लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्यात समन्वय असेल तर तालुक्याचा विकास गतिमान होईल - आमदार अनिकेत तटकरे



म्हसळ्यात आमदार अनिकेत तटकरे यांनी घेतली आढावा सभा

● अधिकारी व लोकप्रतिनिधींची केली कानउघाडणी

●जनतेच्या प्रश्नांना उत्तरे देताना अधिकाऱ्यांची उडाली भांबेरी

म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर

       म्हसळा तालुक्यात मागील साडेचार वर्षात आमसभा झालीच नाही याचा तालुक्याच्या सर्वांगीण व गतिमान विकासावर मोठा परिणाम झाला असल्याचे दिसून येत आहे त्याचबरोबर नागरिकांना अनेक सेवा सुविधांचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला या सर्व परिस्थिती मुले तालुक्यात श्रीवर्धन विधानसभा स्थानिक आमदारांवर जनतेची नाराजी ओढवली आहे.
    तालुक्यातील जनतेची नाराजी दुर करण्यासाठी व शासकीय कामांचा आढावा घेण्यासाठी विधानपरिषद आमदार अनिकेत तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली दि.31 मे 2019 रोजी पाचगाव आगरी समाज सभागृहात आढावा सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभेला संबोधित करताना आमदार अनिकेत तटकरे यांनी सांगितले की जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा यांची जशी नितांत गरज लागते तशा पध्दतीने विज, पाणी, रस्ते, शिक्षण आणि आरोग्य सुविधांची गरज गाववाडी वस्तीच्या विकासासाठी लागत असते. खराखुरा विकास साधण्यासाठी आणि शासन स्तरावर लोकप्रतिनिधींमार्फत गाववाडी वस्तीवर मंजुर केलेले आणि प्रस्तावित कामांना गती देण्यासाठी शासन स्तरावर लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्यात समन्वय असेल तर तालुक्याचा विकास गतिमान होईल असे सांगून तालुक्यातील शासन मंजुर आणि प्रस्तावित विकास कामांची पुरेपुर माहिती अधिकारी वर्गाला आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना असणे गरजेचे आहे असे मत व्यक्त करून अधिकारी व लोकप्रतिनिधींची कानउघाडणी केली. तसेच आढावा सभा ह्या नेहमी वादळी व्हायला पाहिजे असे नाही तर लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्यात समन्वय असेल तर तालुक्याचा विकास गतिमान करण्यास सोयीचे ठरेल आणि जास्तीतजास्त जनतेला भेडसावत असलेले प्रश्न मार्गी लागतील असेही आमदार तटकरे यांनी सांगितले.
    यावेळी सभेला आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह पं.स.सभापती छाया म्हात्रे, उपसभापती संदिप चाचले, सदस्य मधुकर गायकर, नगराध्यक्षा फळकनाझ हुर्जुक, प्रांताधिकारी प्रविण पवार, तहसीलदार शरद गोसावी, पोलीस निरीक्षक जिल्हा संघटक बालशेठ करडे, तालुका अध्यक्ष समिर बनकर, जिल्हा संघटक व्यंकटेश सावंत, महिला तालुका अध्यक्षा रेश्मा कानसे, शाहिद उकये, अनिल बसवत, पं.स.विस्तार अधिकारी डी.एन.दिघीकर, पाणीपुरवठा अधिकारी युवराज गांगुर्डे, गटशिक्षणाधिकारी संतोष शेडगे, जलसंपदा विभाग अधिकारी श्री.शिंदे यांसह महसूल, कृषी, शिक्षण, पाणीपुरवठा, पंचायत समिती, विजवीतरण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी वर्ग, सरपंच व मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.
    आयोजित सभेत तालुक्यातील जलसंपदा विभाग, जिप पाणीपुरवठा विभाग, कृषी विभाग, एसटी वाहतूक विभाग, शिक्षण विभाग, महसूल खाते, आरोग्य विभाग, रोजगार हमी योजना अशा विविध शासकीय कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी अनेक विभागांची अपूर्ण अवस्थेत असलेल्या कामांचा आढावा नागरिकांनी आमदारांसमोर मांडला असता संबंधित खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उत्तरे देताना भांबेरी उडाली असल्याचे दिसून आले तर काही प्रश्नांना साधक बाधक उत्तरे देऊन अधिकाऱ्यांनी वेळ मारून नेला. तालुक्यात भेडसावत असलेल्या पाणी प्रश्नावर नागरिक आक्रमक झाले असल्याचे दिसून आले तर म्हसळा शहर व आजूबाजूला असणाऱ्या अनेक ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा होत असलेल्या पाभरे धरणाची डागडुजी करण्यासाठी जलसंपदा विभागाने योग्य नियोजन नसताना व चुकीच्या पद्धतीने ऐन उन्हाळ्यात व पाणी टंचाईच्या काळात धरणातील पाणी विसर्ग केले असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. या परिस्थितीला जलसंपदा खात्याचे अधिकारी श्री.शिंदे यांना उत्तर देता आले नाही त्यावर आमदार अनिकेत तटकरे यांनी पाभरे धरणाचा प्रश्न येत्या पावसाळी अधिवेशनात मांडून तो सोडविणार असल्याचे आश्वासित केले तसेच जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला. तसेच म्हसळा शहराची पाणी योजना देखील लवकर पूर्ण करून घेऊ असे सांगितले. उपस्थित नागरिकांनी आपल्या आपल्या भागातील रस्ते, पाणी, विजवीतरण, कृषी, आरोग्य, शिक्षण अशा विविध सेवा सुविधांचा बोजवारा उडाला असल्याचे गाऱ्हाणे सभेत मांडले.

शासकीय अधिकारी लोकप्रतिनिधींना जुमानत नाहीत :-
  तालुक्यात कृषी, शिक्षण, महसूल, ग्रामविकास, पाणीपुरवठा, सार्वजनिक बांधकाम विभाग, विजवीतरण विभाग, आरोग्य विभाग अशा सर्वच विभागात कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचारी स्थानिक सत्ताधारीलोकप्रतिनिधींना जुमानत नसल्याची माहिती समोर आली असून संबंधित विभागात होत असलेले शासकीय कार्यक्रम, विकास कामे, तसेच शासनाच्या नवनवीन योजना या संदर्भात लोकप्रतिनिधींना माहितीच नसते असे स्थानिक लोकप्रतिनिधींनी आमदार अनिकेत तटकरे यांना यावेळी सांगितले. तर दुसरीकडे या अधिकारी वर्गावर स्थानिक लोकप्रतिनिधींचे वर्चस्व नसल्यानेच अधिकारी किंवा कर्मचारी लोकप्रतिनिधींना जुमानत नसल्याची वस्तुस्थिती सभेदरम्यान समोर आली. त्याचबरोबर लोकप्रतिनिधींनाच शासनाच्या विविध योजनांची माहिती नसल्याने त्यांची कार्यशाळा घेण्यात यावी असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

● आढावा सभा संपल्यावर आमदार अनिकेत तटकरेंनी आपला मोर्चा पाभरे धरणावर वळविला व ग्रामीण पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना धरणाच्या दुरुस्तीचे काम येत्या पाच दिवसात पूर्ण करा अशी तंबी दिली.

●  सदर आढावा सभेत बहुतेक अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना आपल्या खात्यामध्ये 50% पेक्षा अधिक रिक्त पदांमुळे कामात विलंब होत असल्याचे सांगितले. हि रिक्त पदे भरण्यासाठी आमदार अनिकेत तटकरे यांनी पाठपुरावा करावा अशी या सभेत अधिकारी व नागरिकांकडून विनंती करण्यात आली.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा