोविङ -19 च्या संदर्भात जारी केलेल्या दिशा - निर्देशांना अनुसरुन समागमाचे आयोजन व्हर्चुअल रूपात करण्यात येत आहे . मिशनच्या सेवादारांकडून मागील दिड महिन्यापासून या संत समागमाची जय्यत पूर्वतयारी संत निरंकारी सत्संग भवन , चेंबूर , मुंबई येथे केली जात आहे . सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन सान्निध्यात समागमात भाग घेणारे वक्ता , गीतकार , गायक , कवि , संगीतकार तसेच वादक यांनी अगोदरच या भवनमध्ये येऊन आपल्या प्रस्तुती सादर केलेल्या असून व्हर्युअल रूपात प्रसारण करण्यासाठी त्यांचे रेकॉर्डिंग करण्यात आले आहे . महाराष्ट्राच्या सर्व भागातील तसेच जवळपासच्या राज्यातील आणि देश - विदेशातील कित्येक वक्त्यांनी या समागमामध्ये भाग घेतला आहे . समागमाच्या पूर्वतयारी दरम्यान कोविड -19 संदर्भात सरकार कडून देण्यात आलेल्या दिशा - निर्देशानुसार सोशल डिस्टसिंग , मास्क परिधान करणे ( दोन गजाचे अंतर , मास्क घालणे जरुर ) , सॅनिटाईजेशन इत्यादि काळजी घेण्याबरोबरच समागम सेवांमध्ये संलग्न आणि कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभागी होणाऱ्या सर्व प्रतिनिधींची कोविड ( RT - PCR ) चाचणीही करण्यात आली जेणेकरुन सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडावे . मिशनच्या इतिहासात हे प्रथमच घडत आहे , की यावर्षी 54 वा वार्षिक निरंकारी संत समागम व्हर्चुअल रूपात आयोजित केला जात आहे . निरंकार प्रभुच्या इच्छेला सर्वोपरी मानत हर्षोल्लासाने भक्तगण याचा स्वीकार करत आहेत . संपूर्ण समागमाचे व्हर्चुअल प्रसारण मिशनच्या वेबसाईटवर दिनांक 26 , 27 व 28 फेब्रुवारी , 2021 रोजी प्रस्तुत करण्यात येईल . याशिवाय , हा समागम संस्कार टी.वी. चॅनलवर तिन्ही दिवशी सायंकाळी 5.00 ते रात्री 9.00 वाजेपर्यंत प्रसारित केला जाईल . निरंकारी संत समागमांच्या श्रृंखलेवर जर एक नजर टाकली तर महाराष्ट्राचा पहिला समागम 1968 मध्ये शिवाजी पार्क , मुंबई येथे बाबा गुरबचनसिंहजी यांच्या पावन सान्निध्यात संपन्न झाला व त्याबरोबरच समागमांची ही अविरत श्रृंखला सुरु झाली . 1980 पर्यंत बाबा गुरबचनसिंहजी यांच्या छत्रछायेखाली हे समागम होत आले आणि त्यानंतर सलग 36 वर्षे बाबा हरदेवसिंहजी यांच्या कृपाछत्राखाली ही परंपरा पुढे नेण्यात आली . त्यानंतर 2 दोन वर्षे हे समागम सद्गुरु माता सविन्दर हरदेवजी यांच्या पावन सान्निध्यात संपन्न झाले आणि वर्तमान समयाला सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज तितक्याच तन्मयतेने आणि समर्थपणे हे कार्य पुढे घेऊन जात आहेत .
मुंबई महानगरातील विविध मैदानांवर सतत 52 वर्षे हे संत समागम होत आले होते . मात्र , मागील वर्षी महाराष्ट्राचा 53 वा समागम पहिल्यांदाच मुंबईपासून दूर नाशिकमध्ये आयोजित करण्यात आला . या वर्षी समागमाचा मुख्य विषय 'स्थिरता' ठेवण्यात आला आहे . प्रकृती परिवर्तनशील असून तिच्यामध्ये अनेक प्रकारचे बदल घडत असतात . केवळ एक परमसत्य परमात्माच स्थिर आहे . ज्या मानवाचे नाते या एकरस राहणाऱ्या सत्तेशी जोडले जाते त्याच्या जीवनात 'स्थिरता' येते आणि सर्व परिस्थितिमध्ये एकरस राहण्याची शक्ति त्याला प्राप्त होते . महाराष्ट्राच्या या समागमाच्या माध्यमातूनदेखील हाच पावन संदेश व्हर्चुअल रूपात जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याचा प्रयास केला जाणार आहे . संत निरंकारी मिशन समाज सेवेच्या कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर राहिलेले आहे . कोविड -19 च्या वैश्विक संकटाच्या दरम्यान संत निरंकारी मिशनमार्फत सरकारकडून देण्यात आलेल्या दिशा - निर्देशानुसार सोशल डिस्टसिंग ( दोन गजाचे अंतर , मास्क घालणे जरुर ) इ . चे पालन करत जनसामान्यांच्या भल्यासाठी अनेक स्तुत्य उपक्रम राबविले गेले . त्यामध्ये मुख्यत्वेकरुन संत निरंकारी मंडळाने मुंबईत सुरु केलेल्या संत निरंकारी ब्लड बँकेने महत्वपूर्ण भूमिका पार पाडली असून हजारोंच्या संख्येने गरजू रुग्णांना रक्त पुरवठा करुन त्यांचे जीवन वाचविण्याचे कार्य केले आहे . या सेवा अव्याहतपणे चालू आहेत . मागील काही वर्षांपासून महाराष्ट्राच्या या संत समागमाने आंतरराष्ट्रीय स्वरूप धारण केले आहे . यामध्ये देश - विदेशातील निरंकारी भक्त मोठ्या संख्येने सहभागी होत आले आहेत . यावर्षी हा समागम जरी व्हर्चुअल रूपात साजरा केला जात असला तरीही त्याची जगभर मोठ्या आतुरतेने प्रतीक्षा केली जात आहे .
إرسال تعليق