श्रीवर्धनमध्ये तिघांचे रिपोर्ट आले कोरोना पॉझिटीव्ह ; वडवली, खुजारे येथील मृत व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटीव्ह :
दिघी गावातील 23 वर्षीय तरुणीलाही कोरोनाची लागण
अभय पाटील : बोर्लीपंचतन
श्रीवर्धन तालुक्यात शुक्रवारी (22 मे) तीन जणांचे स्वॅब रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह आले. यामध्ये वडवली व खुजारे येथील मृत व्यक्तींचा समावेश आहे. तर दिघीतील एका 23 वर्षीय तरुणीला कोरोनाची लागण झाली आहे. हे तिघेही मुंबईतून आले होते.
श्रीवर्धन तालुक्यात मागील महिन्यामध्ये भोस्ते गावातील 5 व्यक्तींना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. उपचारानंतर हे सर्वजण बरे झाले असून, त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. त्यानंतर गुरुवारपर्यंत श्रीवर्धनमध्ये एकही कोरोना रुग्ण नव्हता. सध्या मुंबई येथून आपल्या मूळ गावी येणार्यांची संख्या खूप आहे. यातच बोर्लीपंचतन गावापासून 4 किमी अंतरावर असणार्या वडवली गावात 17 मे रोजी खार-मुंबई येथून 55 वर्षीय इसम आपल्या कुटुंबासह आला आहे. त्या व्यक्तीचेे दुसर्याच दिवशी 18 मे रोजी सायंकाळी निधन झाले होते. संशयास्पद मृत्यू असल्याने, प्रशासनाने त्या व्यक्तीचा स्वॅब घेतला होता. त्याचे रिपोर्ट शुक्रवारी कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत.
त्याचप्रमाणे वडाळा मुंबई येथून दिघी गावामध्ये 23 वर्षीय तरुणी आई-वडील व दोन अन्य भावंडांसमवेत 15 मे रोजी आली होती. या तरूणीला काही 18 मे रोजी ताप, खोकला झाल्याने तिला श्रीवर्धन येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये पाठविण्यात आले व तिथे तिचा स्वॅब घेण्यात आला होता. तिच्या स्वॅब टेस्टचे रिपोर्टही शुक्रवारी पॉझिटीव्ह आल्याने, तिला कोव्हीड-19 ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर खुजारे या गावामध्ये प्रभादेवी मुंबई येथून 62 वर्षीय इसम त्याच्या मुली व शेजारील गावातील नातेवाईकांसह आला होता. त्याचा 19 मे रोजी मृत्यू झाला होता. खबरदारी म्हणून त्याचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. त्याचेही रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत.
ही तीनही अहवाल शुक्रवारी सकाळीच श्रीवर्धन प्रशासनाकडे प्राप्त झाले. त्यामुळे श्रीवर्धन उपविभागीय अधिकारी यांच्या सुचनेवरुन तहसीलदार सचिन गोसावी, मंडळ अधिकारी सुनील मोरे, बोर्लीपंचतन वैद्यकीय अधिकारी डॉ.सूरज तडवी, दिघी सागरी पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार, तलाठी सुनील भगत, मिलींद पुठ्ठेवार यांनी आपल्या टीमसह वडवली, खुजारे व दिघी गावास भेट दिली. तीनही गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. गावाच्या सीमा पूर्णपणे बंद केल्या आहेत. तसेच या तीनही गावांची मुख्य बाजारपेठ असणारी बोर्लीपंचतन बाजारपेठ खबरदारी म्हणून तातडीने पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
दिघी येथील कोरोना बाधित 23 वर्षीय तरुणीसोबत आई-वडील, दोन भाऊ अशा एकूण 5 जणांना तर वडवली येथील मृत व्यक्तीच्या संपर्कातील त्याच्या कुटुंबातील 9 जणांना जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे उपचारासाठी व तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. खुजारे येथील 62 वर्षीय मृत व्यक्तीच्या संपर्कातील 4 जणांनाही अलिबाग येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. दरम्यान, श्रीवर्धन तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 8 झाली आहे. यापैकी 5 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर दोघांचा रिपोर्ट येण्याआधी घरीच मृत्यू झाला होता. तर एका पॉझिटीव्ह रुग्णावर उपचार सुरु आहेत.
إرسال تعليق