महाआघाडीच्या महाबजेटमुळे माजी मुख्यमंत्री बॅ.अ.र. अंतुले व खासदार सुनिल तटकरेंचे स्वप्न पूर्ण होणार


संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
रेवस ते रेड्डी या ५०० किमीच्या सागरी महामार्गाची गेली अनेक वर्षे कोकणवासियांकडून मागणी केली जात आहे. सागरी महामार्गाचा महाराष्ट्रातला भागही गोवा ते कोचीनप्रमाणे जेटीविरहित आणि किनारपट्टीनेच गेला पाहिजे.गोवा ते कोचीन हा सागरी महामार्गाचा ७३१ किमीचा भाग सलग किनारपट्टीनेच जातो.सागरी महामार्ग हा किनारपट्टीनेच जायला हवा अन्यथा त्याचा हेतू नष्ट होईल.रेवस ते रेड्डी या सागरी महामार्गाची मूळ संकल्पना माजी मुख्यमंत्री कै.बॅ. अ.र.अंतुले यांची होती ती मागणी खासदार सुनिल तटकरे यानी मागील २० वर्ष लावून धरली होती,कोकण किनारपट्टी- वरील रेवस -रेड्डी या सागरी महामार्गाची संकल्पना माजी मुख्यमंत्री बॅ.अ.र.अंतुले यांची होती. त्यांचे हे स्वप्न मी पूर्ण करणार तसेच या सागरी महामार्गाला माजी मुख्यमंत्री बॅ.अ.र. अंतुले यांचे नाव देण्याची मागणी लावून धरणार असल्याची ग्वाही रायगड लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांनी २०१९च्या लोकसभा विजयोत्सवा नंतर मुरुड, दापोली, म्हसळा येथील आभार सभेतून दिली होती.त्यामुळे महाआघाडी सरकारच्या महाबजेटमध्ये सागरी महामार्ग ३वर्षांत पूर्ण करण्याची केलेली घोषणा म्हणजे माजी मुख्यमंत्री बॅ.अ.र. अंतुले व खासदार सुनिल तटकरेंचे स्वप्न पूर्ण होणार असेच आहे.


कोकण पर्यटन विकासासाठी हा सागरी महामार्ग ठरणार महत्वाचा दुवा
रेवस रेड्डी मार्गावरीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी महामार्गाला राष्ट्रीय महामार्ग दर्जा देण्यास केंद्र शासनाने तत्वतः मान्यता दिली आहे. तरी या दोन्ही जिल्ह्यातील सागरी महामार्गावरील पुलांची दुरूस्ती व रस्त्यांच्या रुंदीकरणाच्या कामाला आवश्यक तो निधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कोकणातील पर्यटनास चालना मिळून जिल्ह्याचा विकास करता होंईल, अशी मागणी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती हेही महत्वाचे आहे.
कोकण पर्यटन विकासासाठी हा सागरी महामार्ग मैलाचा दगड ठरणार आहे. या महामार्गाच्या सर्व्हेक्षणाचे काम झाले आहे. मुंबई-गोवा महामार्गाला हा समांतर मार्ग होणार आहे. अथांग पसरलेल्या समुद्र किनार्‍यावरून हा मार्ग होणार असल्याने पर्यटनवाढीला मोठा फायदा होणार आहे. मांडवा पोर्ट, रेवस, अलिबाग, मुरुड, दिघी पोर्ट, बागमांडला (श्री क्षेत्र हरीहरेश्वर ) बाणकोट, दापोली, गुहागर, जयगड, गणपतीपुळे, रत्नागिरी, जैतापूर, देवगड, मालवण आणि वेंगुर्ले असा हा 540 किमीचा महामार्ग राज्यांतून प्रस्तावीत आहे.
पाच राज्यांतून जाणार सागरी महामार्ग
गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ या पाच राज्यांचा चेहरामोहरा या २१५० किमी लांबीच्या महामार्गामुळे बदलू शकेल. गुजरातच्या लखपत गावापासून सुरू होऊन केरळच्या कोचीनपर्यंत हा मार्ग धडकेल. महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्यातील झाई या गावापासून हा सागरी महामार्ग रेवस, रेवदंडा, दाभोळ, जयगड, मालवणमागेर् सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सातार्डे गावातून गोव्यात शिरेल यातील महाराष्ट्र वगळता इतर राज्यातील सागरी महामार्ग बहुतांश तयार आहे.
कोकणातील महत्त्वाकांशी प्रकल्प असलेल्या बाणकोट-बागमांडला सागरी सेतूचे काम पूर्ण होणार
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनमधील बागमांडला आणि रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड येथील बाणकोट या दरम्यान खाडीवर वरळी सी लिंकप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे महत्त्वाकांक्षी सागरी सेतू बांधण्याचे काम सन 2013 पासून सुरु करण्यात आले. भूमीपूजन पुलाची लांबी जोडरस्त्यासह 1800 मीटर इतकी असून रुंदी 12.50 मीटर इतकी आहे. पुलाच्या मध्यवर्ती गाळ्यांचे काम वरळी सी-लिंक प्रमाणे ‘केबल स्टे’या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असल्याने हा सागरी पूल पर्यटकांसाठी आकर्षण तर ठरणार आहेच शिवाय दळणवळणासाठी अधिक उपयुक्त ठरणार आहे. कोकण किनारपट्टीलगत सागरी महामार्ग आहे.
फोटो :श्रीवर्धनमधील बागमांडला आणि रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड येथील बाणकोट या दरम्यानचा बांधकाम सुरु असलेला पूल.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा