पालघर (गुरुदत्त वाकदेकर) :
"जाणीव चॅरिटेबल ट्रस्ट" च्या ६ व्या वर्धापन दिनानिमित्त "जिल्हा परिषद शाळा, भारोळ, जिल्हा पालघर" या आदिवासी पाड्यातील शाळेतील विद्यार्थ्यांसाठी दोन दिवस १२ व १३ फेब्रुवारी २०२१ रोजी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
अवकाश दर्शन हा कार्यक्रम शैलेश संसारे आणि आदित्य देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली १२ फेब्रुवारी २०२१ रोजी सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत चालला, यात ५वी ते ९वी इयत्तेतील ७०पेक्षा जास्त विद्यार्थी उपस्थित होते. अवकाश दर्शनाबद्दल प्रशिक्षकांनी दिलेल्या माहितीमुळे व प्रत्यक्ष अवकाश दर्शनामुळे सर्व विद्यार्थी खूप आनंदली होती. एक आगळावेगळा कार्यक्रम पाहिल्याची भावना जाणवत होती.
करीयर मार्गदर्शन हा कार्यक्रम गौरांग राजवाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली १३ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ११ ते १२ या वेळेत घेण्यात आला. या कार्यक्रमात ७वी ते ९वी इयत्तेतील मुले मुली उपस्थित होती. मार्गदर्शकांनी मुलांना शिक्षणाचे महत्व, शिक्षण का घ्यावे, शिक्षणातून होणारी प्रगती, शालेय शिक्षण पूर्ण करताना आपले क्षेत्र कसे निवडावे, शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर उपलब्ध संधी इ. अत्यंत अमूल्य असे मार्गदर्शन मुलांना हसत खेळत त्यांच्या सहभागातून सांगितले.
स्वसंरक्षण प्रशिक्षण हा कार्यक्रम पर्बातसिंह राठोड आणि प्राजक्ता लाडी यांच्या मार्गदर्शनाखाली १३ फेब्रुवारी २०२१ रोजी दुपारी १२.३० ते २ या वेळेत घेण्यात आला.या कार्यक्रमात स्वसंरक्षण कशा पद्धतीने करु शकतो याची माहिती प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखऊन समजावून सांगितले.
शाळेचे मुख्याध्यापक राऊत सर, बोंगे सर उपस्थित होते. त्यांनी देखील ह्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांचे, शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
إرسال تعليق