ताऊक्ते चक्रीवादळ : मुंबई, मुंबई उपनगरातील 25 नौका दिघी बंदरात आश्रयाला

                    संग्रहित छायाचित्र दिघी

रायगडातील 15 मच्छिमार नौका अजूनही समुद्रात

टीम म्हसळा लाईव्ह
 चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या 96 मच्छिमार नौकांपैकी 81 नौका किनाऱ्यावर परतल्या असून 15 नौका अजूनही समुद्रात आहेत. या नौकांच्या चेअरमनशी संपर्क साधून त्यांना किनाऱ्यावर परत येण्याबाबत कळविण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
 
आज (15 मे) सकाळी प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मुंबई व मुंबई उपनगरातील 25 नौकांनी श्रीवर्धन तालुक्यातील दिघी बंदरात आश्रय घेतला आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यातील एकूण मच्छिमार नौकांपैकी अलिबाग तालुक्यातील 92 व उरण तालुक्यातील 4 अशा 92 नौका मासेमारीसाठी समुद्रात गेल्या होत्या. सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार, अलिबागमधील 77 आणि उरणमधील 4 अशा 81 नौका किनाऱ्यावर परतल्या आहेत. तर अलिबागमधील 15 नौका अजूनही समुद्रात आहेत.
किनारपट्टीवर घोंगावणारे सदर चक्रीवादळ मागील 6 तासांमध्ये सुमारे 7 किमी प्रतितास वेगाने उत्तरेकडे सरकले असून याची तीव्रता वाढली आहे. हे चक्रीवादळ 18 मे च्या सकाळी गुजरात किनारपट्टीवर पोहोचेल असा अंदाज आहे. या चक्रीवादळाचा फटका रायगड किनारपट्टीलाही बसेल, असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.
त्यामुळे रायगड जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. चक्रीवादळाचा परिणाम शुक्रवारपासून दिसू लागला आहे. जिल्ह्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली असून वातावरण ढगाळ आहे. गेल्यावर्षी निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसलेले रायगडकर ताऊक्ते चक्रीवादळाच्या इशाऱ्याने धास्तावले आहेत.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा