राज्यातील महाविकास आघाडीचे सुत्र भविष्यात यशस्वी ठरणार.- सुनिल तटकरे



(टिम म्हसळा लाईव्ह)

राज्य स्तरावर अस्तित्वात आलेले महाविकास आघाडीचे सूत्र रायगड जिल्ह्यात शंभर टक्के राबविण्यात येणार आहे .मात्र या आघाडीत मजबुत स्थान ठेवण्यासाठी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस बळकट ठेवण्यासाठी पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचे आवाहन राष्ट्रीय सरचिटणीस व खासदार सुनिल तटकरे यांनी खोपोलीत -खालापूरातील कार्यकर्ते व पदाधिकार्यांना केले .यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस शरद कदम व महिला पदाधिकारी भारती पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठया संख्येने भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी मध्ये जाहीर प्रवेश केला.

खालापूर तालुका व खोपोली शहर राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा शनिवारी येथील श्री राम मंगलकार्यालयात संपन्न झाला. यावेळी पालकमंत्री अदिती तटकरे , जिल्हाध्यक्ष व माजी आमदार सुरेश लाड , माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसुरकर , जिल्हा महिला अध्यक्षा गीता पलरेचा , खोपोलीच्या नगराध्यक्षा सुमन औसरमल , जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे , जिल्हापरिषद सदस्य नरेश पाटील , जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे आदी प्रमुख पदाधिकारी व प्रचंड संखेने कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी सुनील तटकरे यांनी केंद्र सरकार कडून पारित झालेले शेतकरी कायदे व कामगार कायद्यांना कडाडून विरोध केला. या कायद्यांमुळे कृषी प्रधान व कामगार क्षेत्राला भाजप पुरस्कृत केंद्र सरकार मूठभर उद्योग पतींच्या दावणीला बांधण्याचे काम होत असल्याचा आरोप त्यांनी केला.यावेळी राज्यांतील व देशांतील अन्य बँका प्रमाणे पेण अर्बन बँकेचे राष्ट्रीयकृत बँकेत विलीनीकरण करून ठेवीदारांना त्यांची सर्व देणी मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.पालकमंत्री अदिती तटकरे यांनी खालापूर-खोपोली साठी अत्याधुनिक सुविधांयुक्त हॉस्पिटल लवकरच अस्तित्वात येईल तसेच खोपोली शहर व खालापूर तालुक्याती ल विकास कामांसाठी निधीची कमतरता भासणार नाही असे आश्वासन दिले.

माजी आमदार व जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सुचिबद्ध कार्यक्रम पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमोर मांडला .तसेच ज्यांना पक्ष कार्यकरता येणार नाही किंवा ज्यांचे मन रमत नाही त्यांनी आत्ताच आपला मार्ग शोधावा अशी तंबी काठावर असलेल्यांना दिली माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसुरकर यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रस्तावित जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे यांनी व सूत्रसंचालन भूषण पाटील यांनी केले. खोपोली शहर व खालापूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून हा मेळावा कोरोना च्या पार्श्वभूमीवर विविध खबरदारी घेऊन यशस्वीपणे संपन्न झाला.

फोटो : राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात मार्गदर्शन करतांना खासदार सुनिल तटकरे.दुसऱ्या छायाचित्रात पक्ष प्रवेश झालेल्यांसमवेत सुनिल तटकरे ,पालकमंत्री अदिती तटकरे व अन्य .( टिम लाई्व्ह)

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा