उरणमध्ये रंगली रायगड जिल्हास्तरीय काव्यस्पर्धा !



उरण (गुरुदत्त वाकदेकर)
द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित २० वा रायगड जिल्हास्तरीय युवा महोत्सव  ३ ते ७ मार्च २०२१ या काळात उरण येथे रंगला आहे. सलग ५ दिवस १०८ स्पर्धांचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष महादेव घरत यांच्या कुशल नेतृत्वाखाली करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्पर्धेच्या ताकतीचं नियोजन करताना द्रोणागिरीच्या सर्वच पदाधिकार्‍यांनी आणि कार्यकर्त्यांनी दिवसरात्र घेतलेली मेहनत भव्य पटांगणात गेल्यावर जाणवते. कोरोना संदर्भात सरकारी आदेशांचं पालन करताना सर्वच स्पर्धक आणि रसिकांच्या सुरक्षिततेसाठी योग्य त्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.  
उद्घाटनाच्या शानदार सोहळ्यानंतर काव्यस्पर्धेने महोत्सवाची सुरूवात करण्यात आली. सदर काव्यस्पर्धेत अनेक स्पर्धकांनी आपल्या कवितांचे उत्तम सादरीकरण केले. विविध विषयांच्या रचना अर्थपूर्ण व बहारदार शब्दांनी सजल्या होत्या. स्पर्धेचे अध्यक्षस्थान युवा महोत्सवाचे अध्यक्ष महादेव घरत यांनी भूषविले. त्याचवेळी  डॉ. शीतल शिवराज मालुसरे (तान्हाजी मालुसरे यांच्या थेट १३व्या वंशज) व्यासपीठावर उपस्थित होत्या. द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे सर्व मान्यवर पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. जाणकार काव्य रसिकांची उपस्थिती सदर स्पर्धेला लाभली. परीक्षक म्हणून साहित्य क्षेत्रातील मान्यवर गुरुदत्त वाकदेकर आणि पद्माकर म्हात्रे यांनी स्पर्धेचे चोख परीक्षण केले. काव्यस्पर्धेचे संयोजन संजय होळकर, रोहन घरत, श्री. भ. पो. म्हात्रे, राम म्हात्रे, दर्शना माळी आणि स्पर्धा प्रमुख व मुख्य सूत्रसंचालक कविश्री अरुण दत्ताराम म्हात्रे यांनी उत्तम प्रकारे केले.

काव्यस्पर्धेचा निकाल -

मेघा रामचंद्र गोळे- महाड (प्रथम), गुणवंत सिताराम पाटील- पनवेल (द्वितीय), प्रशांत महादेव कोळी- उरण (तृतीय) उत्तेजनार्थ १- रंजना संजय केणी- कळमुसरे. २- सुरज लक्ष्मण गोंधळी- पनवेल. ३- अनिल विनोद भोईर- उरण. ४- हर्षद जगन्नाथ पाटील- पनवेल. ५- वैभव पाटील- पागोटे. असे एकूण  ८ क्रमांक काढण्यात आले. विजेत्यांना रोख रक्कम, सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र तसेच सर्व सहभागींना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. अध्यक्ष, स्पर्धा प्रमुख व संयोजकांनी सर्व विजेत्यांचे, सहभाग धारकांचे आणि काव्य रसिकांचे आभार मानले आणि ७ मार्च पर्यंत चालणार्‍या या महोत्सवात सहभागी होण्यासाठी आवाहन केले.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा