म्हसळा प्रतिनिधी
म्हसळा शहरालगत असलेल्या आपल्या फळबागेत जखमी अवस्थेत आढळलेल्या मोराला शेतकरी सुरेश करडे यांच्या दोन मुलांनी जीवदान दिले . याबद्दल वन विभागासह परिसरातील नागरिकांकडून करडे बंधूचे कौतुक केले जात आहे . सध्या म्हसळा तालुक्यात प्रचंड उष्णतेचा त्रास नागरिकांबरोबरच पशु पक्ष्यांनादेखील होत आहे . प्रचंड उष्णतेमुळे राष्ट्रीय पक्षी असलेला एक मोरदेखील उष्माघाताचा बळी होता होता वाचला . उष्माघातामुळे त्रास होऊन तडफडत अस लेला हा मोर ३० मार्च रोजी सुरेश करडे यांच्या म्हसळा शहरालगत असलेल्या फळबागेत योगेश करडे व यतीन करडे या बंधूना आढळला . त्यांनी त्वरित या जखमी मोराला आपल्या शेत घरात नेले व पाणी पाजले आणि लागलीच वनविभागाला फोनद्वारे कळविले . त्यावेळी म्हसळा तालुक्याचे वन - क्षेत्रपाल एन . डी . पाटील , वनपाल थळे , वनरक्षक बनसोडे , भोसले आणि मोरे हे काही वेळातच करडे यांच्या फळबागेत दाखल झाले व जखमी अवस्थेत असलेल्या त्या मोराला उपचारासाठी देहेन नर्सरी वनविभागाच्या क्वार्टर्समध्ये घेऊन गेले . तेथे तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ . पाटील हे या जखमी मोरावर उपचार करीत आहेत . करडे बंधूच्या या तत्परतेबद्दल व वन्यप्राण्यांप्रती काळजीवाहू भावनेबद्दल वन अधिका - यांनी व या परिसरातील नागरिकांनी त्यांचे कौतुक केले . गेल्या काही वर्षात या परिसरात मोर व लांडोरांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे . परंतु उन्हाळ्यात प्रचंड उष्णतेमुळे अनेक प्राणी पक्षी उष्माघाताचे बळी होत असतात . मात्र या मोराला करडेबंधूनी माणुसकीच्या भावनेतून दिलेले जीवदान समाजाला प्रेरणा देणारे असल्याचे बोलले जात आहे .

إرسال تعليق