'वजनाचे ओझे- त्यावर पडणारे प्रश्न ?



रायगड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध ओबेसिटी कन्सल्टंट डॉ. कांचन सचिन कदम यांचा अभ्यासपूर्ण लेख

सथैल्यकाश्यर्रर्र वरं काश्य॔ समीकरणौ  हि तौ |
यघुभो व्याधिरागच्छेत स्थूलमेवातिपीडयेत ||

                 वरील चरकसंहितेतील संस्कृत  श्लोकात स्पष्टपणे म्हटले आहे. अतिस्थूल असण्यापेक्षा अतिकृश असणे कधीही परवडेल, कारण कुठल्याही व्याधीमुळे होणारा  त्रास हा स्थूल माणसाला कृश माणसापेक्षा खूपच मोठ्या प्रमाणावर होतो. काही ग्रंथांमध्ये जसे 'सुश्रुतसंहिता' या ग्रंथात लठ्ठपणाची निर्भत्सना आणि कृशेतीची  स्तुती केलेली आढळते. एकूण तात्पर्य हेच की प्रमाणापेक्षा वाढलेले वजन हे एक ओझ्यासमान असून अपायकाराकच असते. 
ह्या वाढत्या वजनाबाबत मनात येणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे आपण या लेखात पाहणार आहोत . 

1} प्रश्न -मी डाएट आणि व्यायाम सुरू केल्यावर माझे वजन किती दिवसात कमी होईल ? 
माझ्या मित्राचे वजन एक महिन्यात दहा किलो कमी झाले होते .
        दहा लोकांमध्ये 100 मीटर रेस लावली तर ,ते अंतर पूर्ण करण्याची प्रत्येकाची वेळ वेगवेगळी असेल. ते अवलंबून असेल ती व्यक्ती किती वेगाने मेहनतीने धावली. एखाद्या व्यक्तीचे वजन एका महिन्यात आठ किलो कमी झाले असेल माझे हि तेवढेच होईल हा अट्टाहास  चुकीचा ठरेल, कारण प्रत्येकाचे शरीर हे वेगळे असते. 

2} प्रश्न वजन कमी करण्यासाठी सगळ्यात बेस्ट डायट आहार व व्यायाम कोणता ?
       खरंतर  एकच टी शर्ट साईज सर्वांना बसणार नाही प्रत्येकाची  साईज वेगवेगळी  असते . म्हणजे एखाद्याला गुणकारी ठरेलेला डायट  दुसऱ्यालाही ही तेवढाच  गुणाकारी ठरेल असे नाही. प्रत्येक व्यक्तीची जीवनपद्धती,शरीरयष्टि वेगळी असते म्हणजे कुठल्याही एक डायट पॅटर्न वा व्यायामाला आपण बेस्ट म्हणू शकत नाही . ज्या आहाराने व व्यायामाने तुम्ही निरोगी राहता,  तुमचे वजन आटोक्यात राहते तो डायट व व्यायाम  तुमच्यासाठी बेस्ट ठरेल. 

3} प्रश्न- आमचा भाजी आणण्यासाठी व इतर कामात खूप शारीरिक व्यायाम होतो , तरीही आम्ही नियमित व्यायाम केला पाहिजे का? 
                 तर हो, चालणे, जॉगिंग ,पोहणे ,सायकल चालवणे यासारखे व इतर व्यायाम हवाच आणि तोही आठवड्याचे सातही दिवस . कारण व्यायाम आणि श्रम हे पूर्णतः वेगवेगळे असतात. नियमित व्यायामामुळे शरीर व स्नायू बळकष्ट होतात तर श्रमामुळे शरीराची झीज होत असते. त्यामुळे नियमित व्यायामाऐवजी,  मी रोज भाजी आणण्यासाठी तासभर बाहेर फिरतो ही सबब सांगून  व्यायाम टाळणे म्हणजे स्वताला व शरीराला फसवल्या सारखे आहे . 

4) प्रश्न -आमचा आहार पूर्वी एवढाच असूनही वयाबरोबर वजनही का वाढत आहे ? 
           साधारणतः तिशीनंतर प्रत्येक दशकात आपल्या शरीराची कॅलरी जाळण्याची  क्षमता कमी होऊ लागते शिवाय आपल्या शरीराची ऊर्जाची गरजही  कमी होऊ लागते. पण होते काय की आपण वयाच्या पंचविशीत असताना जेवढा  आहार घेतो तेवढाच आहार साठ-पासष्ट वर्षापर्यंत घेत राहतो. आपल्या लक्षात येत नाही की वाढत्या वयानुसार आपल्या  हालचाली कमी होतात. त्यामुळे शरीराला लागणारी ऊर्जाची गरज कमी होते व बी. एम. आर ही कमी होते.
 
5) प्रश्न -काही किलो वजन उतरल्यानंतर, आता कमी खाऊनही माझे वजन कमी का होत नाही? 
        आपण  व्यायाम   न करता फक्त डायटिंग करतो म्हणजेच खूप कमी आहार घेतो. तेव्हा दोन तीन आठवड्यात हे कमी खाणे शरीराला जाणवते, शिवाय शरीरातली पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे वजनात उतार झालेले आपणांस दिसते. पण शरीर आता आपल्याला आहार कमी मिळत आहे हेच धरून ठेवायला सुरुवात करते  आणि शरीराची ऊर्जा वाचवण्यासाठी चयापचय (Metabolism)  कमी करण्यास प्रोत्साहन करते .  म्हणजेच    बी. एम. आर कमी होतो. म्हणूनच आहार कमी करण्याबरोबर बी. ए .म आर वाढण्यासाठी रोजचा नियमित व्यायाम आवश्यक आहे. 

6) प्रश्न कमी केलेले वजन परत वाढणार तर नाही ना? 
          जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी आहारात केलेले बदल व सुरू केलेला  व्यायाम सातत्याने करत राहिलात तर, नक्कीच तुमचे वजन वाढणार नाही . पण , "तेरड्याचा रंग तीन दिवस'' या उत्की प्रमाणे प्रत्येकाचे वजन कमी करण्याचे प्रयत्न, काही दिवस व्यायाम ,काही दिवस अतिशय कमी खाणे एवढ्यापुरता  मर्यादित राहतो . काही दिवसानंतर परत व्यायाम बंद होतो व खाण्यावरचे नियंत्रण सुटते. 
           वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी कायमस्वरूपी कुठलीही ऊपाय योजना अजुन तरी अस्थित्त्वात नाही . मुळात योग्य प्रमाणात आहार आणि नियमित व्यायाम हे आपल्या रोजच्या दिनचर्याचा भाग असायला हवेत. हे काही मर्यादासाठी व दिवसासाठी करण्याची गोष्ट नाही. या सतत आणि सातत्याने करण्याच्या  गोष्टी आहेत. 
           मला खात्री आहे वरील माहिती वरून आपले वजनवाढी  बदलचे  काही प्रश्न सोडायला नक्की मदत मिळेल. चला तर मग आपण योग्य नियंत्रित आहार व नियमित व्यायाम करून आपले  आरोग्य व वजन आटोक्यात ठेवूयात व सर्वजण निरोगी , सुदृढ राहूयात . 

     “HEALTHY PEOPLE  MAKE HEALTHY NATION”

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा