मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड दुर्गांची सार्थ ओळख करून देण्यासाठी जनसेवा समिती, विलेपार्ले आणि विश्वभान प्रतिष्ठान, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य असा "शिव किल्ले अभिमान सोहळा" गुगलमीटवर संपन्न झाला. गुरुवार दिनांक ११ जून २०२१ रोजी 'गीत दुर्गायन' अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड दुर्गांची ओळख गीतातून करून देणारा सुश्राव्य गीतांचा बहारदार कार्यक्रम गीतकार संगीतकार मिलिंद करमरकर यांनी १५० हून अधिक शिवप्रेमींसमोर सादर केला. श्रोतृवृंदामध्ये निम्म्यापेक्षा अधिक विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
तासभर रंगलेल्या संगीतमय कार्यक्रमाचे ओघवते आणि रसाळ निवेदन करता करता पराग लिमये यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड दुर्गांची ओळख करून दिली आणि प्रत्येक किल्ल्याचे स्वराज्य उभारणीतील महत्त्व देखील उपस्थितांना सहजसोप्या भाषेत समजावून सांगितले. मिलिंद करमरकर यांनी सादर केलेल्या गडदुर्गांच्या सुमधूर गीतांनी शिवप्रेमींच्या कानांना ऐन कोरोना संक्रमण काळात घरबसल्या मेजवानी मिळाली. अमोल मांडके यांनी केलेल्या तांत्रिक सहकार्यामुळे कार्यक्रम अधिक उठावदार झाला. अमोल मांडके यांनी त्या त्या दुर्गांवरच्या वास्तूंच्या पारदर्शिका गीतातील वर्णनाबरोबर दाखवल्याने गडावर गेल्याचा अनोखा आनंद दर्शकांना मिळाला.
कार्यक्रमाची संकल्पना मांडणार्या विश्वभान प्रतिष्ठानचे अध्यक्ष जगदीश अनंत संसारे यांनी कार्यक्रमाची सांगता करताना म्हणाले," आजच्या पिढीला मराठी भावगीत भक्तीगीत ठाऊक नसते, अशावेळी, करमरकर - लिमये दुकलीने त्यांना किल्लागीत अर्थात दुर्गगीतांनी झपाटून टाकले." कार्यक्रमाच्या समन्वयिका अश्विनी बडगुजर यांनी थेट गुजरात येथून पाहुण्यांचा परिचय करून दिला. शालेय विद्यार्थी ज्ञानेश्वरी आटोळे आणि अथर्व आटोळे या बहीण भावांच्या जोडीने आपल्या गोड आवाजात कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या सहा वर्षाच्या मार्वी ठाकूर हिने सहज सुंदर भाषेत आभार मानले.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच गुजरात, गोवा येथील शिवप्रेमींनी गीतदुर्गायन कार्यक्रमाचा आनंद लुटला.
إرسال تعليق