म्हसळा हरिजनवाडीतील नागरिकांच्या जिवाशी खेळतंय महावितरण...?

 फोटो : हरीजनवाडी येथील धोकादायक विद्युत खांब

 ● धोकादायक विद्युत खांब बदलण्यास महावितरणचे दुर्लक्ष

● एक वर्षांपूर्वी लेखी पत्र देऊनही दुर्लक्षच

● नागरीकांमध्ये संतापाची लाट

म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर

  म्हसळा शहरात नगरपंचायत हद्दीतील हरिजनवाडी येथे विद्युत खांब जीर्ण व सडलेल्या अवस्थेत धोकादायक असून या खांबामुळे एखादी मोठी दुर्घटना घडून जीवित व वित्तहानी होण्याची भीती रहिवाशांमधून व्यक्त होत आहे.  हरीजनवाडी येथील धोकादायक विद्युत खांब बदलण्यासाठी येथील राहिवाशांच्या वतीने महावितरणला देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले होते की, हरीजनवाडी येथील पाण्याच्या टाकीजवळ मंगेश म्हशीलकर यांच्या घराजवळ जीर्ण, सडलेला धोकादायक खांब बदलण्यात यावा. कारण जमिनीलगत सडलेला हा खांब केव्हाही पडून मोठी दुर्घटना घडून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महावितरण विभागाला कळवून आता एक वर्ष झाला आहे. एक वर्षे होऊनही महावितरणने आजतागायत कोणत्याही प्रकारे उपाययोजना केलेली नाही. महावितरणाच्या गलथान कारभारामुळे हरीजनवाडीतील राहिवाशांना  मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागेल, अशी भीती व्यक्त होत आहे. एखादी दुर्घटना घडली त्याला जबाबदार कोण? असा सवाल नागरिकांनी केला आहे.
 म्हसळा नगरपंचायत हद्दीत अनेक वीज खांब गंजले असून गंजलेल्या खांबाची ही टांगती तलवार नागरिकांवर लटकत असताना महावितरण याकडे दुर्लक्ष करीत असल्याबद्दल नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. महावितरणचे अधिकारी मात्र वीज ग्राहकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करीत आहेत. येत्या आठ दिवसात जर धोकादायक विद्युत खांब बदलले गेले नाही तर येथील नागरिकांच्या वतीने महावितरणच्या विरोधात आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा येथील नागरिकांच्या वतीने देण्यात आला आहे.



"आम्ही हरीजन वाडीतील रहिवाशांनी एक वर्षापूर्वी जीर्ण झालेला विद्युत खांब बदलण्यात यावा यासाठी महावितरण कार्यालयात एक वर्षापूर्वी लेखी पत्र दिले आहे तसेच अनेक वेळा कार्यालयात जाऊन संबंधित अधिकारी वर्गाला तोंडीही माहिती देऊन खांब बदलण्यासाठी विनंती केली आहेत मात्र या गंभीर बाबीकडे महावितरण विभागाने दुर्लक्ष केले आहे. अद्याप पर्यत खांब बदलाला नाही. तसेच महत्त्वाचे या खांबाच्या बाबतीत दोन वेळा समन्वय समितीच्या सभेत सुद्धा विषय मांडण्यात आला होता आणि अधिकारी वर्गाला खांब बदलण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या परंतु अद्याप कोणतीच कार्यवाही झालेली नाही."
-श्री.मंगेश म्हशीलकर, स्थानिक रहिवाशी तथा सदस्य समन्वय समिती म्हसळा

"हरीजन वाडी येथील जीर्ण धोकादायक विद्युत खांब बदलण्यात यावा हा विषय समन्वय समितीच्या सभेत चर्चेला आला होता संबंधित अधिकाऱ्यांना त्याचवेळी नविन खांब बसवून देण्याच्या सूचना केल्या होत्या. परंतु हे काम केले नाही ही गंभीर बाब असून दोन दिवसांत येथे नवीन खांब बसविण्यास स्वतः प्रयत्न करून धोकादायक खांब बदलून घेण्यात येईल.
-श्री.शैलेश पटेल, अध्यक्ष - समन्वय समिती म्हसळा


Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा