माणगाव मध्ये रेशनधान्य घरपोच देण्याची योजना...

माणगावात खरेदी विक्री संघाच्या पुढाकाराने धान्य घरपोच अध्यक्ष निलेश थोरे व सहकाऱ्यांचे प्रातांधिकारी दिघावकर यांनी केले कौतुक 

प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
आजपर्यंत सर्वसामान्य जनतेला रेशनचे धान्य मिळवण्याकरिता अनेकवेळा दुकानाचे उंबरे झिजवावे लागतात . कधी रेशन मिळत नाही , कधी मिळाले तर कमी मिळते , कधी कधी महिनाभर फेऱ्या मारुनही रेशन न मिळाल्याने हताश होऊन परतावे लागते ; पण माणगाव तालुका खरेदी विक्री संघाने रेशनकार्ड धारकांची अडचण समजून सामाजिक बांधिलकीतून संघाचे नवनिर्वाचित सभापती निलेश थोरे यांनी माणगावात अनोखा उपक्रम राबवला . माणगाव उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव दिघावकर , माणगाव नायब तहसीलदार बी . वाय . भाबड , अलिबाग पंचायत समिती सदस्या रचना थोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत माणगाव खांदाड आदिवासीवाडी येथील रेशन कार्डधारकांना घरपोच रेशन धान्य देण्यात आले . रेशन कार्ड धारकांना धान्य आणण्यासाठी रेशन दुकानापर्यंत पायपीट करावी लागते . त्यामुळे त्यांचा वेळ वाया जातो . तसेच रेशन पुरवठ्यात तांत्रिक बाबींच्या अडचणींनाही तोंड द्यावे लागते . त्यामुळे गोरगरीब आदिवासी तसेच सर्वसामान्य जनता यांना अनेक वेळा रेशन धान्यापासून वंचित रहावे लागते ; परंतु माणगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाने ते चालवत असलेल्या रेशन धान्य दुकानातून १९ जानेवारीपासून प्रत्येक रेशनधारकांना त्यांच्या हक्काचे रेशन धान्य थेट घरपोच देण्याचा शुभारंभ करण्यात आला . त्यावेळी खरेदी विक्री संघाचे सभापती निलेश थोरे , कृ . उ . बा . समिती सभापती संजय पंदेरे , तालुका शे . का . प . चिटणीस रमेश मोरे , संघाचे उपसभापती संजय मालोरे , कुंडलिक थोरे , माजी सरपंच सखाराम जाधव , बबन अंबुलें , नामदेव  शिंदे संघाचे सर्व संचालक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते . माणगाव तालुका खरेदी विक्री संघाने रेशन धान्य घरपोच केल्याने माणगाव तालुक्याच्या प्रांताधिकारी प्रशाली जाधव दिघावकर यांनी संघाचे सभापती निलेश थोरे व सहकाऱ्यांचे या उपक्रमाबाबत कौतुक केले . संपूर्ण महाराष्ट्रात कोणत्याही परवानाधारक दुकानदार व्यक्ती अथवा संस्थेने या पूर्वी असा ऐतिहासिक निर्णयघेतलेला नसून हा निर्णय केवळ माणगाव तालुका किंवा रायगड जिल्हा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राकरिता आदर्श निर्माण करणारा आहे . गोरगरीब आणि सर्वसामान्य जनता या निर्णयामुळे यापुढे रेशनपासून वंचित राहणार नाही . ही ऐतिहासिक योजना जानेवारी २०२० ते जानेवारी २०२१ पर्यंत प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सभापती निलेश थोरे यांनी यावेळी दिली .

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा