मुरुड तालुक्यात पर्यटकांची वर्दळ वाढली धुके व थंडीचा आस्वाद घ्यायला गर्दी ; शैक्षणिक सहली सुरू
मुरूड - जंजिरा : प्रकाश सद्रे
वादळी पावसामुळे अवकळा आलेल्या मुरूड तालुक्यातील पर्यटन व्यवसायाला डिसेंबरपासून पुन्हा ऊर्जितावस्था आल्याचे पर्यटकांच्या वाढत्या वर्दळीने दिसू लागले आहे . येथील थंडीचा बहारदार मोसम आणि धुक्यात लपटलेल्या मुरूडचा रम्य हिरवागार परिसराची याची देही याची डोळा पाहण्यासाठी पर्यटकांसह शैक्षणिक सहलीच्या बसेस मोठ्या प्रमाणावर येऊ लागल्या आहेत . मुरूड तालुका हा ऐतिहासिक स्थळांनी आणि समुद्राच्या सान्निध्यातील तालुका असल्याने आधिक लोकप्रिय आहे . अलिबागकडून रेवदंडा पुलावरून साळाव येथे मुरूड तालुक्यात प्रवेश केल्यानंतर बिर्ला गणेश मंदिरपासून स्थळांची सुरुवात होते . कोर्लईचा कोरलागड , प्रसिद्ध काशीद बीच , बारशिव बीच , नांदगाव बीच , नांदगावचे श्री सिद्धीविनायक देवस्थान , फणसाड अभयारण्य , जंजिरा नबाबाचा राजवाडा , मुरूडची ग्रामदेवता श्री कोटेश्वरी देवी , मुरूडचा नयनरम्य ३ किमीचा समुद्रकिनारा , १३५ वर्षांपूर्वीचे गारंबी धरण , आंबोली डॅम , जंजिरा आणि पद्मजलदुर्ग , खोरा बंदर , डोंगरी सनसेट पॉइंट , दत्तदेवस्थान , ईदगाह अशी अनेकविध स्थळे पाहण्यासाठी आवर्जून येतात . राज्यातील विविध भागांतून पर्यटक आणि विद्यार्थ्यांच्या सहलींचा मोठा ओघ सुरू झाल्याचे दिसून येते . ख्रिसमसपासून पुढे लॉजिंग व्यवस्था फुल्ल होणार असे चित्र असल्याचे मालकवर्गांनी सांगितले . थंडी काहीशी उशिराने सुरू झाली असली , तरी बोचरी जाणवत नाही . मुरूडमधील सर्व स्थळे पाहण्यासाठी दोन दिवस अपुरे पड़ शकतात . सकाळी समुद्रकिनारी खुल्या हवेत वाळूवर मॉर्निंग वॉक करणे म्हणजे रोमांचकारी अनुभव आहे . मुरूडमध्ये हॉटेल्स बरोबरच घरगुती खानावळी उपलब्ध आहेत . डिसेंबर २९ डिसेंबरपासून पुढील ३ दिवस मुरूडमध्ये नगर परिषदेतर्फे पर्यटन महोत्सवाचे आयोजन दरवर्षीप्रमाणे आयोजन करण्यात आले आहे . त्यामुळे पर्यटकांसाठीही हा पर्यटन महोत्सव मोठी पर्वणीच ठरत आहे .
मुरूडच्या ऐतिहासिक प्रसिद्ध पद्मदुर्ग येथे २२ डिसेंबर रोजी कोकणकडा मित्रमंडळ महाड , मुरूड नगर परिषद, पद्मदुर्ग जागर व संवर्धन समितीतर्फे पद्मदुर्ग ११ व्या जागरचे आयोजन करण्यात आले आहे . त्यामुळे चैतन्याचे वातावरण आहे .
إرسال تعليق