म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
हापूस आंबा हा कोकणचा महत्वाचा फळपीक असून याची कोकणचा राजा अशी ओळख आहे आणि या पिकाच्या आधारावर अनेक शेतकऱ्यांचे उदरनिर्वाह होत आहे. परंतु आता बदलत्या हवामानामुळे या पिकावर वेगवेगळ्या प्रकारचे रोग व परिणाम दिसून येत असल्याने तालुक्यातील शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
माहे फेब्रुवारी पासून हवामानात अनेक प्रकारचे बदल होत असल्याचे आढळून येत आहे. हापूस आंबा हा अतिशय संवेदनशील पीक असून यावर अनेक प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव होत असतो त्यामुळे आंबा पीक रोगाला बळी पडत असतो. सध्या हवामानात कधी गारवा तर कधी उष्णता, कधी ढगाळ तर कधी दमट वातावरण असतो. त्याचबरोबर दवतेचा प्रमाण जास्त यामुळे अशा नाजूक पिकावर विपरीत परिणाम होत असल्याचे शेतकरी बांधव सांगत आहेत.
दि.13 व 14 रोजी असलेल्या ढगाळ वातावरणामुळे अचानक अतिशय उष्णता वाढल्याने झाडांवर असलेले आंबा पीक पिवळा पडून गळ होत आहे. या दोन दिवसांत कोकणात काही ठिकाणी वाऱ्यासह पाऊस झाल्याने सुद्धा आंबा पिकाला बाधा झाल्याचे दिसून येत आहे.
तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्फत माहे डिसेंबर 2018 अखेर तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचे संरक्षण व्हावे म्हणून पीक विमा सुध्दा उतरवलेला आहे. सदरच्या विम्याचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा म्हणून प्रत्यक्ष शेतकऱ्यांचा बागेत जाऊन माहे डिसेंबर-जानेवारी 2019 मध्ये अति जास्त प्रमाणात आलेल्या मोहराला किती आंबे आले आहेत याची पाहणी तालुका कृषी अधिकारी व तहसीलदार साहेबांनी करावी या संदर्भात पंचनामे करावे त्याचा फायदा सामान्य शेतकऱ्यांना होईल असे मत तालुक्यातील बंडवाडी गावातील अहमद कौचाली यांनी व्यक्त केले आहे.

إرسال تعليق