कोकणातील उध्वस्त आंबा बागायतदार आणि शेतकरी


कोकणातील उध्वस्त आंबा बागायतदार आणि शेतकरी.
पर्यटन व्यवसाय आणि मच्छीमार  

कोकणातील उध्वस्त अर्थव्यवस्था पुन्हा उभी राहण्यासाठी मदतीचे पॅकेज याकरिता आग्रही मागणी

    पहिल्या निसर्ग वादळामध्ये मंडणगड आणि त्यावरील अर्धे कोकण उध्वस्त झाले. पन्नास-शंभर वर्षाची हापूस आंब्याची झाडे उन्मळून पडली. तीन-तीन पिढ्या उभारलेल्या नारळी-पोफळीच्या बागा एका वादळामध्ये जमीनदोस्त झाल्या. एक कोटी, दोन कोटी नुकसान झालेल्या अनेक पर्यटन व्यवसायिकांना मी स्वतः जाऊन भेटलो होतो. कोणतीही सरकारी योजना नसताना कर्ज काढून कोकणातले युवक स्वाभीमानाने पर्यटनाचा व्यवसाय करत होते. अनेक तरुणांचे व्यवसाय उध्वस्त झाले.  दहा हजार कोटीहून अधिक नुकसान झाले होते. कोकणातला सर्वसामान्य माणूस शेतकरी आंबा बागायतदार , नारळी-पोफळीचा बागायतदार आणि पर्यटन व्यवसायिक कोकणची संपूर्ण अर्थव्यवस्था कमरेत मोडली. त्यावेळी सुद्धा प्रसिद्धीमाध्यमांनी कोकणातल्या या नुकसानीला महत्त्व दिले नाही. मोठे नुकसान हरिहरेश्वर श्रीवर्धनला झाले वादळाचा हा केंद्रबिंदू होता पण. मीडिया अलिबाग आणि मुंबई दाखवत राहिला. मीडियाने महत्व न दिल्यामुळे उध्वस्त कोकणाचे खरे चित्र जगासमोर आले नाही. आणि शंभर-दोनशे कोटीची सरकारी मदत देऊन कोकणाची बोळवण झाली.



या वेळी आपणच झालेल्या नुकसानीचे चित्रीकरण करून सोशल मीडियाच्या माध्यमातून कोकणातले नुकसान जगासमोर आणले पाहिजे.

      यावेळी हापूस आंब्याचा मुख्य सिझन सुरू असताना हे वादळ आले आहे. सुदैवाने देवगड राजापूर येथील समुद्र किनाऱ्याच्या जवळच्या मोठ्या बागा आणि तिथला आंबा जवळपास संपला आहे. समुद्रकिनार्‍यापासून पंधरा वीस किलोमीटर आत असलेली गावे आणि रत्नागिरी गुहागर दापोली खेड चीपळून श्रीवर्धन अलिबाग येथील मुख्य आंबा सीझन सुरू आहे. एकेका बागेमध्ये एक एक शेतकऱ्याचा पाचशे हजार 2000 पेटी हापूस आंबा असतो. मजुरी फवारण्या खते निगराणी याकरता. लाखो रुपयांचे कर्ज एक एक शेतकरी घेतो. कालचा एका दिवसाच्या चक्रीवादळा मध्ये
संपूर्ण बागेतील शेकडो पेट्या हापूस आंबा जमिनीवर पडून त्याची माती झाली आहे. कोकणातील परिश्रमी आंबा बागायतदार यामुळे संपूर्ण उध्वस्त आणि कर्जबाजारी होणार आहे. स्वाभिमानी आणि थोडासा उदासीन कोकणी शेतकरी पुन्हा आपले नुकसान झाले म्हणून काहीच बोलणार नाही. सवयीप्रमाणे सरकारकडे कधीच मदत मागणार नाही.
यातून प्रचंड मोठे आर्थिक प्रश्न कोकणात उभे राहणार आहेत.
कोकणभूमी प्रतिष्ठान आणि ग्लोबल ओपन च्या माध्यमातून आम्ही मागणी करतो कि संपूर्ण कोकणात आंबा बागायतदार शेतकऱ्यांचे किती नुकसान झाले याचा तातडीने पंचनामा करावा आणि या नुकसानीच्या प्रमाणात कोकणातल्या आंबा बागायतदार शेतकऱ्यांना मदतीचे पॅकेज दिले जावे. कोकणातील आंबा बागायतदार पर्यटन व्यवसायिक आणि मच्छीमार यांना कर्जमाफी व्याजमाफी विज बिल माफी
व आर्थिक मदतीचे काही हजार कोटी चे विशेष पॅकेज दिले पाहिजे. कोकण प्रदेश आणि सरकारकडे कधीच मदत मागितली नाही पण गेल्या दोन वर्षातील भीषण परिस्थिती लक्षात घेऊन कोकणातल्या माणसांच्या पाठीमागे शासनाने उभे राहिले पाहिजे.

