निवडणूक खर्चाचा हिशोब सादर न केल्याने 'अपक्ष' तटकरेंना कारवाईच्या नोटीसा ; दोन दिवसांत खुलासा न केल्यास कडक कारवाई
टीम म्हसळा लाईव्ह
निवडणूक कायद्याप्रमाणे उमेदवाराने नामनिर्देशन दाखल केल्यापासून त्याच्या खर्चाचा दैनंदिन हिशोब निवडणूक निर्णय अधिका-यास देणे बंधनकारक आहे . मात्र ३२ - रायगड लोकसभा निवडणूक रिंगणातील दोन्ही अपक्ष तटकरेंनी अद्यापपर्यंत त्यांच्या खर्चाचा कोणताही हिशोब दिलेला नसल्याने त्यांना कारवाईच्या नोटीसा काढण्यात आल्या आहेत , निवडणूक निर्णय अधिकारी डॉ . विजय सूर्यवंशी यांनी अपक्ष उमेदवार तटकरे सुनील सखाराम ( रा . मु सावर , गौळ आळी , ता . म्हसळा ) तसेच दुसरे अपक्ष तटकरे सुनील पांडुरंग ( रा , पोयनार , अलाटी वाडी , ता . खेड जि . रत्नागिरी ) या दोन उमेदवारांना नोटीस बजावली आहे . त्यात असे म्हटले आहे की , ११ एप्रिल व १६ एप्रिल अशा दोन खर्च ताळमेळ बैठकांना अनुपस्थित राहून व कुठलाही निवडणूक विषयक खर्च न देऊन या उमेदवारांनी कायद्याचा भंग केला आहे . या अपक्ष तटकरेंनी खर्चाचा कोणताही हिशोब दिलेला नाही तसेच ते खर्च ताळमेळ बैठकांनादेखील उपस्थित राहिलेले नाहीत . त्यामुळे या उमेदवारांना निवडणूक खर्च सनियंत्रण यासंदर्भातील लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ चे कलम ७७ व ७८ - १० ( क ) अन्वये तरतुदींचे पालन न केल्यामुळे तसेच निवडणुका घेण्याबाबतचे नियम १९६१ चे कलम ८६ नुसार कार्यवाही न केल्यामुळे नोटीस देण्यात आली आहे . याबाबत दोन दिवसांत या उमेदवारांनी खुलासा न दिल्यास पुढील कडक कारवाई करण्यात येईल अशी नोटीस दिली आहे . दरम्यान , निवडणूक रिंगणातील १६ पैकी १४ उमेदवारांनी खर्च ताळमेळ बैठकीस उपस्थित राहून त्यांचे खर्च दिले आहेत .

إرسال تعليق