श्रीवर्धनमध्ये आणखी 2 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण ; वडवलीत 21 दिवसांच्या बाळाला कोरोनाचा संसर्ग



अभय पाटील : बोर्लीपंचतन 

श्रीवर्धन तालुक्यातील वडवली गावातील मृत कोरोना पॉझिटीव्ह व्यक्तीच्या 21 दिवसांच्या नातवाचा तसेच दिघी गावातील आणखी एका व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल आज पॉझिटीव्ह आला आहे. तर 9 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 10 वर पोहचली आहे. 

श्रीवर्धन तालुक्यातील दिघी गावामध्ये वडाळा-मुंबई येथून अपल्या कुटुंबासमवेत आलेल्या 23 वर्षीय तरूणीचा कोरोना अहवाल चार दिवसांपूर्वी पॉझिटीव्ह आला होता. त्यानंतर त्या तरुणीसह तिच्या आई-वडील व दोन भावांना अलिबाग जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. तिथे 4 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली. सदर चाचणीचे अहवाल प्राप्त झाले असून तरुणीच्या वडिलांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तर एका भावाचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. आई व दुसर्‍या भावाचे नमुने पुन्हा घेऊन चाचणी करण्यात येणार आहे.  

त्याचप्रमाणे वडवली येथील 55 वर्षीय व्यक्ती आपल्या कुटुंबासमवेत खार मुंबई येथून आली होती. त्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्याने मृत व्यक्तीची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. ती 21 मे रोजी पॉझिटीव्ह आली होती. त्यानंतर त्यांच्या संपर्कातील 9 जणांना अलिबाग जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. यामध्ये 21 दिवसांच्या छोट्या बाळाचा समावेश होता. या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी 8 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले; परंतू दुर्देवाची बाब म्हणजे 21 दिवसांच्या तान्हुल्या बाळाचा चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. याव्यतिरिक्त खुजारे येथील 4 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांवर अलिबाग येथे उपचार सुुरु असून सद्यस्थितीत तीनही रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. 

श्रीवर्धन तालुक्यातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या आता 10 झाली असून यातील 5 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर सद्यस्थिती 3 जणांवर उपचार सुरू आहेत तर 2 व्यक्तींचा अहवाल येण्याआधीच घरी मृत्यू झाला होता. 


इतर गावातून किंवा शहरातून श्रीवर्धन तालुक्यातील आपल्या घरी आलेल्या व ज्यांना होम क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींनी दिलेल्या सूचनांचे गांभीर्याने पालन करणे सर्व तालुक्याच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक व हिताचे आहे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली असली तरी  सावधगिरी बाळगणे, सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे, रस्त्यावर न थुंकणे, वारंवार हात धुणे, अनावश्यक रितीने बाहेर न फिरणे याचे पालन गरजेचे आहे. वयोवृध्द, गरोदर महिला, लहान मुले यांनी घराबाहेर पडू नये त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे.- अमित शेडगे, प्रांताधिकारी, श्रीवर्धन

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा