रोहा (वार्ताहर)
रोह्यातील सामाजिक क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असलेल्या रोटरी क्लब रोहा सेंट्रल तर्फे क्लब प्रेसिडेंट रो. मयुर दिवेकर यांच्या विशेष पुढाकारातून तसेच रोटरी क्लब पुणे डेक्कन जिमखाना व रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 च्या डी. जी. एन. डी. रो. मंजु फडके यांच्या विशेष सौजन्याने शनिवार दिनांक 19 जुन रोजी रोहे तालुक्यातील चार शाळांना सि. पी. यु. संच प्रदान करण्यात आले.
रोह्याचे नगराध्यक्ष संतोष पोटफोडे,उपनगराध्यक्षा रीदवाना शेटये,शिक्षण सभापती अफरीन रोगे,गटनेते महेंद्र गुजर,रोटरी क्लब रोहा सेंट्रलचे प्रेसिडेंट तसेच रोहे अष्टमी नगरपरिषद स्वछता व आरोग्य सभापती मयुर दिवेकर ,रोटरी सदस्य राकेश कागडा,निखिल दाते,सोहीत कांकरीया,विजय दिवकरआदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
या उपक्रमांतर्गत रोहे तालुक्यातील रा. जि. प. शाळा यशवंतखार, रा. जि. प. शाळा (आदिवासी वाडी) यशवंतखार, रोहे नगरपालिका शाळा क्रमांक 1, छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल आरे बुद्रुक या चार शाळांना संगणक निर्मिती क्षेत्रातील नामांकित डेल्स कंपनीचे चार सि. पी. यु. संच प्रदान करण्यात आले.
या प्रोजेक्टची एकूण किंमत ऐंशी हजार इतकी असल्याची माहिती प्रेसिडेंट मयुर दिवेकर यांनी दिली.
याआधी रोटरी क्लब रोहा सेंट्रल तर्फे ज्येष्ठ नागरिक सभागृह येथेही कोरोना लसीकरण सुलभ व्हावे यासाठी सि. पी. यु. संच देण्यात आला होता.
क्लब प्रेसिडेंट मयुर दिवेकर यांनी आपल्या प्रास्ताविकपर मनोगतात आपल्या वर्षभरातील कारकिर्दीचा समग्र आढावा घेतला.आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात नगराध्यक्ष संतोष पोटफोडे , सर्व सहकारी नगरसेवक तसेच रोटरी सदस्यांनी केलेल्या बहुमुल्य सहकार्यामुळे आपण रोहेकरांसाठी काम करू शकलो असे आवर्जुन नमुद केले.
चार शाळांना देण्यात आलेल्या सि. पी. यु. संचांचा उपयोग ऑनलाईन शिक्षणासाठी होणार असल्याचे उपस्थित शिक्षकांनी नमूद करून क्लब प्रेसिडेंट मयुर दिवेकर व सर्व रोटरी सदस्यांचे आभार व्यक्त केले.
नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांनी रोटरी क्लब रोहा सेंट्रलचे काम कौतुकास्पद असल्याचे नमूद करून क्लब प्रेसिडेंट मयुर दिवेकर यांच्या कार्याचा विशेष गौरव केला. मयुर दिवेकर हे रिझल्ट देणारे लोकप्रतिनिधी असल्याने त्यांच्याकडून आपल्या व गावकऱ्यांच्याही मोठ्या अपेक्षा असल्याचे आवर्जून नमूद केले.
कोव्हिडच्या कठीण काळात मयुर दिवेकर यांनी केलेले कामही विशेष उल्लेखनीय असल्याचेही नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्र संचलन रोटरी क्लब रोहा सेंट्रल परिवारातील सदस्या सौ. संध्या विजय दिवकर यांनी केले तर मुख्याध्यापक लांगी सर यांनी आभार व्यक्त केले.
إرسال تعليق