हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली येण्यापासून वंचित
संतोष चौकर/श्रीवर्धन
श्रीवर्धन तालुक्यातील काही मोठे पाटबंधारे प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले आहेत. केवळ 20 टक्के काम होणे बाकी असताना या प्रकल्पांकडे शासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे येथील हजारो हेक्टर जमीन ओलिताखली येण्यापासून वंचित आहे. याकडे खा. सुनील तटकरे यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
श्रीवर्धन तालुक्याला 52 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला असला तरीही या ठिकाणची बहुतांश नागरी वस्ती दुर्गम भागातच आहे. श्रीवर्धन-हरिहरेश्वर मार्गावरील गावे वगळता बाकी गावे, वाड्या डोंगराळ भागातच आहेत. श्रीवर्धन तालुका समुद्र किनारपट्टीवर असल्याने या ठिकाणी पावसाचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असते. परंतु उन्हाळा आल्यानंतर दुर्गम भागात असणार्या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो.
70 च्या दशकामध्ये श्रीवर्धन तालुक्यात रानवली, खुजारे व कुडकी याठिकाणी पाझर तलाव बांधण्यात आले. रानवली पाझर तलावातून श्रीवर्धन शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. तर खूजारे येथील पाझर तलावामधून बोर्लीपंचतन शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. तर कुडकी पाझर तलावाचे पाणी वडवली व आजूबाजूच्या गावांना पुरविण्यात येते. मात्र श्रीवर्धन तालुक्यात काही मोठे पाटबंधारे प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले आहेत. 80 टक्के काम पूर्ण होऊन केवळ 20 टक्के कामच बाकी असताना या प्रकल्पांकडे शासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे.
श्रीवर्धन तालुक्यातील वडशेत वावे या गावच्या हद्दीमध्ये एका मोठ्या पाटबंधारे प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले होते. हा पाटबंधारे प्रकल्प जवळजवळ पूर्ण झालेला आहे. काही अंशी काम बाकी असल्यामुळेच त्यामध्ये पाणी साठवता येत नाही. या पाटबंधारे प्रकल्पाचा मुख्य जलस्त्रोत गाणी या गावातून आला असून त्या ठिकाणी बारा महिने पाणी उपलब्ध असते. काम अपूर्ण राहण्यामागचे कारण असे सांगितले जाते की, ज्या शेतकर्यांच्या जमिनी या प्रकल्पामध्ये गेलेल्या आहेत, त्यांना अद्याप भूसंपादनाचा मोबदला देण्यात आलेला नाही.
वडशेतवावे येथील पाटबंधारे प्रकल्पापासून भला मोठा कालवादेखील खोदून तयार आहे. हा कालवा रानवली येथील पाझर तलावापर्यंत आणण्याचा प्रकल्प आहे. उन्हाळ्यात रानवली धरण आटल्यानंतर श्रीवर्धन शहरात पाणी टंचाई भासते. परंतु सदर कालव्याचे पाणी रानवली धरणात सोडल्यास श्रीवर्धन शहराला पाणी टंचाई भासणार नाही. तसेच या कालव्याच्या पाण्यामुळे हजारो हेक्टर शेती ओलिताखाली येणार आहे. या ठिकाणची शेती ओलिताखाली आली तर या ठिकाणी भाजीपाला, दुबार भात शेती करुन शेतकरी सधन होईल. सदर पाटबंधारे प्रकल्पामुळे श्रीवर्धन तालुक्यात वीटभट्टी तसेच अन्य व्यवसाय चांगले चालतील.
श्रीवर्धन तालुक्यात पावसाळा संपल्यानंतर अक्षरशः रखरखाट असतो. केवळ पाटबंधारे प्रकल्प अपूर्ण असल्यामुळे तालुक्यातील सुपीक असलेली जमीन कोणत्याही कामाला येत नाही. पर्यायाने श्रीवर्धन तालुक्यात भाजीपाला वाई किंवा पुणे येथील मार्केट यार्डातून आणावा लागतो. त्याचप्रमाणे गोंड्याची फुलेदेखील बाहेरच्या मार्केटमधून आणावी लागतात. असाच एक प्रकल्प हरिहरेश्वर जवळील मारळ गावाच्या हद्दीतही रखडलेला आहे. हे प्रकल्प लवकरात लवकर पूर्णत्वाकडे नेण्यासाठी रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी तातडीने प्रयत्न करावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
वडशेतवावे येथील पाटबंधारे प्रकल्प जवळजवळ 18 वर्षांपासून रखडलेल्या अवस्थेत आहे. हा प्रकल्प जर का पूर्ण झाला तर आमच्या शेतीला मुबलक प्रमाणात पाणी मिळेल आणि त्या ठिकाणी भाजीपाला किंवा दुपार भात शेती किंवा झेंडूच्या फुलांची शेती करुन चांगल्या प्रमाणात उत्पन्न मिळवू. जेणेकरुन श्रीवर्धन तालुक्यात बाहेरुन आणावा लागणारा भाजीपाला किंवा फुले आमच्यासारखा स्थानिक शेतकरीच पुरवेल.
- वसंत यादव, शेतकरी, श्रीवर्धन
إرسال تعليق