म्हसळा न्यु इंग्लिश स्कुल व ज्यू कॉलेज समोरील रस्त्याची दुरवस्था : आमदार, खासदार लक्ष देतील का..?


● दिघी पोर्ट वाहतुकीने रस्ता उखडला

● रस्त्यावर धुळीचे साम्राज्य, विद्यार्थ्यांचे आतोनात हाल

● 1450 विद्यार्थ्यांसह शेकडो शिक्षकांचे आरोग्य धोक्यात

● स्कुल कमिटीवर अनेक दिग्गज राजकीय नेते मंडळींचे बस्तान

● प्रशासनासह पालकांचेही दुर्लक्ष


म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर

           म्हसळा तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झालेली असून या महत्त्वाच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला संबंधित यंत्रणेला तसेच स्थानिक लोकप्रतिनिधिंना वेळ नाही अशी परिस्थिती असताना आता शहरातील मुख्य रस्त्यांची देखील दयनीय अवस्था झालेली आहे याकडेही लक्ष द्यायला कोणालाच वेळ नाही अशी स्थिती निर्माण झाली असून या धूळधाण झालेल्या रस्त्यांना वाली कोण असा प्रश्न येथील सामान्य नागरिकांबरोबर म्हसळा, श्रीवर्धन मार्गाने प्रवास करणारे पर्यटक प्रवाशी विचारीत आहेत. त्यामुळे श्रीवर्धन मतदारसंघातील अनेक तालुक्यांना जोडणारा मध्यभागी असलेला महत्वाचा तालुका म्हणून ओळख असलेल्या म्हसळा तालुक्यातील सामान्य जनतेच्या प्रश्नांकडे मागील पाच वर्षांपासून राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार व शिवसेनेचे स्थानिक खासदार यांनी दुर्लक्ष केल्याने या तालुक्यात अनेक समस्या निर्माण झाल्या असून या समस्या सोडविण्यासाठी कोणीही पुढाकार घेताना दिसत नाही त्यामुळे रस्ते, पाणी, वाहतूक व्यवस्था, कोलमडलेली आरोग्य व्यवस्था, धिम्या गतीने होत असलेले प्रशासकीय कामकाज, स्थानिकांचे रोजगाराचे प्रश्न या साऱ्या समस्यांवर येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत तालुक्यातील जनता विद्यमान खासदार व आमदार यांना मतपेटीतून जाब विचारल्याशिवाय स्वस्थ राहणार नाही अशी चर्चा सुरू आहे.
        म्हसळा तालुक्यात शैक्षणिक सोयीसुविधा दृष्टीने सर्वगुणसंपन्न असलेले न्यु इंग्लिश स्कुल व आर्ट्स अँड कॉमर्स ज्युनिअर कॉलेज म्हसळा हे एकमेव महाविद्यालय आहे या विद्यालयात शहरासह ग्रामीण भागातील इयत्ता पहिली ते दहावी आणि अकरावी ते बारावी पर्यंत हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत व या विद्यार्थ्यांना विद्यार्जन देण्यासाठी शेकडो शिक्षक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी या ठिकाणी दिवस रात्र काम करीत आहेत. या विद्यालयाच्या समोरूनच म्हसळा बायपास रस्ता व श्रीवर्धन कडे जाणारा मुख्य रस्ता आहे तर शहरातून ग्रामीण भागाला जोडणारा मुख्य रस्ता याच ठिकाणी जोडला जात असून त्रिशंकू आकारात रस्ता जोडला गेला आहे. हजारोंच्या संख्येने दिवसाला या मार्गावरून  लहान-मोठ्या गाड्यांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते त्यामुळे सद्यस्थितीत या रस्त्याची अवस्था इतकी भयानक झाली आहे की येथून प्रवास करताना विद्यार्थ्यांना, शिक्षकांना व नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर एवढे भयानक खड्डे पडलेले असून रस्ता पूर्णपणे उखडला आहे तरीही संबंधित यंत्रणा, स्थानिक अधिकारी व लोकप्रतिनिधी या समस्येकडे लक्ष देत नाहीत. विद्यालयाच्या स्कुल कमिटीवर सर्व पक्षीय राजकीय दिग्गज नेतेमंडळी स्थानापन्न आहेत मात्र त्यांनाही या रस्त्यावरून आपले विद्यार्थी धुळीतून ये-जा करतात हे व रस्त्यावर आणि शाळेच्या परिसरात प्रचंड प्रमाणात उडत असलेली धूळ त्यांच्या डोळ्यांनी दिसत नाही. 
तर एकीकडे शिवसेनेचे नेते तथा केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते व राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री सुनिल तटकरे तसेच रायगड जिल्हा पालक मंत्री रविंद्र चव्हाण या दिग्गज नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, काँग्रेस या सर्व पक्षातील स्थानिक नेतेमंडळी, पदाधिकारी अशी सर्व पक्षीय स्कुल कमिटी असूनही विद्यालयाच्या समोरील अतिशय जटील असा रस्त्याचा प्रश्न सोडविण्यासाठी कोणीच का पुढाकार घेत नाहीत हा प्रश्न निर्माण झाला आहे त्याचबरोबर एरव्ही दिघी पोर्ट अवजड वाहतूक विरोधात आंदोलन मोर्चा काढणारे लोकप्रतिनिधी व राजकीय पक्षांचे पदाधिकारी आता का या समस्येवर काहीच बोलत नाहीत असा संतप्त सवाल पालक वर्गातून उपस्थित होत आहे.
   त्याचबरोबर शासकीय यंत्रणा देखील ही समस्या सोडविण्यासाठी कुचकामी ठरत असल्याचे दिसून येत आहे तर एरव्ही छोट्या छोट्या गोष्टींवरून आंदोलन करून दिघी पोर्टच्या गाड्या अडविणारे अवजड वाहतूक सेनेचे पदाधिकारीही आता मूग गिळून गप्प बसले आहेत. त्यामुळे न्यु इंग्लिश स्कुल समोरील मुख्य म्हसळा बायपास रस्ता कितीही उखडला आणि त्या ठिकाणी अपघात झाले तरी याचे कोणालाही काहीही सोयरसुतक नसणार असेच काहीसे चित्र सध्या तालुक्यात निर्माण झाले आहे. ज्या म्हसळा नगरपंचायतीच्या हद्दीत हे विद्यालय आहे व येथून हा बायपास रस्ता जातो त्या नगरपंचायत च्या सत्ताधारी नगरसेवकांना मात्र आपल्या भागातील समस्यांवर उपाय शोधण्यास वेळच नसल्याचा भास आहे किंबहुना त्यांची या समस्या सोडविण्याची मानसिकताच नाही असेच दिसून येते. अनेक विद्यार्थी व शिक्षकांना या धुळीमुळे श्वसनाचे व विविध आजार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी सर्व नागरिकांकडून होत आहे.

विद्यार्थ्यांना धुळीतून शोधावी लागते शाळेची वाट.....
    या विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजच गुडघाभर खड्ड्यातून आणि धुळीतून शाळेची वाट शोधावी लागते. कधी कधी तर एवढी अवस्था भयानक असते की दिघी पोर्टला जाणारे अवजड ट्रेलर माल वाहतूक करीत असताना सुद्धा विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडून पलीकडे शाळेत जावे लागते या वेळेस प्रचंड प्रमाणात धुरळा उडत असतो व विद्यार्थ्यांचे कपडे, दप्तर धुळीने खराब होत असतात. अनेक विद्यार्थी व शिक्षकांना या धुळीमुळे श्वसनाचे व विविध आजार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या परिक्षांचा हंगाम सुरू आहे विद्यार्थ्यांना या विद्यालयात येताना गुडघाभर धुळीतून प्रवास करूनच यावे लागते त्यामुळे त्यांना मानसिक त्रास सुद्धा होत आहे.
-----------------------

शिक्षक, बाईकस्वारांचे अपघात.. 
 विद्यालयात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची 100 पेक्षा जास्त संख्या आहे. हे लोक बाईक वरून विद्यालयात ये जा करतात. मात्र रस्त्यावर सर्वत्र धूळ पसरल्याने या मार्गावर बाईक गाड्या स्लिप होण्याचे प्रमाण वाढले असून अपघात होत आहेत. तर बाईक स्लिप होण्याच्या भीतीमुळे काही शिक्षक आपली बाईक दूरवर पार्कींग करूनच या धुराळ्यातून चालत जातात. त्याहीपेक्षा भयंकर अवस्था म्हणजे या मार्गावरून चालताना एकमेकांना आधार देत चालावे लागते कारण धुळीवरून चालताना पाय घसरून पडण्याची भीती जास्त निर्माण झाली आहे.
-----------------

    आमच्या विद्यालयासमोरील रस्त्याची अतिशय दुर्दशा झाली असून या मार्गावरून चालताना गुडघाभर आत पाय जातात व सर्वत्र धुळीचे साम्राज्य असल्यामुळे विद्यार्थ्यांना व शिक्षकांना आरोग्याच्या समस्या उद्भवल्या आहेत. आमच्या 1450 विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आहे. तसेच आमच्या कार्यालयातील स्टेशनरी व इतर साहित्य धुळीमुळे खूप खराब होत आहेत. आम्ही अनेक वेळा संबंधित रस्त्याच्या दुरावस्थेबाबत जिल्हा रस्ते वाहतूक विभाग अलिबाग येथे पत्रव्यवहार करून रस्ता लवकर दुरुस्ती करावा अशी विनंती केली आहे.
-बी.एन. माळी, प्राचार्य- न्यु इंग्लिश व ज्युनिअर कॉलेज म्हसळा

● "आम्हाला या रस्त्यावरून प्रवास करताना खूप त्रास होतोय. आमचे कपडे, दप्तर खराब होत असून आमच्या अनेक विद्यार्थी मित्र मैत्रिणींना वेगवेगळे आजार होत आहेत. आमच्या शाळेसमोरील रस्ता का दुरुस्त करीत नाहीत हा प्रश्न आम्हाला पडला असून आमचे आमदार खासदार काय करीत आहेत ते या समस्येवर उपाययोजना का करीत नाहीत."
एक विद्यार्थी मित्र

● या रस्त्याच्या संदर्भात अनेक वेळा आमच्या स्कुल कमिटी च्या सभेत विषय घेण्यात आला आहे परंतू या समस्येवर अजूनही कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही संबंधित विभागाला लेखी पत्र दिलेले आहेत. या मार्गावर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थनिक अधिकारी व आमदार, खासदार यांनी लक्ष देऊन हा प्रश्न सोडविला पाहिजे.
श्री.सुनिल उमरोठाकर, सदस्य- स्कुल कमिटी न्यु इंग्लिश स्कुल अँड ज्युनिअर कॉलेज म्हसळा

● "संबंधित रस्ता नव्याने करण्यासाठी आमचे स्थरावरून वरिष्ठांना पत्रव्यवहार केलेला आहे. हा रस्ता आठवडा भरात नव्याने तयार केला जाईल."
श्री.शेट्ये , इंजिनिअर सार्वजनिक बांधकाम विभाग म्हसळा-श्रीवर्धन

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा