● शेकापसह, भाजपचे कमळ कोणाच्या हातात...?
● सत्ताधारी राष्ट्रवादीच्या विरोधात विरोधकांची एकजूट
म्हसळा : प्रतिनिधी
श्रीकांत बिरवाडकर
आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हसल्यातील राजकीय वातावरण चांगलेच रंगू लागले आहे. श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातील राजकीय दृष्ट्या महत्वाचे असलेल्या म्हसळा नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक 21 डिसेंबर 2021 रोजी संपन्न होणार असून या निवडणुकीसाठी स्थानिक सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा विरोधात इतर सर्व पक्ष एकत्रित निवडणूक लढवित असून तशा प्रकारच्या हालचाली सुरू असल्याचे दिसून येत आहे.
म्हसळ्यात सध्या राष्ट्रवादीचे सुसाट असलेले 'घड्याळ' रोखण्यासाठी काँग्रेसने "हातात शिवसेनेचे धनुष्यबाण घेतले असल्याची चर्चा सुरू असून शेकापसह, भाजपचे कमळही हाताच्या मदतीला तयार आहे अशी शक्यता निर्माण झाली असून एकंदरीत सत्ताधारी राष्ट्रवादीच्या विरोधात विरोधकांनी एकजूट तयार केली आहे.
म्हसळा शहर या ठिकाणी पूर्वी ग्रामपंचायत होती. 2015 मध्ये म्हसळा हे तालुक्याचे मुख्यालय असल्याने याठिकाणी नगरपंचायत व्हावी हे धोरण शासनाने अंमलात आणून 2015 मध्ये म्हसळा नगरपंचायत अस्तित्वात आली. म्हसळा नगरपंचायतीचे पहिलीच सार्वत्रिक निवडणुका 10 जानेवारी 2016 रोजी झाली होती त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 17 पैकी तेरा जागांवर विजय संपादन करून नगरपंचायतीवर एक हाती सत्ता मिळविली होती त्यानंतर गेल्या पाच वर्षाच्या कारकिर्दीत म्हसळा नगरपंचायतीत राजकीय घडामोडी घडल्या यामध्ये राष्ट्रवादीचे काही सदस्य काँग्रेसआय मध्ये गेले पक्षांतराची जोरदार चर्चा म्हसळा तालुक्यासह रायगड जिल्ह्यात सर्वत्र झाली. आत्ता पाच वर्षानंतर पुन्हा म्हसळा नगरपंचायतीचे वार्ड क्रमांक बदलले असून नव्याने पडलेल्या नगरसेवक पदाच्या आरक्षणामुळे माजी नगरसेवकांपैकी अनेकांचे पत्ते कट झाले आहेत त्यामुळे आता म्हसळा नगरपंचायत निवडणुकीत नवीन चेहर्यांना व काही वार्डात तरुणांना संधी मिळाली आहे का.
एकंदरीत म्हसळा नगरपंचायतीचे सार्वत्रिक निवडणूक चुरशीची होऊन अनेक वार्डातून धक्कादायक निकाल लागणार हे मात्र खरे आहे.
सध्या राजकीय पक्षांकडून कॉर्नर सभा व घरोघरी भेटी देऊन आपआपल्या उमेदवारांचा प्रचार जोरदार सुरू आहे.
म्हसळा नगरपंचायतीत सतरा वार्ड असून सदस्य संख्या सतरा आहे. यांपैकी एका वार्डातुन राष्ट्रवादी काँग्रेस च्या सरोज म्हशीलकर या बिनविरोध निवडून आल्या आहेत. तसेच ओबीसी आरक्षण मुळे 4 जागांवर निवडणूक स्थगित आहे तर उर्वरित12 जागांवर प्रत्यक्ष लढत होणार आहे.
या वेळी कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे सत्ता जाऊ नये यासाठी शिवसेनेसह महाविकास आघाडीतील सत्तेत असलेले काँग्रेस आय पक्ष त्याचबरोबर शेकाप, मनसे व भाजप हे सर्व पक्ष एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधात लढत असून तसे प्रकारच्या प्रचाराच्या हालचाली सुरू झाल्याचे दिसत आहेत. विरोधी पक्षाचे नेते मंडळी व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या पाच वर्षात म्हसळा नगरीचा काय विकास केला आहे ? असे बोलत आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतेमंडळी व कार्यकर्ते आम्ही गेल्या पाच वर्षात म्हसळा नगरीतील विविध विकास कामे मार्गी लावली असून जनता जनार्दन याची पोचपावती आम्हाला येणाऱ्या निवडणुकीत निश्चितच देईल आणि पुन्हा एकदा म्हसळा नगरपंचायतीच्या सत्तेची चावी आमच्याच हातात देईल असे विश्वासाने बोलत आहेत.
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला सहज विजय न मिळवून देण्यासाठी काँग्रेस, शिवसेना आणि शेकाप यांनी युतीचे माध्यमातून लढत देण्यासाठी कंबर कसली आहे. राज्यात आघाडीचा सरकार असला तरी स्थानिक पातळीवर आघाडीमध्ये पटत नसल्याने निवडणूक आणि पक्षाची ताकद किती याचे सरळ मोजमाप होणार आहे.
म्हसळा शहरात काँग्रेस मध्ये मतमतांतरे असुन माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए.आर.अंतुले यांना मानणारी जुनी शहरातील कार्यकारणी आणि दुसरी नव्याने आघाडी सरकारमध्ये काम करत असलेली नवनियुक्त तालुका व शहर कार्यकारणी यांच्यात पक्ष पातळीवर कोणताच संवाद होत नसल्याने काँग्रेसही म्हसळा निवडणुकीत संभ्रम स्थितीत आहे. सद्यस्थितीत नव्याने स्थापित असलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडे पक्षाची सर्व सूत्रे जिल्हा काँग्रेस कार्यकारणी आणि महाराष्ट्र राज्य मंत्री मंडळातील जिल्हा संपर्क मंत्री विजय वडेट्टीवार यांनी हाती देवुन कामाला लागण्याचे आदेश दिले होते, त्यानुसार म्हसळा नगर पंचायतीत निवडणुकीचे काम सुरू आहे.
म्हसळा नगर पंचायतीत मागील वेळी 3 अपक्ष नगरसेवक निवडणून आले होते या वेळी काही ठिकाणी अपक्ष निवडून येण्याची दाट शक्यता आहे तर काही ठिकाणी पाडापाडीचे राजकारण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अपक्ष उमेदवार उभे करून आपले पक्षाला फायदा होईल असे राजकारण केले आहे.
म्हसळा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 12 जागांसाठी 40 उमेदवारी अर्ज वैध ठरले असून ओबीसी आरक्षित असलेल्या प्रभागातील आठ अर्जाची छाननी स्थगित असून प्रभाग क्रमांक 4 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरोज म्हशीलकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना - काँग्रेस युतीतच खरी लढत होणार आहे. तर भाजप आणि शेकापने सुद्धा उमेदवार देऊन आवाहन दिले आहे. अत्यंत चुरशीच्या वातावरणात पार पडणाऱ्या म्हसळा नगरपंचायत निवडणुकीसाठी दाखल झालेल्या एकूण 48 अर्जापैकी 40 अर्ज वैध ठरले होते.
म्हसळा शहरात झालेला विकास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सांगितला जात आहे तर शिवसेना, काँग्रेस आय राष्ट्रवादी च्या विरोधात प्रचार यंत्रणा राबविण्यात अग्रेसर आहे. तर मागील पाच वर्षे एकहाती सत्ता असूनही आणि करोडो रुपयांची विकास कामे करूनही आता या निवडणुकीत प्रत्यक्ष मतदारांच्या घरोघरी जाऊन राष्ट्रवादीच्या नेत्यांना का फिरावे लागत आहे अशी खिल्ली शिवसेना, काँग्रेस कडून उडवली जात आहे.
म्हसळा नगरपंचायत निवडणूकित राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा खासदार सुनिल तटकरे, राज्यमंत्री तथा पालकमंत्री आदिती तटकरे, विधानपरिषद आमदार अनिकेत तटकरे, शिवसेनेचे तालुका प्रमुख सुरेश कुडेकर माजी तालुका प्रमुख नंदू शिर्के, काँग्रेसचे आय तालुका अध्यक्ष डॉ.मुविझ शेख, भाजप चे तालुका अध्यक्ष प्रकाश रायकर, शेकाप तालुका चिटणीस संतोष पाटील अशा दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
إرسال تعليق