      मित्रांनो गप्प राहिले तर आई सुद्धा लक्ष देत नाही नाही, त्यामुळे या नैसर्गिक आपत्तीमध्ये जे आपले नुकसान झाले त्याबद्दल बोलावे लागेल, आपापल्या स्तरावर आंदोलने करावे लागतील, कोकणाशी काहीही देणेघेणे नसलेले कोकणा बाहेरील तलाठी ग्रामसेवक यांना योग्य पंचनामे व्हावेत म्हणून कामाला लावावे लागेल. कोकणातील सामाजिक कार्यकर्त्यांनी या विषयात सक्रिय व्हावे लागेल. केवळ हापूस आंबा नाही याशिवाय भरपूर नुकसान झालेले आहे यांचेही पंचनामे झाले पाहिजेत.

     निसर्ग वादळात कोकणाचे झालेले नुकसान, कोरोनामुळे कोकणातील मुख्य अर्थव्यवस्था पर्यटन हापूस आंबा आणि मच्छीमार यांचे झालेले नुकसान आणि आत्ता या चक्रीवादळ अमोल मुळे  कोकणात झालेले प्रत्यक्ष नुकसान याचा संपूर्ण अभ्यास करून. कोकणातील आंबा बागायतदार पर्यटन व्यवसायिक शेतकरी आणि मच्छीमार हे पुन्हा आपल्या आयुष्यात सक्षमपणे उभे याकरिता काही हजार कोटींचे
मदतीचे पॅकेज राज्य व केंद्र सरकारने प्रत्यक्षात दिले पाहिजे
अशी आग्रही मागणी आम्ही करत आहोत. ज्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातील ऊस आणि साखर कारखाने, विदर्भातील कापूस आणि शेतकरी आत्महत्या, मराठवाड्यातील दुष्काळ आणि अवकाळी पाऊस यांना महत्त्व देऊन हजारो कोटीची मदतीची पॅकेजेस तेथील लोकांना उभे राहण्यासाठी व तेथील अर्थव्यवस्था जगण्यासाठी शासनाकडून मदत मिळते. तशी मदत पहिल्यांदा कोकणातील अर्थव्यवस्थेला झाली पाहिजे.

      दोन-दोन चक्रीवादळे झेलणाऱ्या आणि कोरोनामुळे संपूर्ण अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झालेल्या कोकणाला पहिल्यांदा मदतीचे भरीव पॅकेज केंद्र व राज्य शासनाने दिले पाहिजे
आणि या करता आपण सगळेजण आग्रही होऊया. त्या त्या स्तरावर वेगवेगळ्या पद्धतीने आपले म्हणणे मांडूया. पर्यटन आंबा बागायतदार व मच्छीमार आपापल्या स्तरावर आणि एकत्रितपणे आंदोलन सुद्धा करूया.

      कोकणातील आंबा बागांमध्ये झाडांवरती आंबे नाहीत आणि जमिनीवर हापूस आंब्याचे सडे पडलेले आहेत अशी अनेक ठिकाणी स्थिती आहे. प्रसिद्धीमाध्यमे नेहमीप्रमाणे कोकणातील नुकसान दाखवणार नाहीत. माझी कोकणातील आंबा बागायतदार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना विनंती आहे. अशा स्वरूपाचे नुकसानीचे व्हिडिओ आपापल्या ठिकाणी बनवा याची सोशल मीडियावर प्रसिद्धी करा.
कोकण भूमी प्रतिष्ठानचे समन्वयक ललित जाधव यांच्या मोबाईलवर अशा स्वरूपाचे नुकसानीचे व्हिडिओ व्हाट्सअप करा.

संपर्क.  99203 30922

संजय यादवराव
समृद्ध कोकण संघटना 
ग्लोबल कोकण

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा