ठाकरोली शाळेच्या विद्यार्थ्यांनी घेतली पशु पक्षांच्या संवर्धनाची जबाबदारी ; विद्यार्थी व शिक्षकांचे सर्वत्र कौतुक



म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
   राज्यात दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. नागरिकांप्रमाणे पशु पक्षांना सुद्धा उन्हाच्या झळा बसत असून पशु पक्षांचे सुद्धा पाण्याविना हाल होत आहेत.
         म्हसळा तालुक्यातील ठाकरोली सारख्या ग्रामीण व डोंगराळ भागात पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना फार मोठी कसरत करावी लागत आहे. अशा परिस्थितीत मुक्या पशुपक्षी व चिमण्या-पाखरांच्या पाण्याचा प्रश्न कसा सुटणार हि फार मोठी समस्या उद्दभवली असताना सुट्टीच्या कालावधीत ती जबाबदारी शाळेच्या विद्यार्थ्यानी स्वीकारून भूतदयेचा स्वीकार विद्यार्थ्यानी केला आहे. म्हसळा तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या ठाकरोली शाळेतील शिक्षक व विद्यार्थी नेहमीच विधायक योजना राबवितात. अनेक उपक्रम या शाळेच्या माध्यमातून यशस्वीपणे राबविले आहेत. शाळा व शाळेच्या परिसरात अनेक पक्षी, पाखरे, चिमण्या यांचा सातत्याने वावर होत असतो या पशु पक्षांचे सातत्य टिकवून ठेवणे व संवर्धन करण्याची जबाबदारी स्वीकारून शाळेचे मुख्याध्यापक जनार्दन पजई, शिक्षक धनेश अधिकारी, शरद कोद्रे, जीवन राठोड आणि शाळेतील विद्यार्थी यांनी प्लास्टिकचे छोटे ड्रम, प्लास्टिक बाटल्या, व इतर वस्तू यांना मधोमध कापून त्यातून असं साहित्य तयार केलं की त्यामध्ये चिमण्या-पाखरांसाठी खाऊ, पाणी ठेवता येते. या तयार केलेल्या कलाकृती झाडांना, शाळेच्या भिंती, खिडक्या यावर टांगून ठेवण्याची सोय सुंदर प्रकारे केली आहे. मुख्याध्यापक जनार्दन पजई यांनी या उपक्रमाबाबत माहिती देताना सांगितले की सर्व शाळांनी हा उपक्रम राबविला तर प्राणी, पक्षी, पुलपाखरे यांचे निश्चितपणे संवर्धन होईल व चिमण्या-पाखरांच्या संख्येत आमूलाग्र वाढ होईल. यापूर्वीही आमच्या शाळेने अनेक उपक्रम राबविले असून शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ यांचे फार मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभत असून पाष्टी केंद्राचे माजी केंद्रप्रमुख यांची प्रेरणा असल्याचे सांगितले.


म्हसळा तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा ठाकरोलीचे शिक्षक व विद्यार्थी नेहमीच चांगले उपक्रम राबवितात. शाळेची गुणवत्ताही उत्तम असून या शाळेने राबविलेल्या उपक्रमातून तालुक्याचे नावलौकिक वाढले आहे.-श्री.बबन मनवे, रायगड जिल्हा परिषद सदस्य.


 ठाकरोली शाळेतील शिक्षक व विद्यार्थी यांनी राबविलेल उपक्रम कौतुकास्पद असून या उपक्रमांमुळे केवळ पक्षांचे संवर्धन होत नसून परिसरात वेगवेगळ्या प्रकारच्या प्राणी, पक्षांची वाढ होत असून विद्यार्थ्याच्या ज्ञानात दिवसेंदिवस वाढ होत आहे.-सौ.छाया म्हात्रे, सभापती पं.स.म्हसळा.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा