विधानपरिषद आमदार अनिकेत तटकरे यांची म्हसळा येथे मिनी आमसभा, तालुक्यातील विविध खात्यांच्या शासकीय अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा
म्हसळा : सुशील यादव
कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद आमदार अनिकेत तटकरे यांनि काल(३१ मे) म्हसळा तालुक्याची विविध शासकीय खात्यांची आढावा सभा घेतली. हि सभा पाहून आम सभेपासून गेले साडे चार वर्ष वंचित राहिलेल्या तालुक्यातील नागरिकांना जणू आमसभा च असल्याचे भासत होते. काही जणांनी या सभेला मिनी आमसभा म्हणून संबोधले देखील. सदर आढावा सभेमध्ये तटकरे यांनी तालुक्यातील शासकीय अधिकाऱ्यांकडून विविध खात्यांच्या कामांचा लेखा जोखा घेतला. श्रीवर्धन मतदार संघाचे आमदार म्हणून निवडून आल्यावर एकही आम सभा न घेणाऱ्या निष्क्रिय आमदारावरील तालुक्यातील जनतेची नाराजी दुर करण्यासाठी (म्हणा किवां येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी म्हणा) व शासकीय कामांचा आढावा घेण्यासाठी विधानपरिषद आमदार अनिकेत तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली दि.३१ मे २०१९ रोजी पाचगाव आगरी समाज सभागृहात आढावा सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभेला संबोधित करताना आमदार अनिकेत तटकरे यांनी सांगितले की लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी यांच्यात समन्वय असेल तर तालुक्यातील जनतेचे प्रश्न सुटण्यास वेळ लागणार नाही व विकास कामांना गती प्राप्त होईल. यावेळी सभेला आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह श्रीवर्धन उप विभागीय अधिकारी प्रविण पवार, तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी शरद गोसावी, पं.स.सभापती छाया म्हात्रे, उपसभापती संदिप चाचले, सदस्य मधुकर गायकर, नगराध्यक्षा फलकनाझ हुर्जुक, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे , राष्ट्रवादी जिल्हा संघटक बाळशेठ करडे, तालुका अध्यक्ष समिर बनकर, जिल्हा संघटक व्यंकटेश सावंत, महिला तालुका अध्यक्षा रेश्मा कानसे, शाहिद उकये, अनिल बसवत यांच्यासह महसूल, कृषी, शिक्षण, पाणीपुरवठा,पंचायत समिती, विजवीतरण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी वर्ग, सरपंच व मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते. आयोजित सभेत तालुक्यातील ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जि.प. पाणीपुरवठा विभाग, कृषी विभाग, एसटी वाहतूक विभाग, शिक्षण विभाग, महसूल खाते, आरोग्य विभाग,रोजगार हमी योजना अशा विविध शासकीय कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी अनेक विभागांची अपूर्ण अवस्थेत असलेल्या कामांचा आढावा नागरिकांनी आमदारांसमोर मांडला असता संबंधित खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उत्तरे देताना भांबेरी उडाली असल्याचे दिसून आले तर काही प्रश्नांना साधक बाधक उत्तरे देऊन अधिकाऱ्यांनी वेळ मारून नेली. तालुक्यात भेडसावत असलेल्या गंभीर पाणी प्रश्नावर नागरिक आक्रमक झाले असल्याचे दिसून आले तर म्हसळा शहराच्या आजूबाजूला असणाऱ्या अनेक ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा होत असलेल्या पाभरे धरणाची डागडुजी करण्यासाठी जलसंपदा विभागाने योग्य नियोजन नसताना व चुकीच्या पद्धतीने ऐन उन्हाळ्यात व पाणी टंचाईच्या काळात धरणातील पाणी उपसले असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे. या परिस्थितीला ग्रामीण पाणी पुरवठा खात्याचे अधिकारी शिंदे यांना उत्तर देता आले नाही त्यावर आमदार अनिकेत तटकरे यांनी पाभरे धरणाचा प्रश्न येत्या पावसाळी अधिवेशनात मांडून तो सोडविणार असल्याचे आश्वासित केले तसेच संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला. तसेच म्हसळा शहराची पाणी योजना देखील लवकर पूर्ण करून घेण्यासाठी पाठपुरावा करू असे आश्वासन म्हसळा शहर वासियांना दिले. उपस्थित नागरिकांनी आपल्या आपल्या भागातील रस्ते, पाणी,विजवीतरण, कृषी, आरोग्य, शिक्षण अशा विविध सेवा सुविधांचा बोजवारा उडाला असल्याचे गाऱ्हाणे सभेत मांडले.
आढावा सभा संपल्यावर आमदार अनिकेत तटकरेंनी आपला मोर्चा पाभरे धरणावर वळविला व ग्रामीण पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना दुरुस्तीचे काम येत्या पाच दिवसात पूर्ण करा अशी तंबी दिली.
फोटो :- पाभरे धरण येथे प्रत्यक्ष जाऊन दुरुस्तीच्या कामाची पाहणी करताना आमदार अनिकेत तटकरे
सदर आढावा सभेत बहुतेक अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना आपल्या खात्यामध्ये ५०% पेक्षा अधिक रिक्त पदांमुळे कामात विलंब होत असल्याचे सांगितले. हि रिक्त पदे भरण्यासाठी आमदार अनिकेत तटकरे यांनी पाठपुरावा करावा अशी या सभेत त्यांना नागरिकांकडून विनंती करण्यात आली.
إرسال تعليق