दिवेआगरमध्ये लवकरच सुरु होणार निसर्गपर्यटन...!


महाराष्ट्र शासनाने केली दिवेआगर परिसराची निवड कांदळवन प्रतिष्ठानच्या वतीने सुरू झाले प्रशिक्षण पुढील काही वर्षांमध्ये निसर्ग पर्यटन सुरू होण्याची अपेक्षा 

बोलीपंचतन : वार्ताहर
श्रीवर्धन तालुक्यातील सुप्रसिद्ध व निसर्गाने संपन्न असलेल्या दिवेआगर समुद्रकिनारा व परिसरामध्ये शासनाच्या कांदळवन संवर्धन विभागाच्या मदतीने या ठिकाणी लवकरच निसर्ग पर्यटन सुरू होणार आहे . त्यासाठी वनखात्याच्या अखत्यारितील कांदळवन संवर्धन विभागाने याबाबतचे प्रशिक्षण गावातील कांदळवनांसह व्यवस्थापन समितीला टप्प्याटप्प्याने देण्यास सुरुवात केली आहे . ग्रामस्थांच्याच सहकार्याने निसर्ग पर्यटन सुरू झाल्यास दिवेआगरच्या पर्यायाने जिल्ह्याचे पर्यटन व्यवसायामध्ये वाढ होईल . 
दिवेआगरला लाभलेला स्वच्छ संदर समुद्रकिनारा व मनमोहक तसेच हिरवीगार वृक्षसंपदा यामुळे दिवेआगरचा परिसर पाहता दिवेआगरचा प्रेमात पडणार नाही असं होणार नाही . दिवेआगर गावामध्ये १९९७ पासून सुवर्ण गणेशाच्या प्रकटनाने खऱ्या अथान दिवेआगरच्या पर्यटनाला सुरुवात झाली . आता सुवर्ण गणेश मंदिरासोबत प्राचीन मूर्ती असणारे रुपनारायण , सुंदर नारायण , उत्तरेश्वर मंदिर व इतरही महत्त्वाची ऐतिहासिक स्थळे यामुळे दिवेआगरचे पर्यटन चांगलेच बहरले . दिवेआगरला पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वार्षिक सरासरी लाखाच्या आसपास आहे . या पर्यटनामुळे अर्थातच खानावळ , हॉटेल्स , छोटे - मोठे उद्योगधंदे सुरू झाल्याने स्थानिक जनतेसोबत परिसरातील जनतेला देखील चांगले उत्पन्नाचे साधन मिळाले आहे . परंतु , दिवेआगर येथे येणारा पर्यटक बहुतांशी सुट्टीच्या दिवशी किंवा शनिवार - रविवार दिवशीच पर्यटन व्यवसायाला जोर असतो इतर दिवशी सार काही शांत असते . त्यामुळे दिवेआगरमध्ये प्रत्येक दिवशी पर्यटक कसे येतील व त्याने स्थानिक पर्यटन कसे वाढेल यासाठी दिवेआगर सरपंच उदय बापट व त्यांचे सहकारी यांचे प्रयत्न सुरू आहेत त्यातच एक वाट त्यांना दिसली म्हणजे निसर्ग पर्यटनाबाबत पाठपुरावा केला असता , शासनाच्या वन विभागाच्या कांदळवन संवर्धन विभागामार्फत या गोष्टी साध्य होऊ शकतील , असे समजल्यावर हालचालींना वेग आला . कांदळवन विभागाची टीम दिवेआगरमध्ये पोहोचली . दिवेआगरचा परिसर , निसर्गरम्य समुद्रकिनारा त्यांना अतिशय भावला व गावामध्ये कांदळवनांसह व्यवस्थापन समिती स्थापन करून त्यांना प्रातिनिधिक स्वरूपामध्ये प्रशिक्षण देणे सुरू केले आहे . यामध्ये नुकताच दिवेआगर सरपंच उदय बापट , कांदळवन सहव्यवस्थापन समिती अध्यक्ष महेश पिळणकर आणि इतर सदस्य असे २० सदस्यांना प्रशिक्षण देण्यात आले . यामध्ये सहाय्यक संचालक इको टूरिझम वंदन झवेरी , सहाय्यक संचालक क्षमता बांधणी , सहाय्यक संचालक प्रकल्प डॉ . शितल पाचपांडे , प्रकल्प समन्वयक चैताली पाटील , संदेश अंभोरे , सहाय्यक संशोधक हर्षल कर्वे , मोहन उपाध्याय , वनपरिक्षेत्र अधिकारी कांदळवन कक्ष अलिबाग करिश्मा कवडे , उपजीविका तज्ज्ञ विराज दाभोळकर आदी यांनी संस्थेच्या वतीने प्रशिक्षण दिले . या ३ दिवसीय प्रशिक्षणामध्ये कांदळवनाबाबत माहिती प्रत्यक्ष कांदळवनामध्ये बोटीने जाऊन देण्यात आली . यामध्ये कांदळवनाच्या प्रजाती , त्यापासून उत्पन्न कसे मिळू शकते , त्याच्या विविध प्रजाती कशा ओळखाव्या मानवाला त्याची कशाप्रकारे मदत , त्याचे फायदे व कांदळवन नष्ट झाल्यानंतर त्याचे तोटे , त्याचप्रमाणे समद्रकिनारी जाऊन तिथे असणाऱ्या शंख शिंपले . सूक्ष्मजीव , खेकडे त्यांचे घर , समुद्रसफर याबाबत माहिती तसेच दिवेआगर परिसरामध्ये असणाऱ्या पक्षी व त्यांचे विविध जाती त्याबाबत माहिती देण्यात आली . दिवेआगर येथे निसर्ग पर्यटन लवकरच सुरू होणार असल्याने स्थानिक नागरिक व पर्यटकांमध्ये याबाबत कुतूहल आहे . 

निसर्ग पर्यटनाची वैशिष्ट्ये : पर्यटक जास्त प्रमाणात आकर्षित होतील . कांदळवनाबाबत विस्तृत माहिती मिळेल समुद्र सफरीचा मिळणार आनंद •समुद्रावरील सूक्ष्मजीवांसह शंख - शिंपल्यांबाबत माहिती विविध पक्षांच्या प्रजातीची माहिती . जैव विविधता व उपजीविका संरक्षण होणार 

दिवेआगर पर्यटन वाढ झाली , तर ग्रामस्थ व परिसरातील जनतेला चांगल्या प्रकारे रोजगार मिळून उपजीविकेचे चांगले साधन यातून निर्माण होऊ शकेल . -उदय बापट , सरपंच , 


दिवेआगर इको टुरिझम मध्ये स्थानिक जनतेचे सहकार्य मिळत आहे व पुढे वाढत राहील . तसेच कांदळवन याबाबत जागृती होऊन त्याचे संरक्षण होईल . 
-वंदन झवेरी , सहाय्यक संचालक , इको टुरिझम

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा